फोर्ब्सकडून 2024 मधील जागतिक अब्जाधीशांची यादी मंगळवारी प्रसिद्ध झाली. यंदा भारतातील 200 अब्जाधीशांचा यात समावेश असून हा एक नवीन विक्रम आहे. या सगळ्यांच्या एकत्रित संपत्तीचे मूल्य 954 अब्ज डॉलर्स इतके आहे.
भारतातील श्रीमंतांच्या या यादीत मुकेश अंबानी अग्रस्थानी असून, 116 अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड संपत्तीसह ते आशियातील पहिले शत – अब्जपती (centi-billionaire) बनले असून जागतिक स्तरावर ते 9व्या स्थानावर आहेत. अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाने वॉल्ट डिस्नेच्या इंडिया ऑपरेशन्समध्ये 8.5 अब्ज डॉलर्स इतके मोठे विलीनीकरणाचे सौदे केले आहेत.
भारतीय महिलांनीही श्रीमंतांच्या यादीत दमदार कामगिरी केली आहे. ओ. पी. जिंदाल स्टील अँड पॉवरच्या सावित्री जिंदाल यांनी 33.5 अब्ज डॉलर्ससह भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून आपले पहिले स्थान कायम राखले आहे. याशिवाय देशातील श्रीमंतांच्या यादीत त्या चौथ्या क्रमांकावर आहेत. मध्यपूर्वेतील रिटेल जायंट लँडमार्क ग्रुपचा वारसा मिळालेल्या नवोदित रेणुका जगतियानी यांचा या यादीत पहिल्यांदाच समावेश झाला आहे.
जागतिक स्तरावर, सुपरस्टार टेलर स्विफ्ट या वर्षी अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. तिच्या पुन्हा रेकॉर्ड केलेल्या अल्बमच्या विक्रीमुळे आणि फायदेशीर ठरलेल्या जागतिक दौऱ्यांमुळे तिच्या संपत्तीत भर पडली आहे.
“यात सर्वात प्रसिद्ध नवोदित, अर्थातच, टेलर स्विफ्ट आहे, जिच्या विक्रमी, पाच खंडांच्या इरास टूरमुळे 1अब्ज डॉलर्सची कमाई पहिल्यांदाच ओलांडली गेली आहे,” असे फोर्ब्स.कॉमच्या या क्रमवारीविषयक अहवालात म्हटले आहे. 34 वर्षीय पॉप स्टारने ब्लॉकबस्टर ठरलेल्या दौऱ्यातील कमाई, तिच्या म्युझिक कॅटलॉगचे मूल्य आणि तिच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओच्या आधारे अंदाजे 1.1अब्ज डॉलर्सची संपत्ती जमा केली. केवळ आपली गाणी आणि सादरीकरणांच्या आधारे दहा आकड्यांचा टप्पा पार करणारी स्विफ्ट ही पहिली संगीतकार आहे.
अमेरिकेमध्ये सध्या 813 अब्जाधीश असून हा एक विक्रम आहे. यांच्या संपत्तीचे एकत्रित मूल्य 5.7 ट्रिलियन डॉलर्स आहे. चीन 473 अब्जावधी आणि (हाँगकाँगसह) 1.70 ट्रिलियन डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थात तिथे ग्राहकांची घटलेली क्रयशक्ती आणि स्थावर मालमत्तेचे निघालेले दिवाळे, यामुळे राष्ट्रीय संपत्तीत 200 अब्ज डॉलर्सची घट होऊन 89 अब्जाधीशांना या यादीतून हटवण्यात आले आहे. 200 अब्जाधीश (एक विक्रम देखील) असलेला भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे “, असे त्यात म्हटले आहे.
फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीश यादी 2024 मध्ये नव्यानेच समाविष्ट झालेल्या इतर उल्लेखनीय भारतीयांमध्ये हृदयरोगतज्ज्ञ आणि मेदांत हॉस्पिटल्स या आरोग्यसेवेचे उद्योजक नरेश त्रेहान तसेच भारताच्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेसाठी प्रणाली पुरवलेल्या केयन्स टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञान कंपनीचे रमेश कुन्हीकन्नन यांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांचे उद्योगपती वीरेंद्र म्हैसकर यांनीही देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे 13 वर्षांनंतर या यादीत पुनरागमन केले आहे.
बहुतेक भारतीय अब्जाधीशांचे वर्चस्व असतानाच, काहीजणांची या यादीत घसरण बघायला मिळाली आहे, ज्यात माजी एडटेक युनिकॉर्न बायजू रवींद्रन यांचा समावेश आहे, ज्यांची कंपनी बायजूचे मूल्य घसरले आहे.
पुन्हा एकदा, या यादीत अमेरिका आघाडीवर असून 67जणांचा या यादीमध्ये समावेश झाला असल्याचे,” फोर्ब्स.कॉमने जाहीर केले आहे. त्यापैकी सर्वात श्रीमंत फास्ट फूड चेन रायझिंग केनचे संस्थापक टॉड ग्रेव्हस असून त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 9.1अब्ज डॉलर्स आहे. आशियाई देशांसमोर अनेक अडचणी असूनही, चीनने दुसरे स्थान कायम राखले आहे. तिथल्या नवीन अब्जाधीशांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट घेऊन ती 31 वर पोहोचली आहे. मॅगी गु, मॉली मियाओ आणि रेन शियाओकिंग (प्रत्येकी अंदाजे $4.2 अब्ज) हे सर्वात श्रीमंत असून जेन झेडच्या द शीन या फास्ट-फॅशन ब्रॅडचे सहसंस्थापक आहेत. याशिवाय, भारताकडून 25 नव्या अब्जाधीशांची भर पडली आहे, ज्यात ई-कॉमर्स समूह असणाऱ्या लँडमार्क ग्रुपच्या मुख्य कार्यकारी रेणुका जगतियानी (4.8 अब्ज डॉलर्स) यांचा समावेश आहे. या कंपनीची स्थापना त्यांचे पती मिकी जगतियानी यांनी केली होती, ज्यांचे मे 2023 मध्ये निधन झाले.
2024 चे पहिले पाच अब्जाधीश :
1) बर्नार्ड आर्नॉल्ट – लुई व्हायटन आणि सेफोरा यांच्यासह 75 फॅशन आणि सौंदर्यप्रसाधन ब्रँडच्या एलव्हीएमएच साम्राज्याची देखरेख करतात. निव्वळ मूल्यः 233 अब्ज डॉलर्स
2) एलन मस्क – टेस्ला या इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनीसह रॉकेट निर्माता स्पेसएक्स आणि टनलिंग स्टार्टअप बोरिंग कंपनीसह सहा कंपन्यांचे सह-संस्थापक.निव्वळ मूल्यः 195 अब्ज डॉलर्स
3) जेफ बेझोस – अमेझॉनचे संस्थापक यांची निव्वळ संपत्तीः 194 अब्ज डॉलर
4) मार्क झुकरबर्ग – 2004 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी फेसबुकची स्थापना केली होती. निव्वळ मूल्यः 177 अब्ज डॉलर्स
5) लॅरी एलिसन – ओरॅकलचे सह-संस्थापक. निव्वळ मूल्यः 141 अब्ज डॉलर्स
रामानंद सेनगुप्ता
(एपीकडून मिळालेल्या इनपुट्ससह)