FBI संचालक पटेल यांच्यावर, ‘कर्क’ चौकशीत खोटे दावे केल्याप्रकरणी टीका

0
FBI
11 सप्टेंबर 2025 रोजी, ओरेम या युनायटेड स्टेट्समधील युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहयोगी, उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि भाष्यकार चार्ली कर्क यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यानंतर युटाहचे गव्हर्नर स्पेन्सर कॉक्स हे युटाह व्हॅली विद्यापीठात FBI चे संचालक काश पटेल यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेत बोलत आहेत. सौजन्य: रॉयटर्स/चेनी ऑर.

FBI संचालक काश पटेल, यांना सध्या तीव्र टीकेचा सामना करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि रूढीवादी कार्यकर्ते- चार्ली कर्क, यांच्यावर झालेल्या गोळीबारात एका संशयिताला पकडण्यात आल्याचा चुकीचा दावा केल्यामुळे, पटेल यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

बुधवारी, उटाहमधील ओरेम येथे झालेल्या गोळीबाराच्या ठिकाणी, अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देण्यापूर्वीच, पटेल यांनी सोशल मीडियावर घोषणा केली की: “गोळीबाराप्रकरणी जबाबदार असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.” दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांनी या दाव्याचे खंडन केले, ज्यामुळे FBIने स्पष्टीकरण देण्यापूर्वी काही तास गोंधळ निर्माण झाला. याप्रकरणी दोन लोकांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

अमेरिकेतील विद्यमान आणि माजी अधिकाऱ्यांनी, पटेल यांचा हा दावा दिशाभूल करणारा आणि हानिकारक असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडिया स्टंट?

FBI चे माजी एजंट डॅन ब्रूनर म्हणाले की, “तपासाच्या सुरुवातीला मिळणारी बरीचशी माहिती ही चुकीची किंवा अपूर्ण असू शकते, ज्यामुळे ती त्वरित जाहीर केली जात नाही. म्हणूनच जे पटेल यांनी केले, ते FBIच्या कोणत्याही पूर्वीच्या संचालकांनी किंवा विभागप्रमुखांनी कधीच केलेले नाही. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आधी मिळालेली माहिती नीट तपासून, त्यातून वस्तुनिष्ठ तथ्य बाहेर काढणे आवश्यक असते. FBI सोशल मीडियावरून तपास चालवत नाही.”

व्हाइट हाऊसच्या एका सूत्राने, नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर असे सांगितले की: “पटेल यांची घोषणा ही अत्यंत अव्यावसायिक होती. हे वर्तन व्हाईट हाऊससाठी आणि अमेरिकन जनतेसाठी अस्वीकारार्ह आहे आणि यावर कारवाई केली जाईल.”

गृहमंत्रालयाचे माजी अधिकारी जॉन कोहेन यांनी देखील म्हटले की, “पटेल यांची ही घोषणा अनभ्यस्त होती आणि पुढे बदलत जाणाऱ्या तपास तपशीलांमध्ये ती गोंधळ निर्माण करणारी ठरू शकते.”

व्हाईट हाऊसचा पाठिंबा

व्हाईट हाऊसने यावर प्रतिक्रीया देत म्हटले की, “पटेल यांना ट्रम्प यांचा पूर्ण पाठिंबा आहे. जेव्हा एक हिंसक खुनी अजूनही मोकाट फिरतो आहे, तेव्हा अशा प्रकारची बातमी हा एक निंदनीय प्रकार आहे.” त्यांनी रॉयटर्सच्या वृत्तांकनाचा निषेधही केला.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हिट यांनी रॉयटर्सला सांगितले की, “हे वृत्त एका अनामिक स्रोताकडून आले आहे, जे अध्यक्षांच्या टीममध्ये अविश्वास पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काश पटेल खून्याला शोधून काढण्यासाठी नेतृत्व करत आहेत आणि या प्रयत्नात अध्यक्षांसह सर्वजण त्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत.”

एफबीआयने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क, यांची उटाहमधील एका महाविद्यालयात 3,000 लोकांच्या समोर हत्या करण्यात आली. ही घटना अमेरिकेत यावर्षी घडलेल्या अनेक राजकीय हिंसेतील एक आहे.

पटेल यांची पहिली मोठी परीक्षा

ही घटना, काश पटेल यांच्या FBI संचालक पदासाठीची पहिली मोठी परीक्षा ठरत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे पटेल, यांनी FBI या प्रमुख कायदा अंमलबजावणी संस्थेला ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ अजेंड्याचे साधन बनवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते.

सध्या आणि पूर्वीच्या अनेक एजंटांनी चिंता व्यक्त केली आहे की, कायदा अंमलबजावणीचा अनुभव नसल्याने पटेल यांच्या नेतृत्वाखाली चालणारी ही चौकशी अडचणीत येऊ शकते.

पटेल यांच्या काळात, एफबीआयचे अनेक एजंट जे गुंतागुंतीच्या चौकशांवर काम करत असत, आता त्यांना राष्ट्राध्यक्षांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि वॉशिंग्टनमधील रस्त्यांवरील गुन्हेगारी प्रकरणे तपासण्यास लावले गेले.

FBI एजन्सीमधील, ट्रम्प यांच्याप्रती पुरेसा विश्वास न दाखवणारे असे अनेक कर्मचारी पटेल यांनी हटवले आहेत. बुधवारी, गोळीबाराच्या काही तास आधी दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यात तीन माजी एफबीआय अधिकाऱ्यांनी असा आरोप केला की ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेल्या गुन्हेगारी चौकशांवर काम करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला कामावरून कमी करण्याचे आदेश पटेल यांना देण्यात आले होते.

कामावरून काढण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांमध्ये, सॉल्ट लेक सिटी फील्ड ऑफिसचे माजी वरिष्ठ अधिकारीही होते. हेच ऑफिस आता किर्क यांच्या मृत्यू प्रकरणात प्रमुख तपास करत आहे.

या कार्यालयाचे प्रमुख, FBI स्पेशल एजंट इन चार्ज- रॉबर्ट बोल्स यांनी, गुरुवारी सकाळी पत्रकारांना सांगितले की: “तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत, त्यात घटनास्थळी वापरण्यात आलेली रायफलही आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही.”

गुरुवारी FBIने त्या व्यक्तीचे दोन फोटो प्रसिद्ध केले, ज्याची त्यांना चौकशीसाठी आवश्यकता आहे. तसेच, अटक होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या माहितीला १ लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले गेले. मात्र, रूढीवादी कार्यकर्ती लॉरा लूमर यांनी ही रक्कम अपुरी आणि लज्जास्पद असल्याचे सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की हे एफबीआयसाठी आणि आपल्या देशासाठी लाजिरवाणे आहे. चार्ली किर्क यांच्यासाठी ही एक प्रकारे अपमानास्पद बाब आहे.

एफबीआय प्रमुख होण्याआधी, पटेल हे संस्थेचे टीकाकार होते. त्यांनी असा आरोप केला होता की, सरकारच्या आतील “डीप स्टेट” ट्रम्प यांना लक्ष्य करत आहे. काँग्रेस स्टाफर म्हणून त्यांनी २०१६ मधील ट्रम्पच्या प्रचार मोहिमेतील रशियाशी संपर्क प्रकरणाच्या एफबीआय चौकशीविरोधात तपासात भूमिका घेतली होती.

FBI संचालक म्हणून पटेल हे, ट्रम्प यांच्या अजेंड्याचे सार्वजनिक समर्थन करणारे पहिले प्रमुख ठरले आहेत. ते अनेकदा ट्रम्प यांच्यासोबत सामाजिक कार्यक्रमांत सहभागी झाले आहेत, जे एफबीआयच्या पारंपरिक, पक्षपाती नसलेल्या, स्वायत्त नेतृत्वापासून वेगळे आहे.

कधी कधी पटेल यांचे व्हाइट हाऊसबरोबरही मतभेदही झाले आहेत. मे महिन्यात त्यांनी कायदेमंडळात सांगितले की ट्रम्प यांचे प्रस्तावित बजेट एफबीआयसाठी अपुरा आहे, पण दुसऱ्याच दिवशी ते बजेट कपातीत पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर्षीच्या सुरुवातीला, पटेल यांना दारू, तंबाखू, शस्त्रे आणि स्फोटके विभागाच्या कार्यकारी संचालकपदावरून हटवण्यात आले होते, मात्र त्यामागील कारण उघड करण्यात आले नव्हते. नंतर त्यांच्याजागी आर्मी सेक्रेटरी डॅनिएल ड्रिस्कॉल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleNepal: ‘Gen-Z’ आंदोलकांकडून अंतरिम नेतृत्वाची निवड, भारताचा पाठिंबा
Next articleट्रम्प यांच्या टॅरिफमुळे दक्षिण आशियाई व्यापाराला चालना मिळेल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here