प्रादेशिक सुरक्षा चर्चेपूर्वी डोवाल यांनी घेतली बांगलादेशच्या NSA ची भेट

0
आज म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कोलंबो सुरक्षा परिषदेच्या (सीएससी) सातव्या एनएसए-स्तरीय बैठकीपूर्वी बुधवारी 19 नोव्हेंबरला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलूर रहमान यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

बांगलादेश उच्चायोगाने सांगितले की, दोन्ही सल्लागारांनी सीएससीच्या सध्याच्या कामाचा आढावा घेतला तसेच द्विपक्षीय बाबींवर विचारांची देवाणघेवाण केली. रहमान यांनी डोवाल यांना योग्य वेळी बांगलादेशला भेट देण्याचे आमंत्रण दिले.

अर्थात याला नियमित तयारीबाबतची चर्चा म्हणून संबोधल गेलं असलं तरी, या बैठकीला असामान्य राजनैतिक महत्त्व आहे कारण ऑगस्ट 2024 मध्ये भारतात पळून आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर भारताला भेट देणारे रहमान हे दुसरे वरिष्ठ बांगलादेशी अधिकारी आहेत. रहमान यांच्या दिल्ली भेटीच्या एक दिवस आधी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. ढाकाने भारताला औपचारिकपणे त्यांचे  प्रत्यार्पण करण्यास सांगितले आहे. हा एक असा मुद्दा आहे जो आता कोणत्याही उच्च-स्तरीय देवाणघेवाणीवर आपली छाप पाडणार आहे. नवी दिल्लीने म्हटले आहे की त्यांनी या निकालाची नोंद घेतली आहे आणि “बांगलादेशच्या लोकांच्या सर्वोत्तम हितासाठी” आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे.

या तणावांच्या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सीएससी शिखर परिषदेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. एनएसए डोवाल श्रीलंका, मालदीव, मॉरिशस आणि बांगलादेशमधील त्यांच्या समकक्षांचे यजमानपद भूषवत आहेत, ज्यामध्ये सेशेल्स निरीक्षक म्हणून सहभागी होत असून मलेशिया विशेष पाहुणे म्हणून यात भाग घेत आहे. हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षा सहकार्य संस्थात्मक करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या गटाने गेल्या वर्षी श्रीलंकेत पायाभूत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर ही पहिलीच उच्चस्तरीय सीएससी बैठक संपन्न होत आहे. हिंद महासागर प्रदेशात सुरक्षा सहकार्य संस्थात्मक करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

या बैठकीत सीएससीच्या पाच प्रमुख स्तंभांमधील प्रगतीचा आढावा घेतला जाईल: सागरी सुरक्षा, दहशतवादविरोध आणि कट्टरतावादविरोध, आंतरराष्ट्रीय गुन्हे,  सायबर सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा संरक्षण, तसेच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण. सदस्य राष्ट्रांनी 2026 चा रोडमॅप आणि कृती आराखडा याला अंतिम रूप देणे अपेक्षित आहे, ज्यामध्ये सागरी क्षेत्र जागरूकता, बंदरे आणि पॉवर ग्रिडसाठी सामायिक सायबर संरक्षण, तस्करी नेटवर्क आणि अतिरेकी धोक्यांना समन्वित प्रतिसाद यांचा समावेश असेल. भारत सदस्य आणि भागीदार देशांमध्ये  वारंवार संयुक्त सराव आणि ऑपरेशनल-स्तरीय सहकार्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे.

एप्रिल 2025 मध्ये बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यानंतर रहमान यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याने त्यांच्या सहभागाकडे विशेष लक्ष लागले आहे. मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या अंतर्गत बांगलादेशात अशांत राजकीय संक्रमण सुरू असताना ते येथे आले आहेत. 2024 च्या सुधारणा सनदेवरील जनमत चाचणी आणि राष्ट्रीय निवडणुका फेब्रुवारी 2026 मध्ये एकत्रितपणे घेण्यात येईल अशी घोषणा युनूस यांनी केली आहे. रहमान हे अंतरिम प्रशासनासाठी एक केंद्रीय राजनैतिक व्यक्ती बनले आहेत, त्यांनी अमेरिका, चीन आणि कतार या भागीदारांशी संवाद साधला आहे. याशिवाय म्यानमारच्या राखीन राज्याशी संबंधित प्रादेशिक मानवतावादी चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या पार्श्वभूमीवर, त्यांच्या दिल्ली भेटीचे दुहेरी उद्दिष्ट आहे: एक म्हणजे प्रमुख प्रादेशिक सुरक्षा मंचावर बांगलादेशचे प्रतिनिधित्व करणे आणि द्विपक्षीय संवेदनशीलता जास्त असताना शांतपणे भारतासोबत राजनैतिक सातत्य राखणे. वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करणे असो किंवा फक्त संवाद माध्यमांना बळकटी देणे असो, या दोन्ही राजधान्यांमध्ये आणि संपूर्ण प्रदेशात या बैठकीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे

नवी दिल्लीतील सीएससी बैठकीचा उद्देश शेवटी बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या वेळी हिंद महासागर प्रदेशाच्या सामूहिक सुरक्षा रचनेला बळकटी देणे आहे.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleनवीन डिजिटल-प्रिंट कॉम्बॅट कोटसाठी लष्कराला मिळाले IPR
Next articleUS Approves $93 Million Sale of Javelin Missiles and Excalibur Artillery Rounds to India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here