फ्रान्स भारताकडून ‘पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर प्रणाली’ विकत घेण्यासंदर्भात चर्चा करत आहे, जो द्विपक्षीय संरक्षण संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, यांच्या बुधवारी पॅरिसमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान, या महत्वपूर्ण खरेदी कराराबाबत चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी, फ्रेंच लष्कराला Pinaka MBRL प्रणालीचे सखोल मूल्यांकन करण्यासाठी आमंत्रण दिले आणि त्याच्या क्षमतांवर तसेच रणनीतिक महत्त्वावर त्यांनी यावेळी जोर दिला.
“जर फ्रान्सने या पिनाका प्रणालीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला, तर भारत-फ्रान्स संरक्षण संबंधांच्या मजबूतीकरणासाठी हा नक्कीच एक मैलाच दगड ठरेल,” असे बुधवारी जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (DRDO) विकसित केलेली- पिनाका प्रणाली, 75 किलोमीटर पर्यंतचे लक्ष्य साधू शकते. तीन महिन्यांपूर्वी जेव्हा फ्रेंच शिष्टमंडळाने भारताला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी या प्रणालीची एक झलक पाहिली होती आणि त्यावरील त्यांची प्रतिक्रिया समाधानकारक होती, अशी माहिती DRDO च्या एका उच्च अधिकाऱ्याने दिल्याचे, रॉयटर्सची नोंदीत म्हटले आहे.
अमेरिकेने तयार केलेल्या- HIMARS (हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम) सारख्या पाश्चात्य प्रणालीला, एक स्वस्त, प्रभावी आणि प्रगत पर्याय म्हणून भारत, पिनाका MBRL चा सक्रियपणे प्रचार करत आहे. आर्मेनियाने अलीकडेच, पिनाकाचे निर्माता- सोलर इंडस्ट्रीजकडे त्यांची ऑर्डर दिली आहे. याशिवाय अनेक एशियन आणि आफ्रिकन देशांनीही पिनाकाच्या खरेदीध्ये आपले स्वारस्य दर्शवले आहे. नायजेरिया आणि इंडोनेशियासोबत याबाबतच्या वाटाघाटी प्रगत टप्प्यात पोहचल्या आहेत.
दरम्यान, भारत आणि फ्रान्स आपले संरक्षण सहकार्य वाढवत आहेत. भारत-फ्रान्स संयुक्त निवेदनात क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर इंजिन आणि जेट इंजिन विकासावर चर्चा करण्यात आली. भारताच्या प्रगत मध्यम लढाऊ विमानासाठी (AMCA) 110 kN जेट इंजिन सह-विकसित करण्यासाठी फ्रेंच एरोस्पेस कंपनी Safran आणि DRDO यांच्यातील प्रस्तावित सहकार्यावर चर्चा सुरू आहे.
तथापि, भारताच्या नियोजित 26 राफेल-मरीन जेट्स आणि तीन अतिरिक्त स्कॉर्पीन पाणबुड्या-माझॅगॉन डॉक लिमिटेड (MDL) येथे नेव्हल ग्रुपच्या भागीदारीमध्ये बांधल्या जातील- यांचा संयुक्त निवेदनात उल्लेख करण्यात आलेला नाही, कारण ते पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) कडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा करत आहेत.
जर हा करार यशस्वीरित्या पूर्ण झाला, तर पिनाकाचा व्यवहार फ्रान्ससाठी भारतामधून केलेली पहिली शस्त्र खरेदी ठरेल. ज्यामुळे पारंपरिक भारत-फ्रान्स संरक्षण व्यापाराला चालना मिळेल. फ्रान्स नेहमीच रशियानंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार राहिला आहे. SIPRI (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट) नुसार, फ्रान्सने 2019 ते 2023 दरम्यान भारताच्या संरक्षण आयातीमध्ये महत्वपूर्ण सहभाग घेतला होता.