पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीची तुरुंगातून सुटका

0
पाकिस्तानचे
बुशरा बीबी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना सरकारी भेटवस्तूंच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर गुरुवारी तुरुंगातून सोडण्यात आले.
तिच्या या सुटकेमुळे नऊ महिन्यांचा कारावास संपुष्टात आला.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तुरुंगात गेल्यानंतर इम्रान खान आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळालेला हा सर्वात मोठा कायदेशीर दिलासा आहे.
जानेवारीत अटक करण्यात आलेल्या बीबीला रावळपिंडी येथील लष्करी छावणीत असलेल्या अदियाला तुरुंगातून आज सोडण्यात आले असले तरी इम्रान खान अजूनही तुरुंगातच आहेत.
इम्रान खान यांच्या काही समर्थकांनी बिबीला तुरुंगातून बाहेर नेणाऱ्या दोन पांढऱ्या एसयूव्ही गाड्यांवर गुलाबाच्या पाकळ्या फेकत त्यांचे स्वागत केल्याची दृश्ये स्थानिक दूरचित्रवाणी वाहिन्यांनी प्रसारित केली.
बीबीला स्थावर मालमत्ता विकासकाकडून जमीन घेतल्या प्रकरणी किमान आणखी एका लाचखोरीच्या प्रकरणाला सामोरे जावे लागत आहे.
“बुशरा बीबीचे स्वागत आहे! तुरुंगातील तुमच्या बेकायदेशीर वास्तव्यात तुम्हाला अत्यंत कठीण काळ, घृणास्पद मोहीम आणि चारित्र्य हननाच्या प्रयत्नांचा सामना करावा लागला आहे,” असे खान यांचा पक्ष, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
2022 मध्ये पंतप्रधानपदावरून पदच्युत केल्यानंतर विद्यमान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या आघाडीविरोधात निषेध चळवळ सुरू केल्यापासून खान यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांसह इतर डझनभर खटले दाखल करण्यात आले आहेत.
खान यांनी हे सर्व आरोप नाकारले आहेत. “मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असलेल्या आणि फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्याच्या उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या त्या 72 वर्षीय माजी क्रिकेटपटूला बदनाम करण्यासाठी सरकार त्यांना अशी वागणूक देत आहे,” असा खान यांनी आरोप केला आहे.
शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मते, ते न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करत नाही.
शरीफ यांना पाठिंबा देणाऱ्या देशाच्या शक्तिशाली लष्कराशी खान यांच्या संघर्षामुळे 24.1 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अनेक दशकांमधील सर्वात वाईट राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
बीबी, जिचे खरे नाव बुशरा खान आहे, ही खान यांची तिसरी पत्नी आहे.
2018 मध्ये खान पहिल्यांदा पंतप्रधान होण्याच्या सहा महिने आधी दोघांनी लग्न केले.
खान यांनी अनेकदा तिला आपला आध्यात्मिक गुरु म्हटले आहे आणि ती इस्लाममधील सूफीवादाप्रती असलेल्या तिच्या भक्तीसाठी ओळखली जाते.
अनेकदा ती लोकांच्या नजरेपासून दूर राहिली आहे, फक्त एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत ती जनतेला दिसली होती – मात्र तेव्हा देखील तिने पारंपरिक बुरखा परिधान केला होता.

 

तृप्ती नाथ
(रॉयटर्स)

 

 


Spread the love
Previous articleRussians Advancing Into East Ukrainian Town Selydove
Next articleIndia-China Reach Broad Consensus To Restore Ground Situation: Rajnath Singh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here