हमासकडून अंतिम चार ओलिसांचे मृतदेह इस्रायलच्या ताब्यात

0
चार
इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमधील रामल्ला येथे हमास आणि इस्रायल यांच्यात गाझामध्ये झालेल्या ओलिस-कैद्यांच्या अदलाबदल आणि युद्धबंदी कराराचा एक भाग म्हणून इस्रायली तुरुंगातून सुटका झालेल्या पॅलेस्टिनी कैद्यांचे स्वागत करण्यासाठी 27 फेब्रुवारी 2025 रोजी लोक एकत्र जमले. (रॉयटर्स/मोहम्मद तोरोकमन)

 

इस्रायलने शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केल्याने त्या बदल्यात हमासने चार ओलिसांचे मृतदेह इस्रायलच्या ताब्यात दिले. गाझा युद्धविरामातील ही अंतिम अदलाबदल रात्रभर सुरू होती.

19 जानेवारी रोजी युद्धविराम लागू झाला आणि अनेक अडथळे असूनही तो मोठ्या प्रमाणात कायम राहिला आहे. मात्र त्याचा पहिला टप्पा या आठवड्यात संपणार असून युद्ध संपवण्याचे उद्दिष्ट असलेल्या त्याच्या पुढील टप्प्याचे भवितव्य अद्याप धूसर आहे.

आपण दुसऱ्या टप्प्यातील चर्चा सुरू करण्यास तयार असल्याचे हमासने गुरुवारी सांगितले. उर्वरित ओलिसांची सुटका करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे युद्धबंदीची वचनबद्धता असल्याचेही हमासने स्पष्ट केले.

अनेक दिवसांच्या पेचप्रसंगानंतर, इजिप्तच्या मध्यस्थीने बुधवारी कराराच्या पहिल्या टप्प्यात, एकतर गाझामध्ये इस्रायली सैन्याने ताब्यात घेतलेल्या किंवा इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या 620 पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात अंतिम चार ओलिसांचे मृतदेह इस्रायलला देण्यात आले.

हमासने एका कार्यक्रमाद्वारे सहा ओलिसांना सुपूर्द केल्यानंतर इस्रायलने शनिवारी कैद्यांची सुटका करण्यास नकार दिला होता.

हमासने गाझामध्ये गर्दीसमोर मंचावर जिवंत असणारे ओलिस आणि मृत्यूमुखी पडलेल्या ओलिसांचे अवशेष असणारी शवपेटी प्रदर्शित केली होती . या कृत्यावर  संयुक्त राष्ट्रांसह जगभरातून तीव्र टीका करण्यात आली.

काल झालेल्या अंतिम हस्तांतरणामध्ये अशा कोणत्याही कार्यक्रमाचा समावेश नव्हता.

ओलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार सूचना

इस्रायलला चार ओलिसांचे अवशेष असणाऱ्या शवपेट्या मिळाल्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने गुरुवारी पहाटे सांगितले.

हमासने यापूर्वी हे मृतदेह त्साची इदान, इझाक एल्गारत, ओहाद याहालोमी आणि श्लोमो मांटझूर यांचे असल्याचे सांगितले होते, ज्यांचे 7 ऑक्टोबर 2023 रोजी गाझाजवळील त्यांच्या किबुट्झ घरातून अपहरण करण्यात आले होते.

इस्रायलमध्ये या मृतदेहांची प्राथमिक ओळख पटवली जात असून ही  प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओलिसांच्या कुटुंबियांना अधिकृत सूचना दिली जाईल, असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

दुसऱ्या दिवशी योग्य मृतदेह सुपूर्द करण्यापूर्वी, हमासने शिरी बिबासऐवजी एका अज्ञात पॅलेस्टिनी महिलेचा मृतदेह सुपूर्द केल्यानंतर  अदलाबदल करण्याचा करारही यापूर्वी स्थगित करण्यात आला होता. या अज्ञात महिलेचा मृतदेह गुरुवारी गाझा रुग्णालयात परत पाठवण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

इस्रायली आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलला परत केलेल्या अंतिम चार ओलिसांच्या मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी त्यांची संपूर्ण न्यायवैद्यक तपासणी नंतर केली जाईल.

इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गाझामध्ये सुमारे 30 ओलिसांना मारले गेले आहेत. काहींना त्यांच्या अपहरणकर्त्यांनी ठार मारले आणि काही इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये ठार झाले.

पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका

हमासच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांमध्ये गाझात अटक करण्यात आलेले 445 पुरुष आणि 24 महिला आणि अल्पवयीन मुले याशिवाय इस्रायली लोकांवरील प्राणघातक हल्ल्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 151 कैद्यांचा समावेश आहे.

ताबा मिळवलेल्या वेस्ट बँकमधील इस्रायलच्या ओफेर तुरुंगातून सुटका झालेल्या मूठभर पॅलेस्टिनी कैद्यांना घेऊन जाणारी बस बाहेर पडली आणि थोड्याच वेळात पॅलेस्टाईनच्या रामल्ला शहरात पोहोचली, असे लाइव्ह फुटेजवरून दिसून आले.

बाहेर जमलेल्या शेकडो लोकांच्या जल्लोषात हा गट बसमधून उतरला आणि सुटका झालेल्या काही पुरुषांना जमावाने वरच्यावर झेलले.

दडपशाही, वाईट परिस्थिती

सुटका झालेल्या 42 वर्षीय कैदी बिलाल यासीनने रॉयटर्सला सांगितले की तो 20 वर्षांपासून इस्रायली नजरकैदेत होता. वेस्ट बँक येथील रहिवाशाने सांगितले की त्याने संपूर्ण वेळ दडपशाही आणि खराब परिस्थितीचा सामना केला होता.

“आमचे बलिदान आणि तुरुंगवास व्यर्थ गेला नाही,” अशी प्रतिक्रिया यासिनने दिली. “आम्हाला (पॅलेस्टिनींच्या) प्रतिकारशक्तीवर विश्वास होता.”

हमासचा एक स्रोत आणि इजिप्शियन प्रसारमाध्यमांनुसार, आणखी सुमारे 100 पॅलेस्टिनी कैद्यांना इजिप्तच्या ताब्यात देण्यात आले आहे. दुसऱ्या देशाने त्यांचा स्वीकार करेपर्यंत ते तिथेच राहतील.

सुटका झालेल्या पॅलेस्टिनींच्या वैद्यकीय तपासणीसाठी सज्ज असलेल्या आणि त्यांना त्यासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका गुरुवारी पहाटे दक्षिण गाझामधील खान युनूस येथील युरोपियन रुग्णालयात पोहोचल्या.

हमासच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये एकूण 580 कैदी आणि अटकेत असलेल्यांची सुटका केली जाईल. रेड क्रॉसच्या संरक्षणाखाली येणाऱ्या बसेस येत्या काही तासांत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 2 हजार पॅलेस्टिनी कैदी आणि अटकेत असलेल्यांची एकूण 33 इस्रायली ओलिसांबरोबर अदलाबदल आणि गाझामधील काही ठिकाणाहून इस्रायली सैन्य मागे घेणे तसेच मदतीचा ओघ यांचा समावेश होता.

मात्र  42 दिवसांचा युद्धविराम शनिवारी संपुष्टात येत असल्याने, उर्वरित 59 ओलिसांपैकी जास्तीत जास्त मुक्त होऊ शकतील यासाठी मुदतवाढ मिळेल की कराराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी वाटाघाटी सुरू होऊ शकतील हे अद्याप अस्पष्ट आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleDRDO, नौदलाने Anti-Ship मिसाईलच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या
Next articleArmy Chief’s France Visit Focuses On Military Ties, Airbus H125 Helicopters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here