कुवेतमध्ये आता हिंदीतही रेडिओ कार्यक्रम सुरू

0

कुवेतमध्ये पहिल्यांदाच रेडिओवरून हिंदी कार्यक्रम सुरू झाली असल्याची माहिती तेथील भारतीय दूतावासाने दिली आहे. कुवेतमधील एफएम 93.3 आणि एएम 96.3 या वाहिन्यांवर असा हिंदी कार्यक्रम सुरू केल्याबद्दल भारतीय दूतावासाने कुवेतच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे कौतुक केले आहे. सध्या दर रविवारी कुवेत रेडिओच्या या दोन्ही वाहिन्यांवरून एका हिंदी कार्यक्रमाचे प्रक्षेपण करायला सुरूवात झाली आहे. कुवेतने उचललेले हे पाऊल दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करेल, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भातील माहिती पोस्ट करताना भारतीय दूतावासाने म्हटले आहे, “कुवेतमध्ये पहिल्यांदाच हिंदी कार्यक्रमाचे प्रसारण सुरू झाले! 21 एप्रिल 2024 पासून प्रत्येक रविवारी (रात्री 8:30 ते 9:00) एफएम 93.3 आणि एएम 96.3 वर हिंदी कार्यक्रम सुरू केल्याबद्दल भारतीय दूतावास कुवेतच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे कौतुक करतो. या निर्णयामुळे भारत-कुवेत संबंध आणखी दृढ होतील.”

कुवेतमध्ये सुमारे दहा लाख भारतीय राहतात. हा देशातील सर्वात मोठा स्थलांतरित समुदाय आहे. अभियंते, डॉक्टर, सनदी लेखापाल, शास्त्रज्ञ, सॉफ्टवेअर तज्ज्ञ, व्यवस्थापन सल्लागार, वास्तुविशारद, तंत्रज्ञ आणि परिचारिका, तसेच किरकोळ विक्रेते आणि व्यावसायिक अशा विविध वर्गाचे भारतीय कुवेतमध्ये राहतात.

कुवेतमधील भारतीय व्यापारी समुदायाने किरकोळ आणि वितरण क्षेत्रात तिथल्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, भारत आणि कुवेत यांच्यात असणारे पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंधांची पाळेमुळे इतिहासात रुजलेली असून आजही काळाच्या कसोटीवर टिकून आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारत बऱ्याच काळापासून कुवेतचा व्यापारविषयक भागीदार आहे. 2021-2022 मध्ये, दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांचे 60 वे वर्ष साजरे करण्यात आले होते. 17 एप्रिल रोजी कुवेतमधील भारतीय राजदूत आदर्श स्वाइका यांनी कुवेतचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि प्रभारी गृहमंत्री शेख फहाद युसूफ सौद अल सबाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, भारतीय स्थलांतरीत समुदायासाठी कुवेतने सुरू केलेल्या अनुकूल उपाययोजनांची भारतीय राजदूतांनी प्रशंसा केली. कुवेतमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली.

आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)


Spread the love
Previous articleतिसऱ्या कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे ‘स्टील कटिंग’
Next articleCDS Gen Anil Chauhan Visits France To Deepen Defence Ties

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here