नाटोचे पुढील प्रमुख म्हणून डच पंतप्रधान मार्क रुटे यांची नाटोने निवड केली आहे. युक्रेनमधील युद्ध नेदरलँड्सच्या दारात सुरू आहे तर अटलांटिकच्या पलिकडील युतीबद्दल भविष्यात अमेरिका काय भूमिका घेतो याबद्दल अनिश्चितता आहे. या पार्श्वभूमीवर रुटे यांची नियुक्ती होणं हे त्यांच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असेल.
अर्थात त्यांच्या निवडीची घोषणा ही केवळ एक औपचारिकता बनली आहे. कारण या पदासाठी त्यांचे एकमेव प्रतिस्पर्धी, रोमानियन अध्यक्ष क्लाऊस इओहानिस यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले की बहुमत मिळवण्यात ते अयशस्वी झाल्याने या स्पर्धेतून बाहेर पडत आहे.
रुटे 1 ऑक्टोबर रोजी नॉर्वेच्या जेन्स स्टोल्टेनबर्ग यांच्याकडून पदभार स्वीकारतील. स्टोल्टेनबर्ग गेल्या एका दशकापासून या पदावर कार्यरत होते.
आघाडीच्या 32 सदस्यांच्या राजदूतांनी ब्रुसेल्स येथील नाटो मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
आपल्या निवडीवर रुटे म्हणाले की, ते “मोठ्या उत्साहाने” हे काम हाती घेण्यास उत्सुक आहेत.
ही आघाडी आपल्या सामूहिक सुरक्षेचा पाया आहे आणि कायम राहील. या संस्थेचे नेतृत्व करणे ही एक जबाबदारी आहे जी मी हलक्यात घेत नाही,” असे त्यांनी एक्सवर पोस्ट केले.
गेल्या वर्षी या पदासाठी आपण उत्सुक असल्याचे जाहीर केल्यानंतर, रुटे यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसह आघाडीच्या प्रमुख सदस्यांकडून लगेच पाठिंबा मिळाला होता.
इतर देशांनी पाठिंबा देण्यासाठी काही काळ घेतला. विशेषतः पूर्व युरोपीय देशांनी असा युक्तिवाद केला होता की हे पद प्रथमच त्यांच्या प्रदेशातील कोणत्यातरी देशाकडे गेले पाहिजे.
पण नंतर मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कठोर टीकाकार आणि युक्रेनचे कट्टर सहकारी असलेल्या रुटे यांनाच त्यांनी पाठिंबा दिला.
मावळते अध्यक्ष स्टोल्टेनबर्ग म्हणाले की, आपला उत्तराधिकारी म्हणून रुटेच्या निवडीचे आपण मनापासून स्वागत केले आहे.
“मार्क एक खरा ट्रान्सअटलांटिकवादी, एक कणखर नेता आणि सर्वसंमती निर्माण करणारा आहे”, असे ते म्हणाले. “मला माहीत आहे की मी नाटो चांगल्या हातात सोडत आहे.”
नाटोमध्ये एकमताने निर्णय घेतले जातात, त्यामुळे जवळजवळ 14 वर्षे पंतप्रधान राहिल्यानंतर डच राजकारणातून बाहेर पडणाऱ्या रुटे यांना युतीतील सर्व 32 सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतरच त्यांची निवड होऊ शकली.
रशियाच्या आक्रमणाविरूद्ध युक्रेनच्या लढ्यासाठी मित्रराष्ट्रांचा पाठिंबा टिकवून ठेवण्याच्या आव्हानाला रुटे यांना सामोरे जावे लागणार तर आहेच याशिवाय नाटोला थेट रशियाशी युद्ध करण्यासाठी या युद्धात उडी मारण्यापासून वाचवण्याचेही आव्हान कायम आहे.
नोव्हेंबरच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर नाटो विरोधी असणारे डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परत येऊ शकतात या शक्यतेशीही त्यांना सामना करावा लागेल.
ट्रम्प यांच्या संभाव्य पुनरागमनाने नाटोच्या नेत्यांना अस्वस्थ केले आहे कारण रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्षांनी नाटोच्या इतर सदस्य देशांवर हल्ला झाल्यास त्यांना पाठिंबा देण्याच्या अमेरिकेच्या इच्छेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)