DRDO चा AI, क्वांटम आणि हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर अधिक भर: डॉ. कामत

0

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम तंत्रज्ञान, हायपरसॉनिक आणि स्वायत्त प्रणाली हे घटक, भविष्यातील युद्धाची व्याख्या ठरवणार असून, या विघातक बदलांच्या स्पर्धेत अग्रेसर राहण्यासाठी भारत आपली संरक्षण संशोधन परिसंस्था पुन्हा सुसज्ज करत आहे, असे संरक्षण संशोधन आणि विकास विभाग (R&D) चे सचिव आणि डीआरडीओ (DRDO) चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी म्हटले आहे.

रक्षा सूत्र, संरक्षण मंत्रालयाशी संवाद साधताना ते म्हणाले की, “AI, मशीन लर्निंग, क्वांटम तंत्रज्ञान, कॉग्निटिव्ह सिस्टम्स आणि फोटोनिक्स या घटकांचा आधुनिक रणांगणावर प्रचंड प्रभाव पडत आहे.” तंत्रज्ञानातील बदलाचा वेग नाट्यमयरित्या वाढला असल्याचे नमूद करत ते पुढे म्हणाले की, “आज तंत्रज्ञान दर पाच वर्षांत कालबाह्य होत आहे. एकाच जागी स्थिर राहण्यासाठी देखील तुम्हाला सतत धावत राहणे आवश्यक असते.”

तरुण शास्त्रज्ञ, स्टार्टअप्स आणि वेग

या वेगवान बदलांचा सामना करण्यासाठी, डीआरडीओने तरुण शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअप्सच्या भोवती आपले नाविन्यपूर्ण मॉडेल पुनर्रचित केले आहे.

याविषयी बोलताना डॉ. कामत म्हणाले की, “आम्ही ‘यंग सायंटिस्ट लॅबोरेटरीज’ (तरुण शास्त्रज्ञांसाठी प्रयोगशाळा) स्थापन केल्या आहेत, जिथे संचालकांसह अन्य सर्वजण हे 35 वर्षांखालील आहे. तरुण टीम अधिक चपळ, कल्पक आणि प्रयोग करण्यास उत्सुक असतात.” या प्रयोगशाळा प्रगत तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या विद्यापीठांशी आणि स्टार्टअप्सशी अधिक जवळून जोडलेल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, “भविष्यातील युद्धांची तयारी करत असतानाच, सध्याची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी डीआरडीओ तात्काळ लष्करी गरजा, दीर्घकालीन भविष्यकालीन संशोधन आणि विद्यमान तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर यामध्ये जाणीवपूर्वक समतोल राखत आहे.”

हायपरसॉनिक आणि क्वांटम तंत्रज्ञान: धोरणात्मक गेम चेंजर

डीआरडीओच्या सर्वात महत्त्वाच्या यशांपैकी एक म्हणून, त्यांनी ‘स्क्रॅमजेट इंजिन’च्या सुमारे 1,000 सेकंदांच्या यशस्वी चाचणीचा उल्लेख केला आणि याला जगातील पहिलीच घटना म्हटले.

हायपरसॉनिक क्षमता ही भविष्यातील बचावासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, “हा टप्पा हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक असलेले मुख्य तंत्रज्ञान प्रदान करतो,” असे कामत यांनी नमूद केले.

डीआरडीओचे क्वांटम कम्युनिकेशनमधील कामही तितकेच क्रांतिकारी आहे. “एंटँगलमेंटचा वापर करून ‘फ्री-स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’चे आमचे यशस्वी प्रात्यक्षिक हे अति-सुरक्षित संरक्षण नेटवर्क्सच्या दिशेने प्रथम पाऊल आहे,” असे त्यांनी सांगितले.

मानवरहित युद्ध आणि ड्रोन-विरोधी लक्ष

मानवरहित प्लॅटफॉर्म्स जगभरातील संघर्षांचे स्वरूप बदलत असताना, डीआरडीओला पुढील 10-15 वर्षे स्वायत्त प्रणालींचे, वर्चस्व राहण्याची अपेक्षा आहे.

“लहान ड्रोन्समध्ये उद्योगांनी चांगली क्षमता विकसित केली असली तरी, डीआरडीओ ‘हाय-अल्टिट्यूड लाँग-एंड्युरन्स UAVs’ आणि ‘मानवरहित लढाऊ हवाई वाहनांवर’ (UCAV) लक्ष केंद्रित करत आहे,” असे सांगून कामत यांनी स्पष्ट केले की, ड्रोन विरोधी यंत्रणा (काउंटर-ड्रोन सिस्टिम) या ड्रोन क्षमतेइतक्याच महत्त्वाच्या असतील.

2026: एक महत्त्वपूर्ण वळण

भविष्याकडे पाहताना, त्यांनी 2026 हे वर्ष स्वदेशी संरक्षण क्षमतेसाठी निर्णायक वर्ष असल्याचे म्हटले.

“LCA Mk-2 चे पहिले उड्डाण, लार्सन अँड टुब्रोसोबत विकसित केलेल्या हलक्या टँकच्या वापरकर्ता चाचण्या आणि ‘प्रलय’ सारख्या क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश हे महत्त्वाचे टप्पे असतील,” असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, “उत्पादन प्रक्रियेत असलेल्या अनेक प्रणालींचे प्रत्यक्ष सैन्यात सामील होणे सुरू होईल, जे भारताच्या स्वदेशी संरक्षण परिसंस्थेची प्रगल्भता दर्शवते.”

भेदभावरहित उद्योग भागीदारी

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील भेदभाव नाकारत, DRDO तांत्रिक कौशल्य आणि खर्च स्पर्धात्मकतेच्या आधारावरच भागीदारांची निवड करते, असे त्यांनी स्पष्ट केले.

“लहान स्टार्टअप्स अधिक चपळ आणि जोखीम घेणारे आहेत, तर मोठ्या कंपन्या जटिल प्रणालींसाठी संरचना प्रदान करतात. दोन्ही आवश्यक आहेत,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, सायबर आणि ‘कमांड-अँड-कंट्रोल’ क्षेत्रांत अत्यंत नाविन्यपूर्ण काम समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाद्वारे राष्ट्र उभारणी

डॉ. कामत यांनी, भारतीय तरुणांना राष्ट्र परिवर्तनात योगदान देण्याचे आवाहन केले.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleDRDO Bets Big on AI, Quantum and Hypersonic to Shape India’s Future Battlefields: Dr Samir V Kamat
Next articleबांगलादेश: जनमत चाचणीमध्ये बीएनपी (BNP) आघाडीवर, जमात पिछाडीवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here