संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पोर्ट ब्लेअरमधील अंदमान आणि निकोबार कमांड (ANC) येथे धोरणात्मक संयुक्त कमांडच्या ऑपरेशनल (क्रियात्मक) तयारी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेतला. 2001मध्ये स्थापन झालेली, 21 वर्षीय लष्करी कमांड ही भारतातील पहिली आणि एकमेव इंटिग्रेटेड थिएटर कमांड आहे, जी हिंद महासागरी क्षेत्रात (IOR) सागरी कार्यकक्षेला सुरक्षितता प्रदान करते.
हिंद महासागर क्षेत्रात (IOR) वाढत्या चिनी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंद महासागरातील ही दूरची बेटे संपर्काच्या टप्प्यात असल्याचे राजनैतिक संकेत देण्याबरोबरच या दुर्गम बेटांवर तैनात असलेल्या सैन्याचे मनोधैर्य वाढवणे हे या भेटीमागचे उद्दिष्ट असल्याचे संरक्षण मंत्रालयाने (MoD) सांगितले.
अंदमान आणि निकोबार कमांडचे (CINCAN), कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल अजय सिंग यांनी संरक्षणमंत्र्यांना या क्षेत्राचे भौगोलिक-सामरिक महत्त्व समजावून देतानाच, भारताचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि या क्षेत्रातील लष्करी ऑपरेशन्सला पाठिंबा देण्यासाठी अंदमान आणि निकोबार कमांड काय भूमिका बजावू शकते याबद्दल माहिती दिली, असे संरक्षण मंत्रालयाकडून आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संरक्षणमंत्र्यांनी पोर्ट ब्लेअरमधील अंदमान आणि निकोबार कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली. पहिल्यांदाच या बेटांच्या दोन दिवसीय भेटीसाठी आलेल्या संरक्षणमंत्र्यांना सद्यस्थिती आणि या भागासाठी भविष्यकालीन योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी यावेळी दिले. नंतर पाळत ठेवणे, विविध उपक्रमांचे संचालन करणे आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट यासाठी एकात्मिक नियोजनाचे मुख्य केंद्र असलेल्या अंदमान निकोबार कमांडच्या जॉईंट ऑपरेशन्स सेंटरला (JOC) देखील त्यांनी भेट दिली आणि बेटांवर तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधला.
“आपली राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यात आणि सागरी क्षेत्र सुरक्षित ठेवण्यात अंदमान आणि निकोबार कमांडने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2001मध्ये स्थापन झाल्यापासूनच अंदमान आणि निकोबार कमांडने त्यांची ऑपरेशनल क्षमता वाढवली आहे,” असे सिंह यांनी सैन्याशी संवाद साधताना सांगितले.
सशस्त्र दलांचे धैर्य आणि समर्पण देशाचे सोनेरी भविष्य घडवेल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. देशाच्या सुरक्षेसाठी सशस्त्र दले ज्याप्रकारे सदैव तत्पर असतात, त्याचप्रमाणे सरकारही त्यांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी सैनिकांना दिली. सरकार सशस्त्र दलांची कार्यक्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
“आपल्या पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलले आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेला पूर्णत्व आणण्यासाठी आम्ही मोठी प्रगती केली आहे. आपले सशस्त्र दल लवकरच जगातील सर्वात बलाढ्य सैन्यांपैकी एक होईल. हेच आमचे व्हिजन आणि आमचे मिशन आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कॅम्पबेल बे येथे इंदिरा पॉइंटला भेट दिली. हे ठिकाण ग्रेट निकोबार बेटांचे दक्षिणेकडील टोक असून ते इंडोनेशियापासून 163 किमी रुंद सहा अंश चॅनेलने वेगळे केले आहे, ज्यातून मलाक्का सामुद्रधुनीपासून पश्चिमेकडे जाणारी सर्व जहाज वाहतूक होते. असा अंदाज आहे की, यामध्ये बहुतेक वेळा चिनी जहाजांचा समावेश असतो, त्यामुळे तो भारतासाठी एक महत्त्वाचा धोरणात्मक पॉईंट आहे. जानेवारी 2019नंतर संरक्षणमंत्र्यांनी इंदिरा पॉईंटला दिलेली ही पहिलीच भेट आहे.
(अनुवाद : आराधना जोशी)