दलाई लामांचा पुनर्जन्म हा धार्मिक मुद्दा आहे, राजकीय खेळ नाही: माजी NSA

0

दलाई लामा यांच्या पुनर्जन्माचा आणि वंश परंपरेचा मुद्दा हा ‘धार्मिक विषय’ असून, ‘राजकीय खेळ (फुटबॉल)’ नाही, जो चीन आणि अन्य देश त्यांना हवा तसा खेळू शकतात (त्यामध्ये हस्तक्षेप करु शकतात)” असे वक्तव्य, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चिनमधील भारताचे माजी राजदूत शिवशंकर मेनन यांनी केले.

दलाई लामांनी तिबेटचे धार्मिक आणि राजकीय नेतृत्व स्विकारल्याच्या प्रसंगाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात मेनन म्हणाले की, “हे आम्हा भारतीयांचे सौभाग्य आहे की, आम्हाला दलाई लामा यांचा सहवास लाभला, त्यांची शिकवण, त्यांचे ज्ञान यामुळे भारताच्या सामाजिक बांधिलकीमध्ये सकारात्मक बदल झाला आहे.”

“66 वर्षांच्या कालावधीत, आम्ही त्यांच्यामुळे आम्ही तिबेटी संस्कृतीचे जतन करू शकलो. तिबेटी बौद्ध धर्माचा अभ्यास अखंड सुरू राहिला पाहिजे. दलाई लामा आणि तिबेटी बौद्ध धर्मामुळे जग अधिक चांगले झाले आहे,” असेही ते म्हणाले.

त्यांच्या मते, बीजिंगला तिबेटच्या प्रश्नासंदर्भात चीनबाहेरील जनमत बदलण्यात फारसे यश मिळालेले नाही. चीनने 1950 मध्ये तिबेटवर आक्रमण करून ताबा मिळवला आणि दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, असा दावा केला. या दाव्याला बाहेरील लोकांचा फारसा पाठिंबा नाही किंवा याबाबत विश्वासार्हता नाही.

मेनन म्हणाले की, “परमपूज्य दलाई लामा आणि तिबेटी लोकांच्या वर्तनामुळे, तिबेटच्या मुद्द्याला जी विश्वासार्हता मिळाली आहे, ती खरोखरच अविश्वसनीय आहे, असे मला वाटते. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि मला वाटते की, चीनसाठी हेच सर्वोत्तम उत्तर आहे.”

सेंट्रल तिबेटीयन ॲडमिनिस्ट्रेशनचे (CTA) अध्यक्ष – पेन्पा त्सेरिंग, जे निर्वासित तिबेट सरकारचे प्रतिनिधित्व करतात, ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

“सांस्कृतिकदृष्ट्या चीनसह इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत, आम्ही भारताच्या अधिक जवळ आहोत. तिबेटच्या मुद्द्यासंदर्भातील चीनच्या नरेटीव्ह्जना आम्ही आव्हान दिले पाहिजे. प्रत्येकाला तिबेटी इतिहासाचे बारकावे माहित असणे आवश्यक आहे, सगळेजण त्याला गृहीत धरतात. आम्ही तिबेटी इतिहासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. स्वतंत्र लोकांसाठी इतिहास कायम महत्त्वाचा असतो, पण आमच्यासारख्या निर्वासितांसाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतिहास अधिक महत्त्वाचा आहे,” असे मत त्सेरिंग यांनी यावेळी व्यक्त केले.

त्यांनी या वस्तुस्थितीवरही जोर दिला की, तिबेटी डायस्पोराची (स्थलांतरित तिबेटी समुदाय) इच्छा आहे की, जगभरात दलाई लामांनी वंश परंपरा चालू ठेवावी आणि उत्तराधिकारी निवडावा. याच कारणामुळे त्सेरिंग, ज्यांना तिबेटी भाषेत ‘सिक्योंग’ म्हणतात, त्यांनी सांगितले की, “दलाई लामांनी जुलै महिन्यात त्यांच्या 90व्या वाढदिवसाच्या सोहळ्यात घोषणा केली की, त्यांची वंश परंपरा केवळ सुरूच राहणार नाही, तर त्यांचे उत्तराधिकारी ‘स्वतंत्र देशात’ जन्माला येतील.”

त्यांनी जाहीर केले होते की, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याचा एकमेव अधिकार त्यांच्याद्वारे 2011 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘गादेन फोद्रांग ट्रस्टकडे’ आहे आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत चर्चा करण्यासाठी एक ‘विशिष्ट रचना’ तयार केली जाईल.

त्सेरिंग म्हणाले की, “चीन दलाई लामांच्या पुनर्जन्माचा मुद्दा एक राजकीय साधन म्हणून वापरत आहे. पुढील दलाई लामा एखाद्या महिला असू शकतात किंवा विद्यमान दलाई लामा हयात असतानाच त्यांचा उत्तराधिकारी निवडला जाऊ शकतो.”

– नियानिमा बासू

+ posts
Previous articleजहाजबांधणीपासून ते आईस-ब्रेकर्सपर्यंत, रशियाची भारताला सहकार्याची ऑफर
Next articleगाझा शांतता योजनेवरील संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला इंडोनेशियाचा पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here