भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. या ऐतिहासिक क्षणी भारतीय संरक्षण दलाने देखील आत्मनिर्भरतेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. संरक्षणातील तिन्ही दलांनी लक्षणीय कामगिरी केली आहे आणि त्यात देशांतर्गत उद्योगांकडून मोलाची साथ मिळाली आहे. त्यामुळे आतापर्यंत आयातीवर पूर्णपणे अवलंबून असलेला आपला भारत निर्यातीतही स्वत:चे स्थान निर्माण करत आहे.
स्वदेशी बनावटीचे लेझर-गायडेड रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र
महाराष्ट्रात अहमदनगर येथील आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस) यांच्या सहकार्याने केके चाचणी केंद्र येथे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रमुख युद्ध रणगाडा (एमबीटी) अर्जुनच्या माध्यमातून स्वदेशी बनावटीच्या लेझर-गायडेड रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची (एटीजीएम) यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्रांनी अचूक मारा करत दोन वेगवेगळ्या पल्ल्यांवरील लक्ष्ये यशस्वीपणे भेदली. टेलिमेट्री प्रणालीने क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणाची समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे. सध्या एमबीटी अर्जुनच्या 120 मिमी रायफल गनमधून या क्षेपणास्त्रांच्या तांत्रिक मूल्यमापन चाचण्या सुरू आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेझर गायडेड रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ आणि भारतीय लष्कराची प्रशंसा केली आहे. संरक्षण संशोधन आणि विभागाचे विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी या चाचणीशी संबंधित चमूचे अभिनंदन केले आहे.
स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ विमानाविषयी विविध देशांना स्वारस्य
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) लाइट कॉम्बॅट विमान (LCA) म्हणजेच वजनाने हलक्या असलेल्या लढाऊ विमानाच्या श्रेणीतील स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांसाठी रॉयल मलेशियन एअर फोर्स (आरएमएएफ), मलेशियाने स्वारस्य दाखविले आहे. याशिवाय या तेजस विमानांसाठी अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, यूएसए, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स हे देखील इच्छुक आहेत.
भारताचे आरमारी बलस्थान : आयएनएस विक्रांत
आयएसी1 ही विमानवाहू नौका भारतीय नौदलाच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 किंवा 15 ऑगस्ट 2022 रोजी ही नौका राष्ट्राला अर्पण करण्याची शक्यता आहे. आपल्या पहिल्या नौकेच्या स्मरणार्थ या नव्या नौकेचे नाव आयएनएस विक्रांत ठेवण्यात येणार आहे. मिग-29, तेजस यासारखी नौदलाची विमाने, एएलएच ध्रुव, कामोव यासारखी हेलिकॉप्टर त्यावर तैनात असू शकतात.
कोचिन शिपयार्डमध्ये बांधणी झालेली ही नौका स्वदेशी बनावटीची आहे. त्यात सहभागी असलेल्या कंपन्या या सर्व भारतीयच आहेत. यात जवळपास 76 टक्के सुटे भाग स्वदेशी आहेत. स्वत:च्या विमानवाहू नौकेचे डिझाइन तयार करून बांधणी करणारा भारत हा जगातील सहावा-सातवा देश आहे. अशा नौकांसाठी विशेष स्टीलची गरज असते, पण ते बाहेरून न मागवता स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियानेच तयार केले आहे. यासाठी तब्बल 21 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. 18 मजली या जहाजात 1500 मीटरच्या केबलचा वापर करण्यात आला आहे. त्यावर जवळपास 1500 क्रू मेंबर असतील. अशा या महाकाय नौकेमुळे भारताची सागरी सीमा नक्कीच भक्कम होईल.