नाग मार्क 2 रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0
नाग

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाने (डीआरडीओ) सोमवारी स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या पिढीतील फायर-अँड-फॉरगेट अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाग मार्क 2 च्या क्षेत्र मूल्यांकन चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या.

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राजस्थानमधील पोखरण येथील फिल्ड रेंजवर प्रत्यक्ष युद्धभूमीवरील चाचण्या घेण्यात आल्या. तीन फील्ड ट्रायलमध्ये या क्षेपणास्त्र प्रणालीने कमाल आणि किमान पल्ल्यातील सर्व लक्ष्यांचा अचूकतेने वेध घेऊन आपली मारक क्षमता सिद्ध केली.

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “स्वदेशी बनावटीच्या नाग एमके 2 या तिसऱ्या पिढीच्या फायर ॲन्ड फर्गेट अशा रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राच्या क्षेत्र मूल्यांकन चाचण्या भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोखरण क्षेत्र श्रेणीत यशस्वीरित्या पार पडल्या.”

“तीन फील्ड ट्रायलमध्ये या क्षेपणास्त्र प्रणालीने कमाल आणि किमान पल्ल्यातील सर्व लक्ष्यांचा अचूकतेने वेध घेऊन आपली मारक क्षमता सिद्ध केली. ज्यामुळे त्याची परिचालन क्षमता प्रमाणित झाली,” असेही निवेदनात म्हटले आहे.

डीआरडीओने विकसित केलेले नाग मार्क 2 क्षेपणास्त्र विशेषतः आधुनिक चिलखती धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी तयार केले आहे. हे प्रगत फायर-अँड-फर्गेट तंत्रज्ञानावर आधारलेले आहे ज्यामुळे प्रचालकांना प्रक्षेपणापूर्वी लक्ष्य लॉक करता येते आणि जटिल युद्धभूमीच्या परिस्थितीतही अचूक हल्ले सुनिश्चित होतात.

क्षेपणास्त्र चाचण्यांव्यतिरिक्त, नाग क्षेपणास्त्र तैनात करण्यासाठी एक प्रमुख वाहक असणाऱ्या नाग क्षेपणास्त्र (NAMICA) आवृत्ती 2 चे देखील यशस्वी क्षेत्रीय मूल्यांकन करण्यात आले. संपूर्ण शस्त्र प्रणाली कार्यान्वित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

ही कामगिरी संरक्षण उत्पादनात भारताचे वाढते स्वावलंबन अधोरेखित करते तसेच रणगाडाविरोधी युद्धात भारतीय लष्कराच्या सज्जतेला बळकटी देते.  हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात योगदान दिल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि उद्योगातील भागधारकांचे अभिनंदन केले.

“नाग एमके 2 च्या यशस्वी चाचण्या संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला पुष्टी देतात,” असे सिंह म्हणाले.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी विकास आणि चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या पथकांची प्रशंसा केली. “हे यश भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतांना पुढे नेण्यासाठी डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि संरक्षण उद्योग यांच्यातील समन्वय अधोरेखित करते,” असे त्यांनी नमूद केले.

नाग मार्क 2च्या समावेशामुळे विशेषतः सीमावर्ती भागात, विकसित होत असलेल्या सशस्त्र धोक्यांचा सामना करण्याची भारतीय लष्कराची क्षमता लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे. त्याची प्रगत क्षमता भारताच्या संरक्षण शस्त्रागारात एक महत्त्वपूर्ण भर घालणारी ठरेल.

या चाचण्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत भारताची प्रगती देखील अधोरेखित करतात. आयात केलेल्या संरक्षण प्रणालींवरील अवलंबित्व कमी करून, देश आपल्या स्वदेशी संशोधन, विकास आणि उत्पादन क्षमतांना सातत्याने बळकट करतो, ज्यामुळे मजबूत संरक्षण परिसंस्थांना चालना मिळते.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleATAGS Contract Expected Before Fiscal Year-End: Army Chief
Next articleआर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ATAGS करार अपेक्षितः लष्करप्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here