युद्धबंदी, ओलिसांची सुटका यावरील चर्चेसाठी हमासचे प्रतिनिधी इजिप्तमध्ये

0
इस्रायलशी वाटाघाटी करण्यासाठी हमासचे प्रतिनिधी रविवारी इजिप्तला पोहोचले. या वाटाघाटींमुळे गाझामधील लढाई संपेल आणि ओलिसांची सुटका होईल अशी अमेरिकेला आशा आहे. या दृष्टीने येणारे काही दिवस महत्त्वाचे असतील असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्ट्रॅटेजिक अफेयर्स मंत्री रॉन डर्मर यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलकडून वाटाघाटी करणारे प्रतिनिधी सोमवारी इजिप्तला पोहोचणार असून ते शर्म अल-शेख येथील लाल समुद्रातील रिसॉर्टमध्ये ओलिसांच्या सुटकेबाबत वाटाघाटी करणार आहेत.  जवळजवळ दोन वर्षांच्या गाझा युद्धाचा शेवट करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेचा तो एक भाग आहे.

“या तांत्रिक वाटाघाटी दळणवळणाच्या संदर्भात कशाप्रकारे पुढे जातात यावरून हमास गंभीर आहे की नाही हे आम्हाला लवकरच कळेल,” असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी रविवारी एनबीसी न्यूजच्या “मीट द प्रेस” ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. गाझामधील उर्वरित 48 ओलिसांच्या सुटकेबद्दल ते बोलत होते. ओलिसांपैकी 20 जण जिवंत आहेत.

ट्रम्प रविवारी म्हणाले की वाटाघाटी वेगाने पुढे जात आहेत. “मला सांगण्यात आले आहे की पहिला टप्पा या आठवड्यात पूर्ण झाला पाहिजे आणि मी सर्वांना जलद गतीने पुढे जाण्यास सांगत आहे,” असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

पहिला टप्पा पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात ओलिसांच्या सुटकेशी संबंधित आहे.

शांतता प्रयत्न

हमासचे निर्वासित गाझा प्रमुख खलील अल-हय्या यांच्या नेतृत्वाखालील हमासचे एक शिष्टमंडळ रविवारी रात्री उशिरा इजिप्तमध्ये दाखल झाले. संघर्ष थांबवण्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात प्रगत प्रयत्नांच्या अंमलबजावणीसाठी अमेरिका आणि कतारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी ते आले आहेत.

गेल्या महिन्यात कतारची राजधानी दोहा येथे इस्रायली हल्ल्यातून वाचल्यानंतर हय्या यांचा इजिप्तला हा पहिलाच दौरा आहे.

गाझामधील लढाई संपवणे, उर्वरित ओलिसांची सुटका करणे आणि प्रदेशाचे भविष्य निश्चित करणे यासाठी 20 कलमी योजनेचा ट्रम्प यांनी प्रचार केला आहे. इस्रायल आणि हमास यांनी या योजनेतील काही भागांवर सहमती दर्शविली आहे.

हमासने शुक्रवारी ओलिसांची सुटका आणि इतर अनेक मुद्दे मान्य केले, मात्र निःशस्त्रीकरणाच्या आवाहनांसह वादग्रस्त मुद्द्यांना त्यांनी बाजूला सारले – जे त्यांनी बऱ्याच काळापासून नाकारले आहेत.

ट्रम्प यांनी हमासच्या प्रतिसादाचे स्वागत केले आणि म्हटले की आपल्याला वाटते की हमासने “कायमस्वरूपी शांततेसाठी तयार” असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी इस्रायलला गाझावर सुरू असणारी बॉम्बफेक ताबडतोब थांबवण्यास सांगितले, परंतु एन्क्लेव्हवर इस्रायलकडून हल्ले सुरूच आहेत.

युद्धबंदीपूर्वी ‘सर्वसमावेशक करार’

इजिप्तमधील चर्चेची माहिती देणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, युद्धबंदी लागू करण्यापूर्वी वाटाघाटी करणारे सर्वसमावेशक करार करण्यावर लक्ष केंद्रित करतील.

“टप्प्याटप्प्याने होणाऱ्या वाटाघाटीच्या आधीच्या फेऱ्यांपेक्षा हे वेगळे आहे, जिथे पहिल्या टप्प्यावर सहमती झाली होती आणि त्यानंतर शस्त्रसंधीच्या पुढील टप्प्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वाटाघाटी आवश्यक होत्या,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

“त्यानंतरच्या वाटाघाटींच्या फेऱ्यांमध्ये काही गोष्टी बिघडल्या होत्या आणि यावेळी मध्यस्थांमध्ये तो दृष्टिकोन टाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.”

रुबियो यांनी एबीसीच्या “दिस वीक” ला सांगितले की, ओलिसांच्या सुटकेसाठी करार अंतिम करण्यासाठीची वेळ निश्चित नव्हती परंतु चर्चेला “आठवडे किंवा अनेक दिवस लागू शकत नाहीत. आम्हाला हे खूप लवकर घडताना पहायचे आहे.”

इस्रायली हल्ले सुरूच

या योजनेमुळे पॅलेस्टिनींमध्ये शांततेची आशा निर्माण झाली आहे, परंतु रविवारीही गाझावरील इस्रायली हल्ले सुरूच राहिले. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमाने आणि रणगाड्यांनी संपूर्ण परिसरात जोरदार हल्ले केला, ज्यामध्ये किमान 19 जणांचा मृत्यू झाला.

मृतांपैकी चार जण पट्टीच्या दक्षिणेला मदत मागत होते आणि पाच जण दुपारी गाझा शहरात झालेल्या हवाई हल्ल्यात मारले गेले, असे त्यांनी सांगितले.

मध्य गाझा येथील विस्थापित पॅलेस्टिनी नागरिक अहमद असद यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या योजनेची बातमी कळताच ते आशावादी होते, परंतु जमिनीवर अद्याप कोणतीही बदल झालेला नाही.

“आम्हाला परिस्थितीत कोणताही बदल दिसत नाही; उलट, आम्हाला काय कारवाई करावी हे माहित नाही, आम्ही काय करावे? आम्ही रस्त्यावरच राहू का? आम्ही निघून जाऊ का?” त्यांनी विचारले.

ट्रम्प यांच्या योजनेबद्दल इस्रायली आशावादाचे चिन्ह म्हणून, शेकेल चलन डॉलरच्या तुलनेत तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आणि तेल अवीवमधील शेअर बाजारांनी सर्वकालीन उच्चांक गाठला.

युद्धाचा अंत?

तेल अवीवमधील काही लोकांनीही अशीच भावना व्यक्त केली. “अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच मी खरोखर आशावादी आहे. ट्रम्प यांनी खरोखरच आपल्यात खूप आशा निर्माण केली आहे,” असे रहिवासी गिल शेली म्हणाले.

स्थानिक पातळीवर,  ओलिस कुटुंबे आणि युद्धाने कंटाळलेल्या जनतेकडून – आणि गाझामधील इस्रायलच्या मोहिमेत कोणतीही घट होऊ नये असा आग्रह धरणाऱ्या त्यांच्या युतीतील कट्टरपंथी सदस्यांच्या मागण्यांमुळे इस्रायली अध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू युद्ध संपवण्यासाठी वाढत्या दबावाखाली आहेत –

अतिउजव्या विचारसरणीचे अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांनी एक्सवर सांगितले की गाझावरील हल्ले थांबवणे ही एक “गंभीर चूक” असेल. त्यांनी आणि सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी गाझा युद्ध संपल्यास नेतान्याहू यांचे सरकार पाडण्याची धमकी दिली आहे.

परंतु मध्यमार्गी येश एटिड पक्षाचे विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी म्हटले आहे की ट्रम्प यांचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राजकीय कव्हर दिले जाईल आणि “आम्ही त्यांना करार मोडू देणार नाही.”

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या नेतृत्वाखालील इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात सुमारे 1 हजार 200 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इस्रायलने गाझावर हल्ला सुरू केला. इस्रायली आकडेवारीनुसार, 251 जणांना ओलीसदेखील ठेवले गेले होते.

गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, इस्रायलच्या मोहिमेमुळे गाझात 67 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक स्थानिक नागरिक होते, त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleपंतप्रधान स्टारमर यांच्या भेटीपूर्वी, यूके-भारत नौदल सरावाला गती
Next articleSelf-Reliant Navy Gathers Steam with Commissioning of Anti-Submarine Ship Androth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here