इराणवरील निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या निर्णयाला युरोपियन युनियनचा दुजोरा

0

संयुक्त राष्ट्रांकडून (UN) इराणवर पुन्हा निर्बंध लादले गेल्यानंतर आता युरोपियन युनियननेही (EU) इराणवर अशाच प्रकारची कारवाई करत असल्याच्या वृत्ताला सोमवारी दुजोरा दिला.

“आज, अणु कराराचे पालन न केल्याबद्दल इराणवर युरोपियन युनियनने पुन्हा निर्बंध लादले आहेत. अर्थात राजनैतिक वाटाघाटींसाठी  दरवाजे खुले आहेत,” असे युरोपियन युनियनच्या अध्यक्षांनी एका निवेदनात म्हटले आहे.

युरोपियन युनियनने म्हटले आहे की या निर्बंधांमध्ये इराणी सेंट्रल बँक आणि इतर इराणी बँकांच्या मालमत्ता गोठवणे तसेच काही इराणी अधिकाऱ्यांवर प्रवास बंदी घालणे या गोष्टींचा समावेश  आहे.

युरोपियन युनियन इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी आणि वाहतूक, सोने तसेच काही नौदल उपकरणांची विक्री किंवा पुरवठा यावर देखील बंदी घालत आहे.

संयुक्त राष्ट्रांचे शस्त्रास्त्र निर्बंध

रविवारी, संयुक्त राष्ट्रांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर शस्त्रास्त्र आणि इतर निर्बंध पुन्हा लागू केले, युरोपीय शक्तींनी घेतलेल्या  या निर्णयानंतर, तेहरानने इशारा दिला होता की याविरोधात कठोर प्रतिसाद दिला जाईल.

ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने इराणवर 2015 च्या कराराचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत निर्बंध परत लागू करण्यास सुरुवात केली. या कराराचा उद्देश अणुबॉम्ब विकसित करण्यापासून रोखणे होता. इराणने अणुबॉम्ब तयार करण्याचा आपला कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले.

इराण, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि चीन यांनी मान्य केलेल्या आणि दशकभर चाललेल्या अणुकराराच्या समाप्तीमुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता आहे, इस्रायल आणि अमेरिकेने इराणी अणुस्थळांवर बॉम्बहल्ला केल्यानंतर काही महिन्यांनीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

2006 ते 2010 या दरम्यान स्वीकारलेल्या ठरावांमध्ये सुरक्षा परिषदेने लादलेले संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध शनिवारी रात्री 8 वाजता (रविवारी 00.00 GMT) पुन्हा लागू करण्यात आले.

या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांमध्ये होणाऱ्या जागतिक नेत्यांच्या वार्षिक मेळाव्याच्या वेळी इराणवरील सर्व निर्बंध परत लागू करणे आणखी पुढे ढकलले जावे यासाठी करण्यात आलेले सर्व प्रयत्न असफल झाले.

संयुक्त निवेदन

“आम्ही इराण आणि सर्व राष्ट्रांना या ठरावांचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन करतो,” असे फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अंतिम मुदत संपल्यानंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास यांनी रविवारी एका निवेदनात पुष्टी केली की ब्लॉक “आता विलंब न करता पूर्वी उठवलेल्या सर्व संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनच्या अणु-संबंधित निर्बंधांची पुन्हा अंमलबजावणी करण्यास पावले उचलेल.”

तेहरानने अणु कार्यक्रमाचे सतत उल्लंघन केल्यामुळेच आपल्या कट्टर शत्रूवर पुन्हा निर्बंध लादले गेल्याच्या निर्णयाचे इस्रायलने स्वागत केले असून ही एक “मोठी प्रगती” असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleरशियाचे कीव तसेच इतर प्रदेशांवर मोठे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले
Next articleमहत्त्वाची खनिजे, ऊर्जेसाठी भारताचे आता मंगोलियाकडे लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here