L&TAdani DefenceSolar GroupGeneral Atomics MQ-9B SkyGuardian – Whatever the Mission, MQ-9B Delivers
Sunday, November 1, 2026
Solar
General Atomics MQ-9B SkyGuardian – Whatever the Mission, MQ-9B Delivers
Home Bharat Shakti Marathi इराणने फेटाळले ‘युद्धविरामाचे प्रस्ताव’, सूडाची भाषा कायम

इराणने फेटाळले ‘युद्धविरामाचे प्रस्ताव’, सूडाची भाषा कायम

0

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी अमेरिकेसोबतचा तणाव कमी करणे किंवा युद्धविराम यासंदर्भात आलेले प्रस्ताव फेटाळून लावले आहेत; दोन मध्यस्थ देशांमार्फत हे प्रस्ताव तेहरानपर्यंत पोहोचवण्यात आले होते, असे एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

संघर्षाबाबत कठोर भूमिका

खामेनी यांनी परराष्ट्र धोरणावरील आपल्या पहिल्याच बैठकीत अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध सूड घेण्याबाबत “अत्यंत कठोर आणि गंभीर” भूमिका मांडली, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले; मात्र, या बैठकीला खामेनी प्रत्यक्ष उपस्थित होते की नाही, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

युद्धाचा तिसरा आठवडा सुरू

इराणविरुद्धचे अमेरिका-इस्रायल युद्ध तिसऱ्या आठवड्यात पोहोचले असून, त्यात किमान 2 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हे युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. होर्मुझची सामुद्रधुनी मोठ्या प्रमाणावर बंदच आहे, कारण अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनी हा महत्त्वाचा जलमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली मदतीची विनंती फेटाळली आहे. दुसरीकडे ऊर्जेच्या किमती वाढल्या असून महागाईची भीती निर्माण झाली आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वोच्च नेत्याने म्हटले आहे की, “जोपर्यंत अमेरिका आणि इस्रायल गुडघे टेकायला भाग पाडत नाहीत, पराभव स्वीकारत नाहीत आणि नुकसान भरपाई देत नाहीत, तोपर्यंत शांततेसाठी ही योग्य वेळ नाही.”

14 मार्च रोजी तीन सूत्रांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की, इराण युद्ध संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राजनैतिक वाटाघाटी सुरू करण्याच्या मध्य-पूर्वेकडील मित्रराष्ट्रांच्या प्रयत्नांना ट्रम्प प्रशासनाने धुडकावून लावले आहे.

दरम्यान, इस्रायली क्षेपणास्त्र हल्ल्यातून मोजतबा कसे बचावले—ज्या हल्ल्यात त्यांचे वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य मारले गेले होते—याबाबतचे काही तपशील आता समोर येत आहेत.

हल्ल्याबाबतचे तपशील आले समोर

‘द टेलिग्राफ’च्या हाती आलेल्या एका ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार, 28 फेब्रुवारी रोजी इस्रायली ‘ब्लू स्पॅरो’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी मुज्तबा यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच, ते आपल्या वडिलांच्या आवारातील बागेत फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. इमारतीमधून काही काळासाठी बाहेर गेल्यामुळेच मुज्तबा यांचा जीव वाचला आणि त्यांच्या केवळ पायाला किरकोळ दुखापत झाली.

या हल्ल्यात मोजतबा यांची पत्नी झहरा हद्दाद-आदेल आणि त्यांचा मुलगा बाघर हे ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार खामेनी यांच्या लष्करी विभागाचे प्रमुख मोहम्मद शिराझी यांच्या मृतदेहाचे, “तुकडे-तुकडे” झाले होते.

या हल्ल्याचा उद्देश संपूर्ण खामेनी कुटुंबाला नेस्तनाबूत करणे हा होता. मुज्तबा आपल्या वडिलांच्याच घराच्या आवारात राहत असे; याच आवारात अली खामेनी भाषणे देत असलेले एक धार्मिक सभागृह आणि त्यांच्या इतर मुलांची निवासस्थाने देखील होती.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअफगाण रुग्णालयावरील ‘हिंस्र पाकिस्तानी हवाई हल्ल्याचा’ भारताने केला निषेध
Next articleनेपाळचे अल्पविकसित देशाकडून मध्यम-उत्पन्न गटाकडे संक्रमण, आव्हानांमध्ये वाढ