ब्राझीलमध्ये नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, 20 लाख लोक प्रभावित

0
ब्राझीलमध्ये

ब्राझीलमध्ये भूकंपानंतर आलेल्या भीषण पुरामुळे मोठा विध्वंस झाला आहे. त्यातच रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण ब्राझीलमधील नद्यांच्या पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली. पुरामुळे आतापर्यंत 145 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे रिओ ग्रँड दो सुल येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेले दोन आठवडे सातत्याने बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी विविध शहरे आणि राजधानीच्या काही भागांमध्ये शिरले आहे.

या भीषण विध्वंसामुळे सुमारे 20 लाख लोक प्रभावित झाले आहेत. हवामानशास्त्रज्ञांनी या हवामान बदलाचा संबंध एल निनोशी जोडला आहे. सर्व प्रमुख नद्यांची पातळी वाढत असल्याची माहिती राज्य प्रशासनाने दिली. आतापर्यंत पुरामुळे 132 लोक बेपत्ता झाले आहेत तर 6 लाख 19 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे.

पोर्टो एलेग्रे येथील पुराच्या पाण्यात सोफा आणि इतर घरगुती वस्तू तरंगताना दिसून आल्या. साओ लिओपोल्डोमध्ये अनेक कार अर्ध्याच्यावर पाण्यात बुडाल्या होत्या. 36 वर्षीय इलेक्ट्रिशियन क्लाउडियो दा सिल्वा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शेजारच्या भागात गेला. त्याने सांगितले की पुरामुळे त्याचे स्वतःचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले, “माझ्या मेहुणाच्या बाजूच्या घरात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी भरले होते. पाण्याची पातळी आता थोडी कमी झाली आहे आणि तुम्ही दुसऱ्या मजल्यावर जाऊ शकता. पण या पुरामुळे सर्व काही बिघडून गेले आहे.”

50 वर्षीय अँटोनियो व्हेनझोन यांनी परिस्थिती अति गंभीर असल्याचे सांगितले आहे. “पाऊस थांबला नाही तर काय होईल? नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. पोर्टो एलेग्रेच्या दक्षिणेकडील पेलोटास शहरातील परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. सुमारे 14 लाख नागरिक विस्तापित झाले आहेत.

“सध्याच्या पूर परिस्थितीमध्ये मुख्य नद्यांच्या स्त्रोत, जे अजूनही पूर्ण भरले आहेत, त्या प्रदेशांमध्ये अजूनही पर्जन्यवृष्टी होत आहे,” असे हवामान खात्याने एका सार्वजनिक निवेदनात म्हटले आहे.

ब्राझील उष्णकटिबंधीय आणि ध्रुवीय वातावरणाच्या भौगोलिक संगम बिंदूवर आहे, त्यामुळे तिथे एकतर तीव्र पाऊस किंवा तीव्र दुष्काळ असा काहीसा हवामानाचा नमुना तयार होत असतो.

आराधना जोशी
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleनौदलाच्या एकात्मिक अधिकारी प्रशिक्षण अभ्यासक्रमातील अधिकाऱ्यांचे सागरी प्रशिक्षण पूर्ण
Next articleभारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here