युक्रेन ड्रोनचा 1500 किलोमीटरवरून रशियाच्या तेल प्रकल्पावर हल्ला

0
1
युक्रेन
'सोकिल' (फाल्कन) हे कॉल चिन्ह असलेल्या 28व्या सेपरेट मॅकेनाइज्ड ब्रिगेडचा युक्रेनियन सैनिक, 3 मे 2024 रोजी युक्रेनच्या डोनेट्स्क प्रदेशातील प्रशिक्षण मैदानावर चाचणी उड्डाणादरम्यान एफपीव्ही ड्रोन चालवताना. (व्हॅलेंटिन ओगिरेन्को/रॉयटर्स)

लंडनः युक्रेनच्या ड्रोनने गुरुवारी सुमारे 1500 किमी दूरून रशियाच्या बश्किरिया प्रदेशातील एका मोठ्या तेल प्रक्रिया प्रकल्पावर हल्ला केला. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनकडून करण्यात आलेला हा सर्वात प्रदीर्घ पल्ल्याचा ड्रोन हल्ला आहे.

युक्रेनने दक्षिण रशियातील दोन तेल साठ्यांवरही हल्ला केला. रशियाच्या महत्त्वाच्या ऊर्जा सुविधांवर हल्ला करून आपल्या भूमीवरील रशियन सैन्याला कमकुवत करण्याचा युक्रेन प्रयत्न करत आहे. जवळच्या क्रिमिया द्वीपकल्पावर असणाऱ्या रशियन सैनिकांना इंधन पुरवठ्यासाठी हे डेपो ट्रान्सशिपमेंट पॉईंट्स होते, असे एका सूत्राने सांगितले.

बश्किरियामधील गॅझप्रॉमच्या नेफ्टेखिम सलावत तेल प्रक्रिया, पेट्रोकेमिकल आणि खत संकुलातील पंपिंग स्टेशनचे ड्रोन हल्ल्यात नुकसान झाले. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था आरआयएने सांगितले की, हा रशियाचा अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रकल्प आहे.


हल्ल्यानंतरही प्रकल्प नेहमीप्रमाणे कार्यरत असल्याचे या प्रदेशाच्या राज्यपालांनी सांगितले. युक्रेनचा सर्वात जवळचा सरकारी ताब्यात असलेला भाग सुमारे 1,400 किमी दूर आहे.

युक्रेनच्या एका सूत्राने सांगितले की ड्रोनने 1,500 किमी अंतराचे ‘विक्रमी’ उड्डाण केले आणि उत्प्रेरक क्रॅकिंग युनिटला धडक दिली. यातून हे सिद्ध झाले की “लष्करी संकुलांना सेवा देणारे रशियन तेलशुद्धीकरण कारखाने आणि तेल डेपो कितीही सुरक्षित वातावरणात असले तरी ड्रोनमुळे ते तसे नाहीत हेच सिद्ध झाले.”

अशा हल्ल्यांचे ‘दहशतवादी हल्ले’ म्हणून वर्णन करताना, या हल्ल्यांचा ‘बदला घेण्यासाठी’ रशियाने मार्चच्या मध्यापासून युक्रेनच्या ऊर्जेशी संबंधित पायाभूत सुविधांवर प्रतिहल्ले सुरू केले आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीपासून युक्रेनने रशियातील तेल प्रक्रिया सुविधांवरील ड्रोन हल्ले वाढवले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला नाटोने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, या हल्ल्यांमुळे रशियाची 15 टक्के तेल शुद्धीकरण क्षमता विस्कळीत झाली आहे.

ड्रोन हल्ल्यात नुकसान झालेल्या काही प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्पांची रशियाने दुरुस्ती केली आहे. ज्यामुळे हल्ल्यांचा परिणाम काहीसा कमी झाला आहे.
रशियाच्या क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या विशाल श्रेणीशी बरोबरी करू न शकल्याने, युक्रेनने लांब पल्ल्याचे ड्रोन विकसित करून तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जेणेकरून ते रशियावर पलटवार करू शकतील.

देशाच्या शस्त्रास्त्र उत्पादकाच्या प्रमुखांनी बुधवारी सांगितले की युक्रेन रशियाइतकेच खोलवर हल्ला करणारे ड्रोन तयार करत आहे.

याआधी एप्रिल महिन्यात युक्रेनियन स्पेशल फोर्सने रशियाच्या 8 भागात लांब पल्ल्याच्या ड्रोनने हल्ला केला होता. या हल्ल्यात रशियातील तीन वीज उपकेंद्र आणि इंधन डेपोला आग लागली होती. या हल्ल्यात दोन नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले होते.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)

 


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here