अनुभवी अधिकारी असलेल्या गिरीधर अरमाने यांनी 1 नोव्हेंबर रोजी संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारला. या नवनियुक्तीपूर्वी ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत होते. सोमवारी सेवेतून निवृत्त झालेल्या अजय कुमार यांच्या जागी अरमाने यांची नियुक्ती झाली आहे.
आंध्र प्रदेश केडरच्या 1988 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी अरमाने यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी, राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला आणि शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली. “आम्ही या शूरवीरांकडून प्रेरणा घेऊन भारताला सुरक्षित आणि समृद्ध देश बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे” प्रतिपादन त्यांनी केले.
आयएएस अधिकारी म्हणून 32 वर्षांच्या कारकीर्दीत अरमाने यांनी आंध्र प्रदेश आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी कॅबिनेट सचिवालयात अतिरिक्त सचिव म्हणूनही काम सांभाळले आहे. अरमाने यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील संशोधन विभागात देखील काम केले आहे. याशिवाय ते विमा नियामक आणि विकास प्राधिकरणामध्ये (IRDA) तपास कार्याचे प्रभारी कार्यकारी संचालक होते.
आंध्र प्रदेशात, अरमाने यांनी नगर विकास विभागात प्रधान सचिव, आंध्र प्रदेश राज्य वित्त निगमचे व्यवस्थापकीय संचालक आणि वित्त विभागाचे सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी चित्तूर आणि खम्मम जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी (डीएम) पदही भूषविलेले आहे.
हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी टेक आणि आयआयटी, मद्रासमधून एम टेक केलेल्या अरमाने यांनी वारंगल येथील काकतिया विद्यापीठातून एमए (अर्थशास्त्र) सुद्धा केले आहे.
(अनुवाद : आराधना गोखले)