इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची सोशल मीडिया पोस्टमध्ये खिल्ली उडवल्याबद्दल मिलानच्या न्यायालयाने एका पत्रकाराला 5 हजार युरो (5 हजार 465 अमेरिकन डॉलर्स) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
ऑक्टोबर 2021 मध्ये मेलोनी यांच्या उंचीबद्दल ट्विटरवर – ज्याला आता एक्स असे नाव देण्यात आले आहे – टिपण्णी करण्यात आली होती. न्यायालयाने या टिप्पणीला ‘बॉडी शेमिंग’ असे मानले. अशी टीका केल्याबद्दल पत्रकार ज्युलिया कॉर्टीस हिला 1हजार 200 युरोचा सस्पेन्डेड दंडही ठोठावण्यात आला.
या निकालानंतर रॉयटर्सच्या वृत्ताला दिलेल्या प्रतिक्रियेत, कोर्टीस यांनी गुरुवारी एक्स वर लिहिलेः “इटलीच्या सरकारला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारांसोबत असणाऱ्या मतभेदांची गंभीर समस्या आहे.”
तीन वर्षांपूर्वी मेलोनी आणि ज्युलिया या दोन महिलांमध्ये सोशल मिडियावर रंगलेल्या वाक् युद्धानंतर मेलोनी यांनी पत्रकाराविरुद्ध कायदेशीर कारवाईला सुरूवात केली होती.
मेलोनी, यांचा कट्टर उजव्या विचारसरणीचा ब्रदर्ज ऑफ इटली पक्ष त्यावेळी विरोधी पक्षात होता. दिवंगत फॅसिस्ट नेते बेनिटो मुसोलिनीचे पार्श्वभूमीवर चित्र असलेल्या आपला उपहासित फोटो कॉर्टेसने प्रकाशित केला तेव्हा मेलोनी यांनी त्याला हरकत घेतली होती.
कॉर्टेसने त्याला प्रतिसाद देताना केलेल्या ट्विटचा अनुवादित अर्थ आहे – “जॉर्जिया मेलोनी, तुम्ही मला घाबरवू शकत नाही. शेवटी, तुमची उंची फक्त 1.2 मीटर (4 फूट) आहे. मी तुम्हाला बघूही शकत नाही.”
विविध माध्यम संकेतस्थळांनुसार मेलोनी यांची उंची 1.58 मी. ते 1.63 मी. दरम्यान आहे.
अर्थात या शिक्षेविरोधात कोर्टीस वरील न्यायालयात अपील करू शकते. मेलोनी यांच्या वकिलाने सांगितले की पंतप्रधान त्यांना मिळणारी कोणतीही नुकसानभरपाई धर्मादाय संस्थेला दान करतील.
गुरुवारी एक्सवर इंग्रजी भाषेत पोस्ट करताना कॉर्टीस म्हणाली की, इटलीत स्वतंत्र पत्रकारांसाठी हा कठीण काळ होता.
पुढील दिवस चांगले असतील अशी आशा करूया. आम्ही हार मानणार नाही,” असेही ती पुढे म्हणाली.
या वर्षी रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने पत्रकारांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या मोठ्या खटल्यांचा अहवाल सादर केला आहे. या खटल्यामुळे 2024 च्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात पाच अंकांची घसरण होऊन इटली 46व्या स्थानावर ढकलला गेला आहे.
पत्रकारांना न्यायालयात खेचणारी राजकारणी अशी मेलोनी यांची ओळख आहे.
सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांचे लेखक रॉबर्टो सॅव्हियानो यांना गेल्या वर्षी रोमच्या न्यायालयाने मेलोनी यांचा अपमान केल्याबद्दल 1हजार युरो आणि कायदेशीर खर्चांचा दंड ठोठावला होता. बेकायदेशीर स्थलांतराबद्दल मेलोनी यांच्या कठोर भूमिकेबद्दल 2021मध्ये दूरचित्रवाणीवर त्यांचा अपमान केल्याबद्दल सॅव्हियानो यांना हा दंड भरण्याची शिक्षा झाली.
तृप्ती नाथ
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)