सविस्तर: भारतीय स्वायत्त नौका, कशी वाढवणार पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता…

0

भारतीय नौदलाच्या युद्ध सज्जतेचे आधुनिकीकरण आणि भारताच्या समुद्री देखरेख क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने, या आठवड्यात सुरुवातीला संरक्षण मंत्रालयाने, Compact Autonomous Surface Craft (CASC) खरेदीला मंजुरी दिली. या मानवरहित स्वायत्त नौका भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीचे प्रतीक असून, विशेषतः शत्रूच्या पाणबुड्यांचा सामना करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात.

Compact Autonomous Surface Craft (CASC) म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, CASC म्हणजे लहान आकाराच्या मानवरहित बोटी असून, या बोटी सेन्सर्स, संवाद प्रणाली आणि शस्त्रसज्जतेने परिपूर्ण. या बोटींना मानवी उपस्थितीशिवाय केवळ तंत्रज्ञानाच्या जोरावर ऑपरेट करता येते. गुप्तचर कामगिरी, धोक्याचे निदान करणे, टार्गेटला ट्रॅक करणे आणि आक्रमक कारवाया करणे, अशा विविध प्रकारच्या मोहिमा या बोटी उत्तमप्रकारे पार पाडू शकतात, आणि तेही मानवी जीविताला हानी न पोहचवता.

एकदा या आधुनिक ड्रोन बोटींचा नौदलात समावेश झाला, की आपोआपच त्या Anti-Submarine Warfare (ASW) क्षेत्रात भारताला नवे सामर्थ्य देतील. विशेषतः Indian Ocean Region मध्ये वाढणाऱ्या पाणबुडीच्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, त्यांची ही भरती महत्वपूर्ण ठरेल.

भारताला सध्या स्वयंचलित बोटींची गरज का आहे?

परंपरागत नौदल कारवाया, विशेषतः पाणबुडी शोध मोहिमा या प्रामुख्याने मानवी दलांसह गस्त नौका आणि विमानांच्या माध्यमातून केल्या जातात. अशाप्रकारच्या प्रभावी असल्या तरी, त्याकरता अधिक संसाधने लागतात आणि मर्यादित वेळासाठीच त्या कार्यरत राहू शकतात.

मात्र, Autonomous अर्थात स्वयंचलित बोटी अधिक वेळापर्यंत कार्यरत राहू शकतात, तसेच विस्तृत समुद्र क्षेत्र व्यापण्याची क्षमता त्यांच्यात असते आणि सर्वात महत्वाचे उच्च-जोखमीच्या क्षेत्रात मानवी जीवनाला धोक्यात न टाकता त्या मोहीम पूर्ण करू शकतात.

स्वायत्त बोटींमुळे किनारपट्टी आणि समुद्रातील देखरेख क्षमतांमध्ये होणारी वाढ:

  • सोनार आणि अन्य सेन्सर्स वापरून पाणबुडी शोधणे व ट्रॅक करण्याची क्षमता
  • मानवरहित आणि आवश्यकता असल्यास मानवी उपस्थितीसह कार्य करू शकणे
  • आवश्यकतेनुसार स्वयंपूर्ण शस्त्रे वापरून धोके नष्ट करणे

विशेष म्हणजे, या बोटी ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाअंतर्गत भारतातच विकसित केल्या जात आहेत, ज्यामुळे स्थानिक संरक्षण उद्योगाला चालना मिळत आहे आणि देशाची सामरिक गरजही पूर्ण होते आहे.

चाचणीत यशस्वी झालेले तंत्रज्ञान

भारतीय नौदलाने, Swavlamban 2024 या नवी दिल्लीमध्ये झालेल्या संरक्षण नवप्रवर्तन प्रदर्शनात, Autonomous बोटींचे प्रोटोटाइप चाचणीसाठी सादर केले. या चाचण्यांनी स्पष्ट केले की, या बोटी देखरेख आणि आक्रमक दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये कार्यक्षम आहेत. विशेषतः जिथे नौदलाची उपस्थिती कमी आहे अशा भागांमध्ये कार्य करण्यासाठी या बोटी सक्षम असल्याचे चाचण्यांमधून सिद्ध झाले.

परंपरागत गस्त बोटींशी तुलना करता, CASC बोटी अधिक रेंज आणि कार्यकालक्षम आहेत, ज्यामुळे चोक पॉइंट्स, किनारे आणि उच्च-धोका असलेले समुद्री मार्ग अधिक प्रभावीपणे पाळता येणार आहेत.

जागतिक ड्रोन बोट स्पर्धा

भारताने हे महत्वपूर्ण पाऊल तेव्हा उचचले आहे, जेव्हा जगभरात मानवरहित नौदल तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे.

  • चीनने आधीच अनेक मानवरहित बोटी आपल्या नौदलात समाविष्ट केल्या आहेत. त्यातील एक 200-ton ड्रोन शिप उच्च समुद्री परिस्थितीत काम करू शकते आणि क्षेपणास्त्रे व टॉर्पेडो वाहून नेऊ शकते. JARI Multi-Purpose Unmanned Combat Vessel ही 15-meter लांबीची बोट पृष्ठभाग, हवाई आणि पाणबुडीविरोधी युद्धासाठी तयार आहे.
  • अमेरिकेने Sea Hunter आणि Large Unmanned Surface Vessel (LUSV) सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे या तंत्रज्ञानात पुढचा टप्पा गाठला आहे. हे प्लॅटफॉर्म मिसाईल लॉन्च सिस्टिम्स आणि लांब पल्ल्याचे देखरेख उपकरणांनी सज्ज आहेत. त्यांच्याकडे Medium Unmanned Surface Vessels (MUSVs) आणि Extra-Large Unmanned Undersea Vehicles (XLUUVs) आहेत – जे पूर्णपणे Autonomous युद्धगट तयार करण्याकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

भारताच्या नौदल धोरणावर याचा काय परिणाम होईल?

भारतासमोर वाढते समुद्री सुरक्षा आव्हान उभे आहे – ज्यामध्ये भारतीय महासागरात वाढती चीनी नौदल हालचाल आणि दोन आघाड्यांवरील संभाव्य संघर्ष यांचा समावेश आहे. अशा पार्श्वभूमीवर Compact Autonomous Surface Craft ची ओळख एक सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

AI-सक्षम, सेन्सरने भरलेले मानवरहित प्लॅटफॉर्म्स समाविष्ट करून, भारतीय नौदल:

  • पाणबुडी शोधण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता बळकट करत आहे
  • दुर्गम किंवा वादग्रस्त जलक्षेत्रात सातत्यपूर्ण देखरेख ठेवण्याची ताकद मिळवत आहे
  • धोका असलेल्या मोहिमांमध्ये मानवी जीविताच्या हानीचा धोका कमी करत आहे

पुढील काही वर्षांत, या स्वायत्त बोटी भारताच्या ‘Distributed Naval Warfare’ धोरणाचा आधारस्तंभ बनू शकतात – ज्या स्वतंत्रपणे किंवा ‘स्वार्म्स’ (गटांमध्ये) काम करून शत्रूच्या पाणबुड्यांना प्रत्युत्तर देणे, शत्रू हालचालींचे निरीक्षण करणे आणि महत्त्वाच्या समुद्री क्षेत्रांचे संरक्षण करण्याचे काम करतील.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारताने अमेरिकेशी शस्त्रास्त्र वाटाघाटी थांबवल्याचे दावे खोटे: संरक्षण मंत्रालय
Next articleIndia’s Defence Production Hits Record Rs 1.51 Lakh Crore in FY 2024-25

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here