व्हिएतनामची राजधानी असलेले ‘हनोई’ Hanoi शहर, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आले आहे.
मागील आठवड्यापासून प्रदूषणाच्या दाट धुक्याने झाकले गेलेले, हनोई जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून चर्चेत आले असून, तिथल्या सरकारचे म्हणणे म्हणणे आहे की, ही समस्या कमी करण्यासाठी ते भविष्यात अधिक इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणण्याच्या तयारीत आहेत.
PM 2.5 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोकादायक लहान कणांची पातळी, हनोईमध्ये शुक्रवारी सकाळी 266 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी मोजली गेली, त्यामुळे एअरव्हिज्युअलनुसार, सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये या शहराने सर्वात वरचे स्थान मिळवले.
‘AirVisual’ फोन ॲपद्वारे स्वतंत्र जागतिक वायू प्रदूषण माहिती प्रदान करते.
दक्षिणपूर्व आशियातील व्हिएतनाम हा देश, आशियातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेले प्रादेशिक उत्पादन केंद्र आहे. याच देशातील प्रमुख शहरांमध्ये आणि विशेषतः राजधानी हनोईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर वायू प्रदूषण नोंदवले गेले आहे.
हनोईमध्ये जमणारे प्रदुषणाचे दाट धुके, हे मुख्यतः जड वाहनांची वाहतूक, कचरा जाळणे आणि औद्योगिक क्रियाकलापांमुळे तयार होत असल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे.
शहरातील ६४ वर्षीय रहिवासी लुउ मिन्ह डुक म्हणाले, की ”आम्हाला प्रदुषण वाढीचा सर्वाधिक त्रास होतो आहे. यामुळे वृद्धांमध्ये मोठ्याप्रमाणावर श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवत आहे. वाढते प्रदुषण ही एक गंभीर समस्या आहे”.
“गेल्या काही वर्षांमध्ये प्रदुषणाची समस्या अधिक गंभीर झाली आहे”, अशी इथल्या तरुणांचीही तक्रार आहे.
21 वर्षीय विद्यार्थी- गुयेन निन्ह हुओंगने सांगितले की, “आधी मला वाटले हे धुके आहे पण नंतर मला कळले की ही प्रदुषित धूळ आणि धूर आहे, जी माझी दृष्टी कमी करत आहे आणि मला श्वास घ्यायला त्रास होतो आहे.”
गुरुवारी परिवहन मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत बोलताना, उपपंतप्रधान- ‘ट्रॅन हाँग हा’ यांनी, प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीव (EVs) संक्रमणाची मागणी केली, असे राज्य माध्यमांनी सांगितले.
आत्तापर्यंत, हनोईने 2030 पर्यंत किमान 50% बसेस आणि 100% टॅक्सीज इलेक्ट्रिक वाहन (EVs) तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
“इलेक्ट्रिक वाहनांसह अन्य उपायांद्वारे प्रदुषणाचा स्तर कमी करणे, ही राज्याची स्थानिक लोकांप्रति असलेली प्राथमिक जबाबदरी आहे आणि आम्ही त्यादृष्टीने कार्यरत आहोत”, असे हाँग हा यांनी टिएन फोंग वृत्तपत्राद्वारे सांगितले.
दरम्यान, स्थानिक नैसर्गिक संसाधने तसेच पर्यावरण आणि आरोग्य मंत्रालयाने याबाबत टिप्पणी देण्यासाठी रॉयटर्सच्या विनंतीला तत्काळ प्रतिसाद दिला नाही.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)