तब्बल तीन दिवस समुद्रात अडकलेल्या सिएरा लिओनमधील एका 11 वर्षीय मुलीची बुधवारी पहाटे सुखरुप सुटक करण्यात आली. इटलीच्या लॅम्पेडुसा बेटाजवळील जहाजाच्या दुर्घटनेतून वाचलेली ही एकमेव मुलगी आहे. जर्मन मानवतावादी संघटना कंपास कलेक्टिव्हने या वृत्ताची पुष्टी केली आहे.
पहाटे 3 च्या सुमारास कंपास कलेक्टिव्हच्या जहाजावरील क्रूला ही मुलगी सापडली. मदतीसाठी गेलेल्या क्रूने तिच्या रडण्याचा आवाज ऐकला. काहीवेळ शोध घेतल्यानंतर त्यांना ती मुलगी लाइफ जॅकेटच्या साहाय्याने तरंगत ठेवलेल्या एका टायर ट्यूबला चिकटून असल्याचे आढळून आले.
मुलीच्या म्हणण्यानुसार, ती ट्युनिशियन बंदर शहर स्फॅक्स येथून अन्य 45 प्रवाशांसह बोटीने प्रवास करत होती. समुद्रात अचानक आलेल्या वादळामुळे त्यांचे जहाज बुडाले आणि या दुर्घटनेत ती एकटीच बचावली.
दरम्यान कंपास कलेक्टिवच्या क्रूने येथे मुलीला लॅम्पेडुसा येथे सुखरुप आणले. उत्तर आफ्रिकेतून भूमध्यसागर पार करणाऱ्या स्थलांतरितांसाठी लॅम्पेडुसा हा एक नजीकचा लँडिंग मार्ग आहे.
वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर, या मुलीला एका स्थलांतरित होल्डिंग सेंटरमध्ये नेण्यात आले, जिथे सध्या इटालियन रेड क्रॉसचे लोक तिची काळजी घेत असल्याचे समजते.
याविषयी बोलताना इटलीतील युनिसेफच्या प्रमुख निकोला डेल आर्किप्रेट म्हणाल्या, की “या सणा-सुदीच्या काळात, जेव्हा आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या प्रियजनांसोबत राहण्याचे भाग्य लाभले आहे, तेव्हा दुसरीकडे ही अशी एक दुर्देवी घटना घडली आहे. सिएरा लिओनमधील या तरुण मुलीप्रती माझी पूर्ण सहानभुती आहे. तिने सर्वकाही गमावले आहे.’’ ‘’हा दुर्देवी अपघात भूमध्य समुद्रात प्रवासादरम्यान होणारे मृत्यू आणि लोक बेपत्ता होण्याच्या वाढत्या संख्येला अधोरेखित करतो”, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
भूमध्य समुद्रातील स्थलांतर मार्ग – ट्युनिशिया, लिबिया, इटली आणि माल्टा असा पसरलेला असून हा जगातील सर्वात धोकादायक समुद्री मार्गांपैकी एक आहे. ‘International Organization for Migration’ च्या म्हणण्यानुसार 2014 पासून, या मार्गाने प्रवास करताना 24,300 हून अधिक लोक मरण पावले आहेत किंवा बेपत्ता झाले आहेत.
मानवतावादी संघटनांनी वाढत्या जहाजांच्या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अलिकडच्या आठवड्यात ट्युनिशिया-इटली मार्गावर आणखी तीन स्थलांतरित बोटी गायब झाल्याची भीती एनजीओ मेडिटेरेनियाने नोंदवली.
“समुद्रात धोक्यात असलेले जीवन सोडले जाऊ शकत नाही,” मेडिटेरेनियाचे प्रवक्ते लुका कॅसारिनी म्हणाले, संभाव्य वाचलेल्यांसाठी शोध मोहीम सुरू करण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन केले.
ही शोकांतिका इटलीमध्ये इमिग्रेशनबद्दल सुरू असलेल्या वादविवादांवर प्रकाश टाकते. सरकारचा दावा आहे की त्याच्या कठोर भूमिकेमुळे समुद्रातील आवक कमी होत आहे, परंतु आकडेवारीनुसार, या वर्षी इटलीमध्ये अंदाजे 64,000 स्थलांतरितांच्या लँडिंगची नोंद झाली आहे. 2023 मध्ये याच कालावधीत झालेल्या 1 लाख 53 हजारांहून अधिक लँडिंगपेक्षा ही नोंद लक्षणीयरित्या कमी आहे.
दरम्यान, या दुर्घटनेतून बचावलेल्या ११ वर्षीय मुलीवर सध्या वैद्यकीय देखरेखीखाली उपचार होत आहेत. एवढ्या भीषण अपघातातून वाचणे आणि जगणे हे खरोखरच दैव बलवत्तर असल्याचे प्रतिक आहे.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)
अनुवाद- वेद बर्वे