हिजबुल्लाने बुधवारी केलेल्या हल्ल्यात 14 इस्रायली सैनिक जखमी झाले आहेत. मंगळवारी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचे तीन सदस्य ठार झाले. यामध्ये हिजबुल्लाच्या फिल्ड कमांडरचा समावेश होता, असे लेबनॉनच्या सुरक्षा सूत्रांनी सांगितले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हिजबुल्लाने प्रतिहल्ला केला.
इस्रायली वायनेट वृत्त संकेतस्थळाने सांगितले की हे सैनिक गावातील कम्युनिटी सेंटरमध्ये होते.
गेल्या ऑक्टोबरमध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केल्यापासून हिजबुल्ला आणि इस्रायलमध्येही गेल्या सहा महिन्यांपासून गोळीबार सुरू आहे. 2006 नंतर या दोघांमध्ये टोकाचे शत्रुत्व वाढले असून ही सर्वात गंभीर गोष्ट आहे. रॉयटर्सच्या आकडेवारीनुसार, या लढाईत 240हून अधिक हिजबुल्ला लढवय्ये आणि 68 नागरिक मारले गेले आहेत. सैनिक आणि नागरिकांसह अठरा इस्रायली मारले गेले आहेत.
शनिवारी रात्री इराणने इस्रायलवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यानंतर हा संघर्ष आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. शनिवारी रात्री शेकडो स्फोटक ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. या हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर देण्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे.
मात्र, जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, कोणत्याही हल्ल्याला 74 टक्के इस्रायली जनतेचा विरोध आहे कारण त्यामुळे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जॉर्डन तसेच सौदी अरेबियासह अरब देशांमधील सुरक्षाविषयक असणारी युती तुटण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने याआधीच स्पष्ट केले आहे की इराणवर इस्रायलने केलेल्या कोणत्याही प्रतिहल्लाचे ते समर्थन करणार नाहीत. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी केलेल्या दूरध्वनी संभाषणात सांगितले की शनिवारी रात्री इस्रायलचा एकप्रकारे विजय झाला असेच मानले पाहिजे कारण, इराणचे हल्ले मोठ्या प्रमाणात अयशस्वी करून इस्रायलने आपली उत्कृष्ट लष्करी क्षमता दर्शविली आहे. इराणकडून झालेल्या हल्ल्यांपैकी 99 टक्के हल्ले इस्रायल आणि अमेरिकेने हाणून पाडले. त्यामुळे त्यांचे किमान नुकसान झाले.
दमास्कसमधील आपल्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याला इस्रायल जबाबदार असल्याचे इराणने सांगितले होते. इस्रायलने मात्र याला कोणताही अधिकृत प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे इराणने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर हल्ला केला. पेंटागॉनने मात्र याला इस्रायल जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पेंटागॉनच्या प्रवक्त्या सबरीना सिंग यांनी दावा केला की 1 एप्रिल रोजी इस्रायली हल्ल्यानंतर अमेरिकेने काढलेल्या निष्कर्षांमुळे इस्रायल खरोखरच त्या हल्ल्यासाठी जबाबदार होते यावर आम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे.
अश्विन अहमद
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)