भारताचा मोठा राजनैतिक विजय झाला आहे. इराणने अलीकडेच कब्जात घेतलेल्या इस्रायलच्या जहाजावरील कर्मचाऱ्यांपैकी पाच भारतीय नाविकांची सुटका केली आहे.
हे पाचही भारतीय नाविक आज संध्याकाळी इराणहून भारतात परत येण्यासाठी निघणार आहेत. भारतीय दूतावासाने त्यांच्या सुटकेचा तपशील प्रसिद्ध करत असताना, बंदर अब्बास येथील दूतावास आणि भारतीय वाणिज्य दूतावासाशी सातत्याने समन्वय साधल्याबद्दल इराणी अधिकाऱ्यांचे आभार मानले.
5 of the Indian sailors on MSC Aries have been released and departed from Iran today evening. We appreciate the Iranian authorities for their close coordination with the Embassy and Indian Consulate in Bandar Abbas.
— India in Iran (@India_in_Iran) May 9, 2024
“एमएससी एरीजवरील 5 भारतीय नाविकांची आज संध्याकाळी इराणहून सुटका करण्यात आली असून ते भारतात परत येण्यासाठी निघाले आहेत. बंदर अब्बास येथील दूतावास आणि भारतीय वाणिज्य दूतावासाशी जवळून समन्वय साधल्याबद्दल आम्ही इराणी अधिकाऱ्यांचे कौतुक करतो “, असे परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर पोस्ट केले.
13 एप्रिल रोजी इराणने इस्रायलचे मालवाहू जहाज ताब्यात घेतले. या जहाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये 17 भारतीय नागरिक होते.
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स नेव्हीने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्रायली मालकीचे जहाज एमएसएसी एरीज ताब्यात घेतले. हे जहाज होरमुझच्या सामुद्रधुनीतून दुबईला जात होते. हे जहाज परवानगीशिवाय आपल्या सागरी हद्दीतून जात असल्याचा आरोप इराणने केला.
13 एप्रिल रोजी इराणने ताब्यात घेतलेल्या इस्रायली मालवाहू जहाज ‘एमएससी एरीज’च्या 17 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी केरळच्या त्रिशूर येथील एन टेसा जोसेफ 18 एप्रिल रोजी सुरक्षितपणे आपल्या मायदेशी परतली.
“ताब्यात घेतलेल्या जहाजावरील एक मुलगी भारतात परतली आहे. आम्ही उर्वरित 16 कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी दूतावास प्रवेश मागितला होता आणि आम्हाला तो मिळाला. आमच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांची प्रकृती चांगली असून जहाजावर कोणत्याही प्रकारची समस्या नाही. त्यांच्या परत येण्यासंदर्भात, काही तांत्रिक बाबी आणि कंत्राटी जबाबदाऱ्या आहेत. त्या पूर्ण झाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या परत येण्याबाबत निर्णय घेतला जाईल,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 25 एप्रिल रोजी झालेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले होते.
भारतातील इराणी राजदूत इराज इलाही यांनीही म्हटले होते की, भारतीय नागरिक, एमएससी एरीजचे कर्मचारी, यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही आणि ते जाण्यास मोकळे आहेत.
कंटेनर जहाजावर कब्जा मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियन यांच्याशी चर्चा केली आणि 17 भारतीय कर्मचाऱ्यांच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला होता.
इराणच्या प्रादेशिक जलक्षेत्रात ताब्यात घेतलेल्या जहाजाच्या संदर्भात आणि कर्मचाऱ्यांच्या सुटकेबाबत एस्टोनियन बाजूच्या विनंतीला उत्तर देताना अमीराबदोल्लाहियन म्हणाले, “इराणच्या प्रादेशिक जलक्षेत्रात रडार बंद करून नौवहन सुरक्षेस धोका निर्माण करणाऱ्या जहाजाला न्यायालयीन नियमांनुसार ताब्यात घेण्यात आले आहे.”
अमीरबदोल्लाहियन यांनी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सागरी सुरक्षा राखण्यासाठी सर्व जहाजांद्वारे सागरी नीतीनियमांचे पालन करणे आवश्यक आणि अपरिहार्य आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराण आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणाव वाढला.
आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सवर आधारित)