मुस्तद्देगीरीतील मर्यादांच्या पार्श्वभूमीवर राफात प्रचंड बॉम्बफेक
दि. १३ जून: युद्धबंदीच्या प्रस्तावात हमासकडून सुचविण्यात आलेली दुरुस्ती आणि मुस्तद्देगीरीला असलेल्या मर्यांदांच्या पार्श्वभूमीवर इस्त्राईली फौजांच्या रणगाड्यांनी गुरुवारी राफाच्या पश्चिम भागात खोलवर मुसंडी मारली. या हल्ल्यादरम्यान इस्त्राईलने जमीन, हवा आणि समुद्रातून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या मदतीने राफावर प्रचंड प्रमाणात बॉम्बफेकही केली. या हल्ल्यामुळे येथील शरणार्थी शिबिरांमध्ये आश्रय घेतलेल्या विस्थापितांची मोठी पळापळ झाली. तसेच, वीज पुरवठा बंद पडल्याने मदतकार्यातही अडचण उभी राहिली.
राफातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार इस्त्राईली फौजा आणि रणगाड्यांनी गुरुवारी राफाच्या किनारपट्टीवरील अल-मावासी या भागाकडे मुसंडी मारली आणि तेथे मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक केली. राफावरील इस्त्राईलचे प्रतिआक्रमण सरू होण्यापूर्वी मे महिन्यात हा सर्व भाग मानवी मदत आणि बचावकार्यासाठी राखीव असेल, असे इस्त्राईलने म्हटले होते, असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. मात्र, इस्त्राईलच्या सैन्याकडून हा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. ‘आम्ही अल-मावासी’च्या मानवीय सहाय्यता भागात हवाईहल्ले केलेले नाहीत,’ असे इस्त्राईलने म्हटले आहे. मात्र, या भागातून हमासचा पूर्ण खातमा केल्याशिवाय आमचा प्रतिहल्ला थांबणार नाही. या भागात हमासची एकमेव लढाऊ तुकडी शिल्लक आहे. ती पूर्णपणे नेस्तनाबूत करणे, हे आमचे लक्ष्य आगे, असे इस्त्राईलने म्हटले आहे. राफावर करण्यात आलेली लष्करी कारवाई गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. काल रात्री या भागात सैन्यादालांनी मोठ्याप्रमाणात शस्त्रे जप्त केली असून, हातघाईच्या युद्धात एका पॅलेस्टिनी हल्लेखोरालाही ठार करण्यात आले आहे, अशी माहितीही इस्त्राईलकडून देण्यात आली आहे. या भागात संघर्ष आणखी तीव्र झाल्यामुळे निर्वासितांनी आता उत्तरेकडील खान युनुस आणि डेरा अल-बलाह या गाझाच्या मध्यभागात असलेल्या छावण्यांकडे मोर्चा वळविला आहे.
युद्धबंदी प्रस्ताव
गाझामध्ये युद्धबंदी घडवून आणण्यासाठी इस्त्राईल, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राने दिलेला प्रस्ताव हमासने स्वीकारला असला, तरी त्यात त्यांनी काही दुरुस्ती सुचवली आहे. त्यात प्रामुख्याने इस्त्राईलकडून सैन्य मागे घेणे आणि इतर मागण्यांचा समावेश आहे. इस्त्राईलकडून हमासने सुचविलेली दुरुस्ती फेटाळण्यात आली आहे. ‘अमेरिकेच्या युद्धबंदीच्या प्रस्तावात हमासने सुचविलेली कोणतीही दुरुस्ती स्वीकारण्या योग्य नाही, मात्र तरीही या साठीचे प्रयत्न सरूच आहेत,’ असे युद्धबंदीबाबत मध्यस्थी करीत असलेल्या मध्यस्थांनी सांगितले. या मध्यस्थांना अमेरिकेचाही पाठींबा आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी सात ऑक्टोबर रोजी इस्त्राईलवर हल्ला करून १२०० ज्यू नागरिकांची कत्तल आणि २५० अपहरण केल्यानंतर इस्त्राईलने हमासविरोधात गाझापट्टीत आघाडी उघडली होती. या संघर्षात आत्तापर्यंत ३७ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला असून, काही लाख नागरिक जखमी आणि विस्थापित झाले आहेत.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)