डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये केलेला प्रवेश उपस्थितांच्या चांगलाच लक्षात राहिला. शनिवारी एका सभेमध्ये त्यांच्या हत्येच्या हेतूने चालवण्यात आलेल्या गोळीने त्यांच्या उजव्या कानाला दुखापत झाली. या घटनेनंतर दोनच दिवसांनी पक्षाच्या निष्ठावंतांकडून ट्रम्प यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
उजव्या कानावर जाड पट्टी बांधलेल्या ट्रम्प यांनी मिलवॉकीच्या डाउनटाउनमधील फिसर्व्ह फोरममध्ये प्रवेश केला तेव्हा उपस्थितांनी हाताच्या मुठी वळत “लढा! लढा! लढा!” अशा घोषणा दिल्या. कानाला गोळी लागल्यानंतर मंच सोडून जाण्याआधी ट्रम्प यांनी दिलेल्या प्रतिक्रियेशी संबंधित अशा या घोषणा होत्या.
डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थितांसाठी “धन्यवाद” असे शब्द उच्चारले आणि नंतर ते काही मुले आणि अमेरिकेचे सेनेटर जे. डी. व्हान्स यांच्यासमवेत स्थानापन्न झाले. व्हान्स हे आपल्या पक्षाचे उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशी घोषणा ट्रम्प यांनी काही तासांपूर्वीच केली होती.
ट्रम्प गुरुवारी आपल्या प्राइम-टाइम भाषणात पक्षाचे नामांकन औपचारिकपणे स्वीकारणार आहेत. त्यानंतर 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीत त्यांचा सामना डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी होणार आहे.
बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे ट्रम्प यांच्या सभेत एका बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एका समर्थकाचा मृत्यू झाल्यानंतर 48 तासांपेक्षा कमी कालावधीत चार दिवसीय अधिवेशन सुरू झाले. हल्ला करणाऱ्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यामुळे त्याचा हल्ला करण्याचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे.
सोमवारी झालेल्या अधिवेशनात, पक्षाने सहा सर्वसामान्य अमेरिकन लोकांना आपले विचार मांडण्याची संधी दिली. या नागरिकांनी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांवर महागाईचा काय परिणाम झाला आहे हे त्यांच्या भाषणात अधोरेखित केले. तर रिपब्लिकन नेत्यांनी बायडेन प्रशासन सामान्यांच्या प्रश्नांबाबत संपर्काच्या बाहेर असल्याचे म्हटले.
उमेदवारीसाठी ट्रम्प यांच्या विरोधात काही काळ उभे राहिलेले सिनेटर टिम स्कॉट म्हणाले की दैवी हस्तक्षेपामुळे ट्रम्प यांचा जीव वाचला.
“आपला देव अजूनही वाचवतो,” स्कॉट म्हणाले. “तो अजूनही परीक्षा घेतो आणि त्यातून मुक्तही करतो. शनिवारी सैतान रायफल घेऊन पेनसिल्व्हेनियाला आला, पण एक अमेरिकन सिंह त्याच्या पायावर उभा राहिला आणि तो गर्जना करू लागला!” अशा शब्दांमध्ये स्कॉट यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले.
39 वर्षीय व्हान्स हे 2016 मध्ये ट्रम्प यांचे प्रखर टीकाकार होते, परंतु त्यानंतर ते माजी राष्ट्राध्यक्षांच्या खंबीर समर्थकांपैकी एक बनले आहेत.
ट्रम्प यांच्या मुख्य समर्थकांमध्ये व्हान्स खूप लोकप्रिय आहे, परंतु आपली करण्यात आलेली निवड योग्य आहे की नाही हे पाहणे बाकी आहे. राजकारणाचा विचार करता ट्रम्प यांच्या आक्रमक दृष्टिकोनाशी ते सहमत आहेत आणि गर्भपातासारख्या मुद्द्यांवरील त्यांची पुराणमतवादी विधाने कदाचित मध्यमवर्गीय मतदारांना दूर करू शकतात.
ट्रम्प यांनी व्हान्स यांच्या नावाची दुपारी घोषणा केल्यानंतर लगेचच, व्हान्स पत्नी उषा हिच्याबरोबर अधिवेशनातून बाहेर आले, त्यांनी अभिनंदन करणाऱ्यांसोबत हस्तांदोलन केले आणि त्या जोडप्याला शुभेच्छा देणाऱ्या प्रतिनिधींना मिठी मारली. ते बुधवारी अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)