पहिली दोन Tejas Mark 1A विमाने, सप्टेंबर अखेरीस मिळण्याची अपेक्षा

0

संरक्षण सचिव आर. के. सिंह, यांनी शनिवारी सांगितले की: “देशात विकसित करण्यात आलेली पहिली दोन Tejas Mark 1A लढाऊ विमाने, सप्टेंबर अखेरीस भारतीय हवाई दलाला (IAF) सुपूर्त केली जाण्याची अपेक्षा आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरतेच्या’ प्रगतीचा, त्यांनी यावेळी उल्लेख केला.

NDTV च्या ‘डिफेन्स समिट’मध्ये बोलताना सिंह म्हणाले की, “तेजस विमाने, जुन्या मिग-21 लढाऊ विमानांची जागा घेण्यास सज्ज आहे आणि हे विमान भारतीय हवाई दलाचे मुख्य कार्यरत विमान म्हणून नावारुपला येईल.”

सिंह म्हणाले की, “हे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) सुधारण्यासाठी HAL (Hindustan Aeronautics Ltd) ला पुरेशी दृश्यमानता देणे हा आमचा उद्देश आहे. सध्या सुमारे 38 लढाऊ विमाने सेवेत आहेत आणि आणखी 80 विमाने तयार होण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यातील 10 विमाने तयार आहेत आणि दोन इंजिन आधीच वितरित केली गेली आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की, शस्त्रास्त्रांची एकत्रित केलेली पहिली दोन विमाने यावर्षी सप्टेंबरमध्ये वितरित होतील. या संदर्भातील करार पुढील महिन्यात होणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, “या उत्पादनाच्या प्रमाणामुळे HAL ला पुढील चार ते पाच वर्षांसाठी स्पष्ट ऑर्डर पाइपलाइन मिळाली आहे. त्यामुळे या व्यासपीठाचा दर्जा सुधारता येईल, रडार व स्वदेशी शस्त्रांची एकत्रिती करता येईल आणि तेजस हे सुखोई विमानांच्या जोडीला भारतीय हवाई दलाचे एक मुख्य आधारस्तंभ म्हणून तयार होईल.”

मेक इन इंडिया — संरक्षण क्षेत्राला चालना

संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ मोहिमेबद्दल बोलताना सिंह म्हणाले की, “धोरणात्मक स्वायत्तता टिकवण्यासाठी आत्मनिर्भरता अत्यावश्यक आहे.”

“आपली धोरणात्मक स्वायत्तता टिकवून ठेवायची असेल, तर आपल्याला आपल्या बहुसंख्य संरक्षण गरजा देशांतर्गत भागवाव्या लागतील. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सातत्याने आत्मनिर्भरतेवर भर दिला आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “भारताने आता आपली 75% भांडवली गुंतवणूक, देशांतर्गत साधनसामग्रीद्वारे करायचा निकष ठरवला आहे. त्यामुळे बहुतेक संरक्षण करारांसाठी विदेशी उत्पादकांनी भारतात गुंतवणूक करणे आणि उत्पादन करणे आवश्यक ठरणार आहे.”

आधुनिक युद्धशास्त्र

ड्रोन तंत्रज्ञान आणि आधुनिक युद्धातील त्याच्या भूमिकेबाबत बोलताना, विशेषतः ‘ऑपरेशन सिंदूर‘च्या संदर्भात बोलताना, सिंह यांनी ही अलीकडील अतिरेकीविरोधी कारवाई म्हणजे वास्तवाचा सामना असल्याचे म्हटले. त्यांनी भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीचे, त्यात जुन्या यंत्रणांसह, कौतुक केले. पण सुधारणा आवश्यक असल्याचे मान्य केले.

“ड्रोनच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा गरजेच्या आहेत. आपल्या नागरी ड्रोन उद्योगात मोठी वाढ झाली आहे, पण त्याचा लष्करी दर्जा गाठण्यासाठी अजून प्रयत्नांची गरज आहे. आपल्या उत्पादकांना हे आव्हान माहीत आहे,” असे ते म्हणाले.

सिंह यांनी, यावेळी संशोधन आणि विकासाचे महत्त्व अधोरेखित केले आणि वास्तववादी दृष्टिकोन स्विकारण्याचे समर्थन केले.

“महत्त्वाची तंत्रज्ञान एकतर प्रतिबंधित असते किंवा मर्यादित प्रमाणात शेअर केली जाते. त्यामुळे आपल्याला भारतीय डिझाईन व विकासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आपला दृष्टिकोन वास्तववादी असला पाहिजे, इतर देशांच्या तुलनेत आपल्या क्षमतेमध्ये दरी राहता कामा नये,” असे ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरदरम्यानच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल बोलताना सिंह म्हणाले की, “पहिल्या दिवशी थोडा तणाव जाणवला, पण त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येमुळे, विशेषतः सकाळच्या टेनिसमुळे, हा तणाव हाताळण्यास मदत झाली.”

“मला ऑपरेशनचे नियमित अपडेट्स मिळत होते, कोणतीही हानी झाल्यास तिची माहितीही मिळत होती. सुदैवाने आपल्याला खूप कमी हानी झाली आणि शत्रूला मोठे नुकसान पोहोचवण्यात आपण यशस्वी झालो. जर गरज भासली असती, तर आपली तयारी होती. आपण युद्ध तीव्र करु शकलो असतो, वर्चस्व गाजवू शकलो असतो आणि शत्रूला माघार घेण्यास भाग पाडू शकलो असतो,” असे त्यांनी सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत, रशिया, ट्रम्प आणि तेल: वस्तुस्थितीचा नेमका आढावा
Next articleIndia, China & The BRICS Factor: What The West Won’t Tell You

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here