कोलंबो सुरक्षा परिषद: आव्हाने आणि सुरक्षिततेविषयी NSA डोवाल यांचा इशारा

0

जागतिक सुरक्षा परिदृष्य हे आता एका ‘आव्हानात्मक’ टप्प्यात प्रवेश करत आहे, असे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी, गुरुवारी पार पडलेल्या 7व्या कोलंबो सुरक्षा परिषदेदरम्यान (CSC) सांगितले. यावेळी, त्यांनी सदस्य राष्ट्रांना दहशतवादाविरुद्धचे सहकार्य तीव्र करण्याचे आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याचे आवाहन देखील केले.

आपल्या भाषणादरम्यान डोवाल म्हणाले की, “हिंद महासागर प्रदेश, सध्या वेगाने विकसित होत असलेल्या भू-राजकीय आणि सुरक्षा दबावांचा सामना करत असून, वेगाने बदलणाऱ्या आणि आव्हानात्मक जागतिक सुरक्षा वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, आज CSC ला पूर्वीपेक्षा कित्येक पटीने अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.”

भारताच्या सागरी दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करताना, डोवाल यांनी हिंद महासागराला “आपला सर्वात मोठा सामायिक वारसा” असे म्हटले आणि प्रादेशिक सागरी क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी, सर्व राष्ट्रांनी संयुक्तपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

“हा महासागर आपल्या अर्थव्यवस्थांना चालना देणारे इंजिन आहे,” असे म्हणत, त्यांनी खुल्या, सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित सागरी व्यवस्थेची गरज अधोरेखित केले. त्यांनी या प्रदेशातील एकमेकांशी जोडलेल्या भूभागांचा आणि सामायिक असुरक्षिततेचा हवाला देत, सागरी संसाधनांच्या मजबूत सामूहिक व्यवस्थापनाची मागणी केली.

समुद्री चाचेगिरी, अवैध तस्करी आणि प्रादेशिक शक्तीप्रदर्शनाची स्पर्धा पुन्हा वाढत असल्यामुळे, सागरी सुरक्षा आणि समन्वित नौदल प्रतिसाद हे या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.

“विकसित होत असलेल्या आणि उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, तसेच सामूहिक क्षमतांचा विकास करण्यासाठी, आम्ही सर्व CSC देशांसोबत आम्ही जवळून काम करू,” असे आश्वासन डोवाल यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमादरम्यान, बांग्लादेशचे राष्ट्रीस सुरक्षा सल्लागार (NSA) खलील-उर-रहमान म्हणाले की, “त्यांचा देश अनेक CSC उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे आणि ते घोषणापत्रामध्ये नमूद केलेल्या- सार्वभौमत्व, समानता, प्रादेशिक अखंडता जपणे आणि हस्तक्षेप न करणे या तत्त्वांवर आधारित सहकार्य सुरू ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवतात.”

“सामूहिक सुरक्षा, प्रादेशिक स्थिरता आणि सामायिक समृद्धी बळकट करण्यामध्येस ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावू शकते,” असे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, “या संदर्भात बांग्लादेश आपली दुहेरी भूमिका ठामपणे बजावत आहे. सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी, समुद्री चाचेगिरी, इतर संघटित सागरी गुन्हेगारी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी, तसेच सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही प्रादेशिक राष्ट्रांसोबत काम करत आहोत.”

गेल्या वर्षभरात, भारताने वैज्ञानिक कौशल्ये आणि सागरी सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली, पहिली महासागर शास्त्रज्ञ आणि जलमापन शास्त्रज्ञांची परिषद, यासह CSC शी संबंधित अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, “जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा प्रवाहांसाठी, हिंद महासागराचे क्षेत्र दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचे होत असल्यामुळे, यापुढेही CSC आपल्या तांत्रिक आणि कार्यात्मक उपक्रमांचा विस्तार करत राहील.”

CSC ने, दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद यांचा सामना करण्यावर अधिक भर दिला, तसेच अनेक शिष्टमंडळांनी सीमापार नेटवर्क आणि अतिरेकी वित्तपुरवठ्यामुळे निर्माण झालेला धोका यावेळी अधोरेखित केला.

सहभागी राष्ट्रांनी, संयुक्त दहशतवादविरोधी सराव, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणेचा विस्तार करण्यावर सहमती दर्शविली, जे CSC च्या 2020 मधील पुनर्रचनेनंतरचे एक प्रमुख प्राधान्य आहे.

या बैठकीत, पूर्व आफ्रिकेतील सेशेल्स हा देश पूर्ण सदस्य म्हणून सहभागी झाला, तर मलेशिया प्रथमच अतिथी म्हणून या परिषदेत उपस्थित होता.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleनवीन व्यापार मार्गांबाबत भारत, अफगाणिस्तान यांच्यात चर्चा
Next articleSwavlamban 4.0 to Set New Tech Challenges as Navy Ramps Up Innovation Push

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here