कायमस्वरूपी युद्धविरामाच्या प्रगतीविना तात्पुरती शस्त्रसंधी हमासने फेटाळली

0

हमासच्या सशस्त्र शाखेच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की, जरी हा गट गाझा संघर्षात अंतरिम युद्धबंदीला पाठिंबा देत असला तरी, सध्या चालू असलेल्या चर्चेत अशा निर्णयापर्यंत पोहोचण्यात अपयश आल्यास, ते युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी व्यापक कराराची मागणी करु शकतात.

अबू उबैदा यांनी एका दूरदर्शन भाषणात म्हटले की, “हमासने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या सर्व बंधकाना सोडून देण्याची आणि कायमस्वरूपी युद्धविरामाच्या कराराबाबत पुन्हा पुन्हा तयारी दर्शवली आहे, परंतु इस्रायलने हे प्रस्ताव नाकारले आहेत.”

कतार आणि इजिप्त या अरब मध्यस्थांनी, संयुक्त राज्यांच्या पाठिंब्याने, एक 60 दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाच्या प्रस्तावावर 10 हून अधिक दिवस चाललेल्या चर्चांचे आयोजन केले आहे. या युद्धामुळे संपूर्ण पॅलेस्टिनी पट्टा उद्ध्वस्त झाला आहे.

यहूदी सबाथच्या पूर्वसंध्येला इस्रायली अधिकाऱ्यांकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.

हमासकडून प्रत्युत्तर नाही

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, यांच्या कार्यालयाने शुक्रवारी पोप लिओ यांच्याशी झालेल्या फोन संभाषणानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बंधकांना सोडवण्यासाठी आणि 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी इस्रायल करत असलेले प्रयत्न अद्याप हमासकडून स्विकारले गेलेले नाहीत.”

या प्रस्तावाच्या अंशतः अंमलबजावणीत, 10 बंदकांना परत आणले जाणार असून, इतर 18 जणांचे मृतदेह देखील परत करण्यात येणार आहेत, हे सर्व 60 दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने होईल. त्या बदल्यात, इस्रायल काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल.

अबू उबैदा म्हणाले की, “शत्रू जर यावेळीही नेहमीप्रमाणे हटवादीपणे वागत राहिला आणि टाळाटाळ करत राहिला, तर आम्ही पुन्हा एखाद्या अंशतः करारावर किंवा 10 बंदकांच्या प्रस्तावावर परत येऊ, याची खात्री देता येत नाही.”

शुक्रवारी, दोन हमास अधिकाऱ्यांनी सांगितले की, “अद्याप इस्रायली सैन्याच्या माघारीसंबंधातील नकाशे, गाझामध्ये मदत पोचवण्याच्या यंत्रणा आणि युद्ध थांबवण्यासाठी आवश्यक असलेली हमी यावर विवाद कायम आहेत.”

त्यांनी स्पष्ट केले की, ‘सध्याच्या चर्चांमध्ये अद्याप कोणतेही महत्त्वाचे यश मिळालेले नाही.’

हमासचे म्हणणे आहे की, ‘कोणताही करार हा अंतिमतः युद्ध समाप्तीच्या दिशेने नेणारा असावा.’ तर, नेतान्याहू म्हणतात की, “युद्ध तेव्हाच संपेल जेव्हा हमासला निःशस्त्रीकरण केले जाईल आणि त्याचे नेते गाझामधून बाहेर काढले जातील.”

इस्रायलच्या कारवायांमध्ये, आतापर्यंत गाझातील 58,600 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असे गाझा आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या संघर्षात जवळपास 1,650 इस्रायली आणि परदेशी नागरिक ठार झाले आहेत, ज्यात 7 ऑक्टोबर, 2023 रोजी हमासने दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या 1,200 जणांचाही समावेश असल्याचे, इस्रायली आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाकडून बोल्सोनारोविरुद्ध वॉरंट जारी
Next articleट्रम्प यांच्या ICC वरील निर्बंध आदेशाला अमेरिकन न्यायाधीशांनी दिली स्थगिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here