केंद्रीय पोलीसदलांत ‘डीआरडीओ’चे तंत्रज्ञान वापरण्याबाबत चर्चा
दि. १० मे: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्यावतीने (डीआरडीओ) विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा केंद्रीय गृहमंत्रालयाशी संबंधित केंद्रीय पोलीसदलांमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा करण्यासाठी ‘डीआरडीओ’च्या तंत्रज्ञान परिषदेची नवी दिल्लीत बैठक घेण्यात आली. देशभरात विविध ठिकाणी असलेल्या ‘डीआरडीओ’च्या प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञ या परिषदेत आभासी (व्हर्चुअल) माध्यमातून सहभागी झाले होते.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) देशभरात विविध प्रयोगशाळा आहेत. त्या प्रयोगशाळांत वेगेवेगळ्या तंत्रज्ञानावर संशोधन सुरु असते. त्याचा उपयोग सशस्त्रदलांना अद्ययावत सामग्री पुरविण्यासाठी होतो. या सर्व प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञांनी विविध विषयांवरील आपली मते या बैठकीत मांडली. तसेच, पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडाही या बैठकीत तयार करण्यात आला. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय पोलीसदले, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल व सशस्त्र पोलीसदलांमध्ये ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्याबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे व विविध शश्त्रास्त्रप्रणालींचे प्रदर्शनही या परिषदेच्या परिसरात आयोजित करण्यात आले होते. त्यात विविध शश्त्रास्त्रप्रणाली, संज्ञापन प्रणाली, अंतर्गत सुरक्षा व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारी उपकरणे आदींचा समावेश होता. ‘डीआरडीओ’चे महासंचालक (उत्पादन, समन्वय व सेवा) चंद्रिका कौशिक यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. या बैठकीसाठी सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीसदल, भारत-तिबेट सीमा पोलीस, सशस्त्र सीमा बल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राष्ट्रीय सुरक्षा दल, आसाम रायफल्स, इंटेलिजन्स ब्युरो, दिल्ली पोलीस या केंद्रीय पोलीसदलांमधील पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सल्लागार हरचरण कौर, संगीता राव आदी अधिकारीही या बैठकीस हजार होते.
‘डीआरडीओ’ ही देशातील एक प्रतिष्ठित संरक्षण व विकास विषयक प्रयोगशाळा असून, या प्रयोगशाळेच्या माध्यमातून भारताच्या सैन्यदलांसाठी विविध शस्त्रे व शस्त्रप्रणालींच्या संशोधन व विकासाचे काम केले जाते. भारतीय सैन्यदलांना स्वदेशांतर्गत निर्मित शस्त्रे पुरवून संरक्षण सामग्री उत्पादनाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी ‘डीआरडीओ’ची भूमिका महत्त्वाची आहे.
विनय चाटी