संरक्षण सचिवांनी केले ओखा येथील हॉवरक्राफ्ट देखभाल युनिटचे उद्घाटन

0
Defence Secretary

संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी 28-29 मार्च 2024 रोजी उत्तर पश्चिम प्रांतातील भारतीय तटरक्षक दलाच्या सुविधांना भेट दिली. भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) सुविधा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेणे हे त्यांच्या भेटीचे उद्दिष्ट होते. आपली कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी भारतीय तटरक्षक दल पायाभूत सुविधा सोबतच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असल्याची खात्री यावेळी संरक्षण सचिवांनी केली.

या भेटीदरम्यान, ओखा येथील हॉवरक्राफ्ट देखभाल युनिटच्या पायाभूत सुविधांच्या उद्घाटनाबरोबरच इनाझ व्हिलेज वेरावळ येथील तटरक्षक दलातील अविवाहित आणि विवाहित कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या निवासस्थानाचेही उद्घाटन करण्यात आले.

संरक्षण सचिवांना ओखा येथे लवकरच सुरु होणाऱ्या 200 मीटर आयसीजी जेट्टीच्या  बांधकामाबद्दल देखील माहिती देण्यात आली. आपल्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय सागरी हितांचे रक्षण करण्यात तटरक्षक दलाने  बजावलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही भेट केवळ भारतीय तटरक्षक दल अत्याधुनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारची असणारी वचनबद्धताच अधोरेखित करत नाही तर भारतीय तटरक्षक दलाच्या महत्त्वपूर्ण योगदानाला मान्यता आणि महत्त्व देखील देते.

गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या उथळ आणि पाणथळ भागात, कच्छ आखाताच्या अधिकार क्षेत्रातील 50 बेटांवर देखरेख ठेवण्यासाठी ओखा आणि जाखाऊ येथे  हॉवरक्राफ्ट तैनात आहेत. मात्र, उथळ पाणी आणि दलदलीचा भूप्रदेश यामुळे या हॉवरक्राफ्टची देखभाल आणि सांभाळ करणे आव्हानात्मक बनते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी हॉवरक्राफ्ट देखभाल युनिटची क्षेत्रीय सुविधा स्थापन करण्यात आली आहे. या देखभाल सुविधेमुळे हॉवरक्राफ्ट्सना वेळेवर तांत्रिक मदत पुरवणे तसेच  दुरुस्ती आणि देखभाल करणे शक्य होईल. परिणामी परिचालन उपलब्धता सुनिश्चित होईल आणि कधीही आवश्यकता भासल्यास ते सज्ज स्थितीत ठेवता येईल.

इनाझ व्हिलेज वेरावळ येथील तटरक्षक दल निवासी क्षेत्रात विवाहितांसाठी 60 निवासस्थाने , सर्व ऋतूंमध्ये कार्यरत हेलिपॅड, कनिष्ठ अधिकारी आणि नाविकांसाठी राहण्याची सोय, परेड मैदान आणि एक खानावळ यांचा समावेश आहे. हेलिपॅडमुळे वेरावळमधील विविध मोहिमांमध्ये सामरिक फायदा होईल, सागरी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तसेच शोध आणि बचाव मोहिमा तसेच पाळत ठेवण्यात मदत मिळेल.

आयसीजी प्रादेशिक मुख्यालय (उत्तर पश्चिम) ची स्थापना 16 डिसेंबर 2009 रोजी गांधीनगर येथे झाली. ते गुजरात, दमण आणि दीवमधील सागरी क्षेत्रांमध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या अनिवार्य चार्टरची अंमलबजावणी करते.बर्थिंग आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासावर भारतीय तटरक्षक दलाचा विशेष भर असतो कारण यातून प्रगत पृष्ठभाग आणि हवाई प्लॅटफॉर्म परिचालनासाठी सुसज्ज सुविधांसाठी असणारी त्यांची वचनबद्धता अधोरेखित होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलाकडे सध्या वडिनार येथे नुकत्याच उद्घाटन झालेल्या जेट्टी व्यतिरिक्त, पोरबंदर येथे 100 मीटर जेट्टी विस्तार, मुंद्रा येथे 125 मीटर जेट्टी आणि ओखा येथे 200 मीटर जेट्टी बांधली जात आहे.

या सुविधांच्या उद्घाटनामुळे आय. सी. जी. ची क्षमता अधिक बळकट करण्यासाठी आणि त्याची परिचालन सज्जता वाढवण्यासाठी खूप मदत होईल. आपल्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे इतके मजबूत आणि कार्यक्षम सागरी दल असल्याचा देशाला अभिमान आहे. संरक्षण सचिवांचा हा दौरा देशाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.

रवी शंकर


Spread the love
Previous articleDefence Secretary Inaugurates Indian Coast Guard’s Hovercraft Maintenance Unit At Okha
Next articleपॅरिस ऑलिम्पिकसाठी फ्रान्सने मागितली परदेशी पोलीस आणि लष्कराची मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here