‘धुरंधर’: पाकिस्तानातील अराजकतेच्या विविध छटा उलगडणारा चित्रपट

0

निर्माता-दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक नवे विक्रम रचत असून, या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 450 हून अधिक कोटींचा टप्पा पार केला आहे. यावर सिंध प्रांताच्या सरकारमधील एका पाकिस्तानी मंत्र्याने आपली नाराजी व्यक्त करत, धुरंधरला प्रत्युत्तर देणारा एक ‘काउंटर-सिनेमा’ काढणार असल्याची घोषणा केली आहे.

तो चित्रपट बनेल तेव्हा बनेल, मात्र “सद्य स्थितीत ‘धुरंधर’ सारखा वास्तवादी चित्रपट नाही,” असे मत स्ट्रॅटन्यूज ग्लोबलचे मुख्य संपादक नितीन गोखले यांनी व्यक्त केले आहे. ‘द जिस्ट’ या कार्यक्रमात, गोखले यांनी ‘धुरंधर’विषयीचे आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “हा चित्रपट म्हणजे पाकिस्तानमधील टोळी युद्धांचे चित्रण आहे. त्यातील काही पात्रे वास्तविक जीवनातही खूप प्रसिद्ध आहेत.”

चित्रपटाचे केंद्रस्थान असलेले कराचीतील ल्यारी (लियारी) शहर आजही अस्तित्वात आहे, जे एकेकाळी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी झालेल्या संघर्षांची एक विद्रुप रणभूमी बनले होते. चित्रपटात, 2008 मधील मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आयएसआय मेजर इक्बाल सारख्या पात्रांनाही दाखवले गेले आहे.

“चित्रपट पाहताना तुमचे लक्ष पूर्णपणे पडद्यावर खिळलेले राहते, कारण त्याची पटकथा खूप कसदार आहे,” असे गोखले म्हणतात. ते सांगतात की, “यामधील हिंसाचार शैलीबद्ध पद्धतीने दाखवला गेला आहे, परंतु सोबतच त्यांनी रक्त-मांसाचे प्रदर्शन करणेही टाळलेले नाही. (उदा. शिरच्छेद करणे वगैरे) याहून अधिक रंजक बाब म्हणजे, त्यांनी आपले कथानक भारत आणि पाकिस्तानमधील काही वास्तविक घटनांशी जोडले आहे. उदा., कंदहार विमान अपहरणाची घटना आणि अजित डोवाल यांच्याशी मिळती जुळती व्यक्तीरेखा इत्यादी.”

हा चित्रपट, भारत आणि पाकिस्तानमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पारंपारिक बॉलिवूड चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे.

गोखले यांनी सांगितले की, “बॉलीवूडने नेहमीच पाकिस्तानची वास्तववादी मांडणी करणे, तो जसा आहे तसा दाखवणे टाळले आहे. तर दुसरीकडे, ‘धुरंधर’ मध्ये अन्य बॉलीवूड सिनेमांप्रमाणे ‘मंकी बॅलन्सिंग’ (दोन शत्रूंमधील प्रत्यक्ष लढाई) दाखवणे टाळले आहे, जे आपल्याला बजरंगी भाईजान किंवा एक था टायगरमध्ये पाहायला मिळते.”

‘धुरंधर’ कराचीमधील राजकीय पक्ष आणि लियारीच्या टोळ्यांमधील संबंधांवर वास्तववादी भाष्य करतो, भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी एकत्र आलेल्या आयएसआय आणि डकैत टोळीच्या संगनमताचा कुरूप चेहरा उघड करतो.

चित्रपटात, डिसेंबर 1999 मधील कंदहार विमान अपहरण, मुंबईतील दहशतवादी हल्ला यापासून, ते अगदी पाकिस्तानात छापल्या गेलेल्या बनावट भारतीय चलनी नोटांचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत, ज्या गोष्टी आजही अनेक लोकांच्या स्मरणात आहेत आणि ज्या वास्तवात घडल्या आहेत.

‘धुरंधर’ अशा वास्तववादी विषयांवरील आणखी अनेक चित्रपटांसाठी ट्रेंडसेटर ठरू शकतो, जसे की 1979 मध्ये पाकिस्तानी राजकारणी झुल्फिकार अली भुट्टो यांना दिलेली फाशी, किंवा डिसेंबर 2007 मध्ये रावळपिंडीतील सभेत त्यांची कन्या बेनझीर यांची झालेली हत्या.

याहून महत्वाचे म्हणजे, भारतातील या नव्या पिढीला, 1979 मध्ये सुरू होऊन 1985 मध्ये संपलेल्या आसाम आंदोलनामागची तथ्ये किंवा 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टारमागची खरी कहाणी माहिती करून देणे आवश्यक आहे, आपल्याकडे अशा अनेक सांगण्याजोग्या वास्तवादी कथा आहेत.

संकलन- सूर्या गंगाधरन

+ posts
Previous articleट्रम्प यांचा BBC वर मानहानीचा खटला, 10 अब्ज डॉलर्सच्या भरपाईची मागणी
Next articleभारताने बांगलादेश निवडणुकीच्या कोणत्याही निकालाचे समर्थन करावे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here