न्यूयॉर्क आणि सनीवेल, कॅलिफोर्निया येथील गुगलच्या कार्यालयांमध्ये एकूण डझनभर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. गुगलने इस्रायलसोबत 2021मध्ये केलेल्या निंबस कराराच्या विरोधात हे कर्मचारी धरणे आंदोलन करत होते.
“गुगलने त्यांच्यात आणि इस्रायलमध्ये झालेल्या 1.2 अब्ज डॉलर्सचा करार असलेला प्रोजेक्ट निम्बस रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. गुगलने त्यांच्या अरब, मुस्लिम आणि पॅलेस्टिनी कामगारांच्या आवाजाला छळ, सूडबुद्धी, दडपशाहीपासून संरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे,” असे सिएटल येथील गुगल सॉफ्टवेअर अभियंता इमान हसीमने सांगितले. गुगलने प्रोजेक्ट निम्बसला कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्याची काळजी यादृष्टीने मान्यता द्यावी, अशी आमची मागणी असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
आठ तासांपेक्षा जास्त काळ धरणे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी शेवटी गुगलच्या क्लाऊड विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कार्यालयात प्रवेश केल्याचे सोशल मीडिया फुटेजमध्ये दिसून आले. सिलिकॉन व्हॅली येथील कंपनीच्या मुख्यालयाजवळील कॅलिफोर्नियातील सनीवेल कार्यालयात ही घटना घडली.
देशातील सार्वजनिक क्षेत्र आणि लष्कराला क्लाउड सेवा पुरवण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्चाच्या अमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) आणि गुगलसोबत इस्रायली सरकारने केलेल्या करारातून प्रोजेक्ट निम्बस तयार झाला आहे.
प्रकल्पाच्या चार टप्प्यांमध्ये क्लाऊड पायाभूत सुविधांचे अधिग्रहण आणि बांधकाम, क्लाऊडकडे स्थलांतर करण्यासाठी सरकारी धोरण तयार करणे, त्यानंतर त्यांचे एकत्रीकरण आणि स्थलांतर, शेवटी क्लाऊड क्रियांचे नियंत्रण आणि अनुकूलन यांचा समावेश आहे.
निंबस हा अनेक वर्षे चालणारा प्रकल्प असून सरकार, संरक्षण प्रणाली आणि अर्थव्यवस्थेतील इतर गटांना क्लाउड सेवांच्या तरतुदीसाठी सर्वसमावेशक उपाय प्रदान करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे इस्रायली अर्थमंत्रालयाने 2021 मध्ये जाहीर केले होते.
“गुगल आणि इस्रायल यांच्यातील कराराबद्दल मला जी गोष्ट लगेच खटकते ती म्हणजे पारदर्शकतेचा अभाव”, असे हसीम म्हणाला. “पारदर्शकतेचा अभाव केवळ एवढ्यापुरताच नसून ज्या संदर्भात करार केला जात आहे त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला माहित आहे की गाझामधील नरसंहार हा पहिला एआय संचालित नरसंहार आहे. म्हणूनच आम्हाला असे वाटते की पॅलेस्टिनींविरुद्ध हा नरसंहार व्यवस्थित घडवून आणण्यात तंत्रज्ञान आघाडीवर आहे.”
सिएटल आणि न्यूयॉर्कमधील गुगलच्या कार्यालयांमध्येही अशाच प्रकारची निदर्शने करण्यात आली.
सुब्रत नंदा
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)