ऑपरेशन सिंदूर ते फ्युचर-रेडी फोर्सपर्यंत: राजनाथ सिंह यांचा ‘संयुक्ततेवर’ भर

0

दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी, भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर‘मधील यशामुळे, देशाच्या भविष्यातील लष्करी सिद्धांतासाठी एक नवीन मापदंड प्रस्थापित झाला आहे. मंगळवारी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह याच विषयावर बोलतेवेळी म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरने– भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलाच्या एकत्रित क्षमतांचे प्रभावी चित्र उभे केले. यावरुन हे सिद्ध झाले आहे की, तिनही दलातील ‘संयुक्तता’ आता ऐच्छिक राहिलेली नसून, वेगाने बदलणाऱ्या सुरक्षा वातावरणात ती एक जीवनावश्यक बाब बनली आहे.”

नवी दिल्लीत आयोजित, भारतीय हवाई दलाच्या एका परिसंवादामध्ये बोलताना सिंह म्हणाले की, “तिनही सेवा दलांच्या योग्य समन्वयामुळे आणि एकत्रित कार्य-प्रणालीमुळे, वास्तविक कालावधीती कार्यान्वित चित्र तयार झाले. ज्यामुळे, कमांडर्सना योग्यवेळी अचून निर्णय घेणे सुलभ झाले, परिस्थितीजन्स जागरूकता अधिक वाढली आणि पर्यायाने आपल्या लष्कराच्या नुकसानीचा धोका कमी झाला. ऑपरेशन सिंदूरमधील संयुक्तता हेच त्याचे यशाचे गमक आहे.”

ते पुढे म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरदरम्यान, हवाई दलाची ‘इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ (IACCS), भूदलाची ‘आकाशतीर’ प्रणाली आणि नौदलाची ‘त्रिगुण’ प्रणाली, या तिन्ही प्रणालींचे एकसंध कार्य ऑपरेशनचा भक्कम कणा बनले. यामुळे जमीनवरील, हवेतील आणि समुद्रातील कारवायांमध्ये अभूतपूर्व समन्वय पाहायला मिळाला.

सिंह यांनी यावेळी असा युक्तीवाद केला की, “ऑपरेशन सिंदूरचे हे यश, भविष्यातील अन्य संभाव्य ऑपरेशन्ससाठी एक आदर्श असेल, हा एक असा मापदंड आहे ज्याच्या आधारावर भविष्यातील सर्व संभाव्य संघर्षांचे मूल्यांकन केले जाईल.”

धोरणांद्वारे समर्थित उद्दिष्ट

सिंह यांनी, ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून मिळालेल्या धड्यांना भारत सरकारच्या व्यापक धोरणात्मक दृष्टिकोनाशी जोडताना सांगितले की, “कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः संयुक्ततेच्या मध्यवर्ती भूमिकेवर जोर दिला होता. तिनही सेवांमधील एकात्मता अधिक प्रमाणात वाढवणे, हे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे. हे केवळ एक धोरण नाही, तर ही जीवनावश्यक बाब आहे.” अशाप्रकारे सिंह यांनी, संयुक्ततेला राष्ट्रीय सुरक्षा आणि कार्यात्मक परिणामकारकतेचा आधारस्तंभ म्हणून सादर केले.

परंपरेला छेद देत, डिजिटल समन्वयाकडे… 

आपल्या भाषणादरम्यान संरक्षणमंत्री म्हणाले की, “जरी तिनही सेवादलांनी गेल्या अनेक दशकांपासून, स्वतंत्रपणे मजबूत प्रणाली विकसित केल्या असल्या तरी, आता ऑपरेशल संयुक्तता प्राप्त करण्यासाठी स्वतंत्र काम करण्याच्या पंपरेला छेद देत, सामायिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणे आवश्यक आहे.” याच धर्तीवर सिंह यांनी, भूदलाच्या कॉम्प्युटराइज्ड इन्व्हेंटरी कंट्रोल ग्रुप, वायुदलाच्या इंटिग्रेटेड मटेरियल्स मॅनेजमेंट ऑनलाइन सिस्टीम आणि नौदलाच्या इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट सिस्टीमचे कौतुक केले आणि या तिन्ही कार्य प्रणालींना एकत्र आणण्यासाठी, ‘त्रि-सेवा लॉजिस्टिक्स ॲप्लिकेशन’ विकसित केले जात असल्याची घोषणा केली.

सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले की, “हा डिजिटल समन्वय, उपलब्ध संसाधनांची पारदर्शकता, जबाबदारी आणि सामायिक दृश्यमानता सुनिश्चित करेल. यामुळे पुरेसा साठा निर्माण होईल आणि अनावश्यक खरेदी कमी होण्यास मदत होईल.” हे ॲप्लिकेशन  तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक अशा दोन्ही स्तरांवर संयुक्तततेचे सक्षमीकरण करणारे माध्यम असेल, असेही त्यांनाी यावेळी सांगितले.

केवळ संरचनेत नाही, तर संस्कृतीत बदल

मात्र, दुसरीकडे राजनाथ सिंह यांनी हेदेखील कबूल केले की, “संयुक्तता केवळ तंत्रज्ञान किंवा संरचनात्मक सुधारणांपुरती मर्यादित नाही. त्यासाठी तिनही दलांमध्ये सांस्कृतिक बदल होणे आवश्यक आहे.” त्यांनी यावेळी नमूद केले की, “मागील अनेक दशकांपासून एका सेवेने मिळवलेले कार्यात्मक ज्ञान हे त्यांच्यापुरतेच मर्यादित राहिले, म्हणजे जर भूदलाने कोणते तंत्रज्ञान विकसित केले, तर ते भूदलापुरतेच मर्यादित राहिले. नौदल किंवा वायुदलाने विकसित केलेली एखादी प्रणाली, त्यांच्या स्वतःच्या सीमांमध्येच राहिली. मात्र, आता या विभाजनाने सामूहिक शिक्षणाला वाट मोकळी करून दिली पाहिजे,” असे मत सिंह यांनी व्यक्त केले.

याशिवाय त्यांनी, केवळ स्वत:च्या गरजेपुरती एकात्मता न ठेवण्याच्या इशारा दिला. उदाहरणार्थ, “हिमालयातील थंडी वाळवंटातील उष्णतेसारखी नसते. नौदलाला भूदल आणि वायुदलापेक्षा वेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे एकात्मतेने विश्वास आणि आंतर-कार्यक्षमता निर्माण करत असताना, प्रत्येकाने अशा फरकांचा आदर केला पाहिजे,” असेही ते म्हणाले.

त्रि-दलांव्यतिरिक्तही संयुक्ततेचा विस्ताराला वाव

सिंह यांनी यावेळी आणखी एका गोष्टीवर जोर दिला. ते म्हणाले की, “संयुक्ततेचा विस्तार केवळ त्रि-दलांपुरताच मर्यादित न राहता, भारतीय तटरक्षक दल, सीमा सुरक्षा दल आणि नागरी नियमन जसे की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला देखील यात समाविष्ट केले पाहिजे.” सावधानतेचा इशारा देत सिंह म्हणाले की: “विमान वाहतूक सुरक्षा आणि सायबर संरक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये विभाजित मानके असुरक्षितता निर्माण करू शकतात, ज्याचा फायदा शत्रू घेऊ शकतो. त्यामुळे आता कोणतीही स्वतंत्रपणे कार्यरत राहू शकत नाही, संयुक्तता राखणे ही काळाची गरज आहे.”

भाषणाच्या अखेरीस, सिंह यांनी लष्करी नेतृत्वाला आवाहन केले की, “त्यांनी एकात्मतेचे मूल्य संपूर्ण कमांड शृंखलेपर्यंत पोहोचवावे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम कार्यपद्धतींचा अभ्यास करून, त्यांना भारताच्या भूभाग आणि संस्कृतीनुसार जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरु करावेत.” सिंह यांनी या सगळ्याचा असा निष्कर्ष काढला की, “जेव्हा आपली सर्व सशस्त्र दले, ही एकजुटीने, योग्य समन्वय आणि ताळमेळ साधत कार्य पुढे नेतील, तेव्हाच भारत सर्व क्षेत्रांमध्ये शत्रूला तोंड देण्यासाठी सक्षम बनेल आणि भारताची मान अभिमानाने उंचावू शकेल. संयुक्तता ही काळाची गरज आहे आणि मला खात्री आहे की आपण ते नक्कीच साध्य करून दाखवू.” 

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndigenisation Non-Negotiable for Future Warfare, Says IAF Deputy Chief at Aero Tech India 2025
Next articleIndia, Australia to Elevate Strategic Cooperation During Rajnath Singh’s Canberra Visit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here