2.92 लाख कोटी खर्च करून दुबईत बनणार जगातील सर्वात मोठे विमानतळ

0
प्रस्तावित विमानतळ

युएईमधील दुबई येथे जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधले जाणार आहे. याच्या निर्मितीसाठी सुमारे 35 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2.92 लाख कोटी रुपये खर्च येणार आहेत. दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी रविवारी एक्स या सोशल मीडियावर ही माहिती दिली.

नवीन विमानतळ दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा 5 पटीने मोठे असेल. हा प्रकल्प दुबईतील अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी या विमानतळावरून 26 कोटी प्रवासी प्रवास करतील. येथे 5 समांतर रनवे असतील, म्हणजेच 5 विमाने एकाच वेळी टेक ऑफ किंवा लँडिंग करू शकतील. याशिवाय विमानतळावर 400 टर्मिनल गेट असतील. याशिवाय हवाई वाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या जागतिक कंपन्यांची कार्यालये या विमानतळावर असतील.

पंतप्रधान म्हणाले की, नवीन विमानतळाच्या डिझाइनला मंजुरी देण्यात आली आहे. या विमानतळाचे एकूण क्षेत्रफळ 70 चौरस किमी असेल. येत्या 10 वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज नवीन अल मकतूम विमानतळाकडे हस्तांतरित केले जाईल. भावी पिढीचा निरंतन आणि शाश्वत विकास हे विमानतळ निश्चित करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

या प्रकल्पांतर्गत दुबईच्या दक्षिणेतील विमानतळाभोवती संपूर्ण नवे शहर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 10 लाख लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्पाचे कामही पूर्ण होणार आहे. दुबई विमानतळ सध्या जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 2022 मध्ये सुमारे 6.6 कोटी प्रवाशांची या विमानतळावर ये जा झाली होती.

कोरोनापूर्वी 2019 मध्ये सुमारे 8.7 कोटी लोकांनी या विमानतळावरून प्रवास केला होता. तर 2018 मध्ये 9 कोटी प्रवासी येथून गेले. प्रचंड गर्दीमुळे या विमानतळावरील कामकाज हाताळण्यात अनेक अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊन अल मकतूम प्रकल्पावर काम सुरू आहे. याआधीच हे काम सुरू होणार होते मात्र मंदीमुळे 2009 मध्ये यूएईवर आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात ते पुढे ढकलण्यात आले.

दुबई विमानतळापासून अल मकतूम विमानतळ 45 किमी अंतरावर आहे. ते 2010 मध्ये बांधले गेले. त्यावेळी येथे फक्त 1 टर्मिनल होते. कोरोनाच्या वेळी, एमिरेट्स एअरलाइन्सच्या डबल-डेकर एअरबस A380 आणि इतर अनेक विमानांच्या पार्किंगसाठी याचा वापर केला जात होता. याशिवाय दरवर्षी दुबई एअर शोचे आयोजनही याच ठिकाणी केले जाते.

आराधना जोशी

(रॉयटर्सच्या इनपुट्सह)


Spread the love
Previous articleCoast Guard Seizes 86kg Narcotics Worth Rs 600 Crore Apprehends 14 Crew Of Pakistani Vessel
Next articleBlinken To Hamas: Israel’s Terms For Gaza Truce Extraordinarily Generous

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here