अमेरिकन एरोस्पेस दिग्गज जीई एरोस्पेसने Tejas लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) Mk1A साठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला पहिले 99 F404-IN20 इंजिन वितरित केले. दोन वर्षांच्या करारातील विलंबानंतर आलेल्या या बहुप्रतिक्षित वितरणामुळे तेजस Mk1A – जे भारतीय वायुसेनेसाठी (IAF) एक महत्त्वाचे विमान आहे – उत्पादनाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
F404-IN20 इंजिन तेजस Mk1A लढाऊ विमानांना सामर्थ्य देणारे आहे. मात्र त्याच्या पुरवठ्यातील विलंबामुळे भारतीय हवाई दलामध्ये चिंता वाढली होती, कारण भारतीय हवाई दलातील फायटर जेट्सच्या स्क्वाड्रनची संख्या झपाट्याने कमी होत आहे. जीई एरोस्पेसने HAL सोबतच्या चार दशकांच्या भागीदारीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या वितरणाचे वर्णन केले आणि भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमता बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
“Tejas लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट Mk 1A फाईटर जेटसाठी आमच्या मौल्यवान ग्राहक हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला 99 पैकी पहिली F404-IN20 इंजिने वितरीत करताना आम्हाला आनंद झाला. एचएएल सोबतच्या आमच्या 40 वर्षांच्या संबंधांमधील आणि देशाच्या संरक्षण उत्पादन क्षमता वाढवत पुढच्या पिढीतील लढाऊ विमाने विकसित करून भारतीय लष्कराचे भक्कम भविष्य सुनिश्चित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असे जीई एरोस्पेसने म्हटले आहे.
5 हजार 900 कोटी रुपयांच्या 2021 च्या करारानुसार, जीई एरोस्पेस 2025 मध्ये 12 इंजिने वितरीत करणार आहे, त्यानंतर करार पूर्ण होईपर्यंत दरवर्षी 20 इंजिने वितरीत करणार आहे. या पुरवठा साखळीतील वाढीमुळे भारतीय हवाई दलाला या वर्षाच्या अखेरीस त्यांचे पहिले Tejas MK 1A स्क्वॉड्रन कार्यान्वित करण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे.
जीई एरोस्पेसला भारतात लष्करी जेट प्रणोदन सहकार्याचा भक्कम इतिहास आहे. 1980 च्या दशकात एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीशी सहकार्य केल्यानंतर, जीई एरोस्पेसच्या F404-IN20 इंजिनची 2004 मध्ये सिंगल-इंजिनवर चालणाऱ्या Tejasसाठी निवड करण्यात आली, असे कंपनीच्या निवेदनात नमूद केले आहे.
या इंजिने वेळेत पोहोचणे महत्त्वाचे आहे कारण जुन्या मिग-21 बायसन जेट टप्प्याटप्प्याने निवृत्त झाल्यामुळे आयएएफच्या स्क्वाड्रनची ताकद कमी होत आहे. सध्या मंजूर केलेल्या 42 स्क्वाड्रनांच्या तुलनेत 31 स्क्वाड्रनच कार्यरत आहेत. प्रगत विमानचालन आणि उत्कृष्ट लढाऊ क्षमतांनी सुसज्ज असलेल्या Tejas MK 1A मुळे ही कमतरता काही अंशी कमी होईल आणि भारताच्या स्वदेशी लढाऊ ताफ्याला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.
टीम भारतशक्ती