भूराजकीय अनिश्चितता असूनही, भारत-रशिया संरक्षण संबंध मजबूत: संरक्षणमंत्री

0
सिंह
मोदी-पुतिन शिखर परिषदेपूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत, त्यांचे रशियन समकक्ष आंद्रेई बेलौसोव्ह यांच्याशी चर्चा केली.

भारताने गुरुवारी, रशियासोबत दशकांपासून चालत आलेल्या आपल्या संरक्षण भागीदारीची सातत्यता आणि लवचिकता यावर भर दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घोषणा केली की, “भू-राजकीय अनिश्चितता असूनही, दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य मजबूत राहिले आहे. 23 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आगमन होण्याच्या काही तासांपूर्वी, नवी दिल्ली येथे झालेल्या सैन्य आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरील भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या (IRIGC-M&MTC) 22 व्या बैठकीत त्यांनी ही टिप्पणी केली.

रशियाचे आपले समकक्ष आंद्रेई बेलौसोव्ह यांना संबोधित करताना, सिंह यांनी मॉस्कोचे वर्णन “काळाची कसोटी उत्तीर्ण केलेला, विशेषाधिकार-प्राप्त, धोरणात्मक भागीदार” असे केले आणि 2000 पासूनच्या भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी करारानंतर, द्विपक्षीय संरक्षण सहकार्य सातत्याने कसे विस्तारत आहे, याकडे लक्ष वेधले.

ANI वृत्तसंस्थेनुसार, सिंह म्हणाले की, “ही चांगली बाब आहे की, भू-राजकीय अनिश्चितता असूनही, भारत-रशिया संरक्षण सहकार्य चांगल्या गतीने पुढे जात आहे.” त्यांनी यावेळी सशस्त्र दले आणि संरक्षण तज्ञांमधील परिणाम-केंद्रित देवाणघेवाणीवरही प्रकाश टाकला, तसेच गेल्या महिन्यात व्यापार सहकार्यावरील कार्यगटाची बैठक आणि यूरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटींची झालेली सुरुवात, यासह वाढत असलेल्या आर्थिक सहकार्याचाही उल्लेख केला.

ते पुढे म्हणाले की, “भारत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीची उत्सुकतेने वाट पाहत होता, ही त्यांची चार वर्षांहून अधिक काळानंतरची; युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासूनची पहिलीच भारत भेट आहे.”

धोरणात्मक संरक्षण भागीदारीत रशियाकडून सातत्याचे संकेत

आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवताना, रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव्ह यांनी सिंह यांच्या टिप्पणीला दुजोरा दिला आणि लष्करी सहकार्य सर्व सेवांमधील संबंध व्यापक राहिले असल्याचे नमूद केले.

भारतीय नौदल दिनानिमित्त शुभेच्छा देताना बेलौसोव्ह म्हणाले की, “लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या नवीन दृष्टिकोनाच्या निर्मितीमध्ये रशिया भारतासोबत पूर्ण स्तरावर सक्रियपणे सहकार्य करत आहे.” संयुक्त आयोग संरक्षण क्षेत्रात प्रभावी आणि परस्पर फायदेशीर निर्णय घेणे सुरूच ठेवेल, असेही ते म्हणाले.

दिवसाच्या सुरुवातीला, सिंह आणि बेलौसोव्ह यांनी, राष्ट्रीय युद्ध स्मारकावर श्रद्धांजली अर्पण केली, त्यानंतर रशियन मंत्र्यांनी त्रिकोणीय सेवा सन्मान रक्षकाची (Tri-Service Guard of Honour) तपासणी केली. पालम एअर फोर्स  तळावर, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत, बेलौसोव्ह यांचे स्वागत करण्यात आले.

पुतिन यांचे दिल्लीत आगमन, संरक्षण-केंद्रित शिखर परिषदेचे आयोजन

गुरुवारी संध्याकाळी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे दिल्लीत आगमन झाले आणि पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी औत्सुक्यपूर्ण हस्तांदोलन करत एकमेकांना मिठी मारली, त्यानंतर ते एकाच गाडीतून खासगी भोजनासाठी, लोक कल्याण मार्ग (7) च्या दिशेने रवाना झाले. पुतिन यांच्या भेटीकडे, शुक्रवारी होणाऱ्या औपचारिक चर्चेची दिशा निश्चित करण्याची संधी म्हणून पाहिले जात आहे.

पुतिन यांची 2021 नंतरची, ही पहिली भारत भेट अशावेळी होत आहे, जेव्हा भू-राजकीय संबंध वेगाने बदलत आहेत आणि वॉशिंग्टन नवी दिल्लीवर मॉस्कोसोबतचे आपले संरक्षण संबंध पुन्हा समायोजित करण्यासाठी दबाव आणत आहे. सिंह यांच्या “भू-राजकीय अनिश्चितता असूनही” सहकार्याबद्दलच्या स्पष्ट टिप्पणीकडे, काही परराष्ट्र धोरण निरीक्षकांनी एक सूचक संदेश म्हणून पाहिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य पुनरागमनासह अमेरिकेतील राजकीय बदलांची पर्वा न करता, भारताची धोरणात्मक स्वायत्तता कायम आहे.

दुसऱ्या दिवसाचा अजेंडा: संरक्षण खरेदी, फायटर जेट्स आणि युक्रेनवर लक्ष केंद्रित

शुक्रवारी, पुतिन यांच्या अधिकृत वेळापत्रकात राष्ट्रपती भवनातील औपचारिक स्वागत, राजघाटावर पुष्पहार अर्पण, हैदराबाद हाऊस येथे मोदींसोबत द्विपक्षीय शिखर बैठक, संयुक्त पत्रकार परिषद, भारतीय उद्योगपतींशी संवाद आणि मॉस्कोला रवाना होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट, या सर्व कार्यक्रमांचा समावेश आहे. मोदी आणि पुतिन यांच्यातील चर्चेत, प्रामुख्याने संरक्षण सहकार्यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये IRIGC चौकटीतील प्रलंबित प्रकल्प, रशियन-निर्मित प्लॅटफॉर्मची देखभाल आणि आधुनिकीकरण, सह-उत्पादन संधी आणि संभाव्य अधिग्रहण मार्गांचा समावेश आहे.

क्रेमलिनने संकेत दिले आहेत की, S-400 आणि S-500 हवाई संरक्षण प्रणाली आणि Su-30 सह, केंद्रस्थानी असलेल्या प्रमुख प्रणालींच्या श्रेणी, आणि पाचव्या पिढीचे फायटर जेट Su-57 देखील चर्चेचा विषय असू शकतात. यावेळी पुतिन युक्रेन युद्धविरामाच्या नवीन राजनैतिक प्रयत्नांची मोदींना  माहिती देखील देऊ शकतात.

मूळ लेखक- रवी शंकर

+ posts
Previous article2024 मध्ये जगभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ: WHO अहवाल
Next articleपुतिन यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, भारत-रशियातील स्थिर भागीदारीचा पुनरुच्चार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here