‘सायबर धोक्यांच्या मुकाबल्यासाठी परस्पर सहयोग गरजेचा’

0
Cyber Domain-National Security
‘डिफेन्स सायबर एजन्सी’ने आयोजित केलेल्या ‘सायबर सुरक्षा-२०२४’ या सरावाला जनरल चौहान यांनी भेट दिली.

‘सायबर सुरक्षा-२०२४’: संरक्षणदलप्रमुखांची सायबर सरावाला हजेरी   

दि. २३ मे: ‘सायबर स्पेस’चा वापर करून होणाऱ्या देशविरोधी कारवाया आणि शत्रू देशांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लष्करी आणि इतर ‘एजन्सी’मध्ये परस्पर सहयोग अतिशय गरजेचा असल्याचे मत संरक्षणदलप्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले. ‘डिफेन्स सायबर एजन्सी’ने आयोजित केलेल्या ‘सायबर सुरक्षा-२०२४’ या सरावाला जनरल चौहान यांनी भेट    दिली, त्यावेळी या सरावातील सहभागींशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांमध्ये समन्वय आणि साहचर्य वाढावे आणि त्यामाध्यमातून त्यांची या विषयातील क्षमता अधिक वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने ‘डिफेन्स सायबर एजन्सी’ने २० मे ते २४ मे दरम्यान ‘सायबर सुरक्षा-२०२४’ या सरावाचे आयोजन केले आहे. देशाची ‘सायबर सुरक्षा क्षमता पडताळणे आणि ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. या सरावात सशस्रदलांतील विविध आस्थापना आणि वेवेगळ्या ‘एजन्सी’मधील सायबर सुरक्षा विषयक तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.

Cyber Domain-National Securityसंरक्षणदलप्रमुख जनरल चौहान सायबर सुरक्षा विषयात काम करीत असलेल्या विविध संस्थांच्या परस्पर सहयोग आणि सहकाऱ्याची गरज या वेळी व्यक्त केली. ‘सायबर सुरक्षा-२०२४ सारखा सराव या विषयातील सर्व तज्ज्ञांना एकत्र येऊन आपल्या अनुभवांची आणि प्रविण्याची देवाणघेवाण करण्यास आणि सायबर सुरक्षेच्या विषयात अधिक मजबूत यंत्रणा उभी करण्यास सहाय्यभूत ठरेल,’ असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. देशासमोर आज सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात विविध आव्हाने आहेत. या सरावाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या यंत्रणेमुळे त्याचा प्रभावीपणे सामना करता येत येईल, असेही त्यांनी सांगितले.

या सरावाच्या माध्यमातून सहभागी अधिकाऱ्यांचे सायबर सुरक्षा विषयक कौशल्य वाढविणे, त्यांचे सक्षमीकरण करणे, सायबर सुरक्षा विषयक तंत्रे आणि तंत्रज्ञानाची माहिती देणे, सायबर सुरक्षा विषयक उत्तम परिचालन विषयक बाबींची चर्चा करणे, या साठी ‘डिफेन्स सायबर एजन्सी’ने हा सराव आयोजित केला आहे. या माध्यमातून सायबर सुरक्षा विषयक एकात्म आणि मजबूत पावित्रा घेणे शक्य होईल. देशाचा सायबर सुरक्षा आराखडा तयार करण्यासठी संयुक्त नियोजन करता येईल, असे ‘डिफेन्स सायबर एजन्सी’ने म्हटले आहे. या सरावामुळे दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक होत असलेल्या सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय हित जपण्यासाठी सुरक्षा यंत्रांना अधिक परिणामकारकपणे काम करता येईल, असे मत व्यक्त होत आहे.

विनय चाटी

(‘पीआयबी’च्या ‘इनपुट्स’सह)


Spread the love
Previous articleडोनाल्ड ट्रम्प यांनाच देणार मत : निक्की हॅले यांची स्पष्टोक्ती
Next articleहवाईदलाच्या ‘सी१३०जे’ विमानाचे ‘नाइट व्हिजन गॉगल एडेड लँडिंग’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here