संरक्षण सुधारणा हा पर्याय नाही तर सामरिक अनिवार्यता आहे: राजनाथ सिंह

0

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितले की, युद्ध स्वरूपातील जलद परिवर्तनामुळे, संरक्षण सुधारणा आता पर्यायी राहिल्या नाहीत, तर त्या भारतासाठी एक रणनीतिक गरज बनल्या आहे. नवी दिल्लीत आयोजित चाणक्य संरक्षण संवाद 2025 च्या अंतिम दिवशी बोलताना सिंह म्हणाले की, “भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारत आता भूतकाळातील युद्ध संरचनांवर अवलंबून राहू शकत नाही.” भारताला, संस्थात्मक अनुकूलता आणि तांत्रिक श्रेष्ठत्वाने सज्ज असलेल्या चपळ सशस्त्र दलांची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले.

“जग खूप वेगाने बदलत आहे आणि धोके अधिक जटिल होत आहेत,” असे सिंह यांनी ‘Resilient National Security @2047: The New Normal’ या शीर्षकाखालील त्यांच्या विशेष भाषणात नमूद केले. “सुधारणा आपल्या संरक्षण संस्थांची अनुकूलता वाढवतात, सशस्त्र दलांची गतिशीलता मजबूत करतात, आणि राष्ट्राला आपले भविष्य घडवण्याचा आत्मविश्वास देतात. या केवळ प्रशासनिक प्रक्रिया नाहीत, तर राष्ट्रीय परिवर्तनाच्या गतीला चालना देणाऱ्या आहेत,” असे सिंह यावेळी म्हणाले.

भविष्यासाठी सज्ज सैन्यासाठी सुधारणांचा मार्ग

भारत आपल्या सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण संरचनात्मक आणि धोरणात्मक सुधारणा लागू करत आहे, ज्यात मानवी संसाधन मॉडेलमध्ये सुधारणा करण्यासाठी, अग्निवीर भरती प्रणालीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, दलांचे एकत्रीकरण वाढवण्यासाठी आणि लष्करी ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्यासाठी कमांड्सचे थिएटरिझेशनकरण्याची योजना सुरू आहे, जरी त्याची प्रगती तुलनेने संथ आहे. भारत आपल्या संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्वायत्त प्रणाली आणि सायबर क्षमतांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यालाही गती देत ​​आहे.

सिंह यांनी भाषणादरम्यान अधोरेखित केले की, युद्ध आता केवळ पारंपारिक रणांगणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. युक्रेनपासून ते मध्य पूर्वेपर्यंत सुरू असलेल्या संघर्षांनी आर्थिक अवलंबित्व, डिजिटल नेटवर्क्स आणि तांत्रिक असुरक्षांचा निर्णायक प्रभाव दाखवून दिला आहे.

“आर्थिक परस्परावलंबित्व, ज्यामुळे एकेकाळी जगाला आत्मविश्वास मिळाला होता, आता ते पुरवठा साखळी आणि गंभीर तंत्रज्ञानामध्ये असुरक्षितता घेऊन आले आहे,” असा धोक्याचा इशारा देत त्यांनी संरक्षण, अर्थव्यवस्था आणि समाज या सर्व क्षेत्रांत लवचिकतेची गरज अधोरेखित केली.

शत्रूंना स्पष्ट संदेश

भारताच्या सुरक्षा वातावरणाचा संदर्भ देत सिंह म्हणाले की, नवी दिल्ली आता आपल्या शेजारच्या आव्हानांबद्दल सतर्क आहे.

“दहशतवाद, अतिरेकी घटकांना सीमेपलीकडून पाठिंबा, सध्याची स्थिती बदलण्याचे प्रयत्न, सागरी दबाव आणि माहिती युद्ध या अशा वास्तविकता आहेत, ज्यांचा सामना करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. भारताच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेशी कोणताही समझोता केला जाणार नाही,” असे त्यांनी घोषित केले.

संवादातील प्रमुख मुद्दे: स्वायत्तता, सिद्धांत आणि तंत्रज्ञान

इंडियन आर्मीने, सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीजच्या भागीदारीत आयोजित केलेल्या या दोन दिवसीय संवादामध्ये, अनेक मुत्सद्दी, लष्करी नेते आणि धोरणात्मक विचारवंत एकत्र आले होते.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य, राजदूत डी.बी. व्यंकटेश वर्मा यांनी विशेष भर देत सांगितले की, जर भारताकडे स्वतंत्रपणे विचार करण्याची, कार्य करण्याची आणि लढण्याची इच्छाशक्ती आणि क्षमता असेल, तरच धोरणात्मक स्वायत्ततेला अर्थ प्राप्त होतो. त्यांनी लवचिक लष्करी-औद्योगिक आधार सुनिश्चित करण्यासाठी उच्च संरक्षण खर्च, जलद सुधारणा, मजबूत संशोधन आणि विकास, आणि बाह्य अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन केले.

माजी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य, राजदूत पंकज सरन यांनी आधुनिक युद्धाचा केंद्रबिंदू म्हणून तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. 2018 मध्ये, NSCS मध्ये समर्पित तंत्रज्ञान विभागाची स्थापना हा टप्पा असल्याचे सांगत त्यांनी भारताने अत्याधुनिक नवकल्पनांना अनुसरून सिद्धांतांमध्ये बदल करण्याची गरज व्यक्त केली.

रणांगणातील समतोल साधक आणि भविष्यकालीन युद्ध

समारोपाच्या सत्रांमध्ये, युद्धभूमीतील समतोल राखण्यासाठी आवश्यक विघटनकारी तंत्रज्ञान, एआय, हायपरसॉनिक्स, स्वायत्त प्लॅटफॉर्म आणि सायबर साधने या घटकांवर चर्चा करण्यात आली. तज्ञांनी संयुक्तता, बेट सुरक्षा आणि संज्ञानात्मक युद्ध यावरही चर्चा केली आणि भारताच्या दलांना एकात्मिक, चपळ आणि आधुनिक बनवण्यासाठी आवश्यक परिवर्तन निश्चित केले.

व्हिजन 2047

भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्या शताब्दी वर्षाची तयारी करत असताना, चाणक्य संरक्षण संवादाने एका मध्यवर्ती संदेशावर जोर दिला: ज्यात, 21 व्या शतकातील राष्ट्रीय शक्ती ही केवळ मनुष्यबळ आणि हार्डवेअरवर आधारित न राहता, संस्था, नवकल्पना आणि एकात्मिक संरक्षण सज्जतेवर आधारित असेल.

राजनाथ सिंह यांचा संदेश स्पष्ट होता की: भारताचे लष्करी परिवर्तन ही केवळ एक आकांक्षा नसून, अत्यावश्यक गरज आहे, जी पुढील दोन दशकांतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक सुरक्षित आणि आत्मविश्वासू राष्ट्र घडवण्यासाठी अनिवार्य आहे.

मूळ लेखक- रवी शंकर

+ posts
Previous articleझेलेन्स्की यांच्या चीफ ऑफ स्टाफच्या निवासस्थानी युक्रेनी अधिकाऱ्यांचा छापा
Next articleRussia’s Sabotage War Confronts a Hesitant Europe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here