हाँगकाँगमध्ये भयानक अग्नितांडव; 44 जणांचा मृत्यू, 300 हून अधिकजण बेपत्ता

0
हाँगकाँग

हाँगकाँगमधील एका नागरी संकुलात लागलेली भयानक आग अजूनही धुमसत असून, या घटनेत किमान 44 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 300 लोक बेपत्ता आहेत. देखभाल दुरुस्तीच्या कामादरम्यान वापरलेल्या असुरक्षित बांबूच्या स्कॅफोल्डिंग (बांबूची परात) आणि फोम सामग्रीमुळे ही आग पसरली असावी, असा अंदाज स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी दुपारपासून लागलेल्या या आगीमुळे, प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली उष्णता आणि दाट धुरामुळे, वांग फुक कोर्ट गृहनिर्माण संकुलाच्या वरच्या मजल्यांवर अडकलेल्या रहिवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान रात्रभर शर्थीचे प्रयत्न करत होते.

उत्तर ताई पो जिल्ह्यातील, या दाट लोकवस्ती असलेल्या संकुलात आठ ब्लॉक्समध्ये मिळून एकूण 2,000 अपार्टमेंट्स आहेत, जिथे 4,600 हून अधिक लोक राहतात, जे परवडणाऱ्या घरांच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहेत.

गंभीर निष्काळजीपणा

गुरुवारी सकाळपर्यंत, अधिकाऱ्यांनी चार ब्लॉक्समधील आग नियंत्रणात आणली असल्याचे सांगितले, तर इतर तीन ब्लॉक्समध्ये कार्यवाही सुरू होती.

घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये, दोन 32 मजली टॉवरमधून, ज्यांच्याभेवती बांबूच्या पराती आणि बांधकामाच्या ठिकाणी वापरले जाणारे हिरव्या रंगाचे जाळे आहे, तिथून आगीच्या ज्वाळा धगधगताना आणि आकाशात धुराचे मोठे लोट उठताना दिसत होते.

पोलिसांनी सांगितले की, इमारतींना आग प्रतिबंधक मानकांवर खरे न उतरणाऱ्या संरक्षक जाळीच्या चादरी आणि प्लास्टिकने वेढले असतानाच, त्यांना एका बाधित न झालेल्या इमारतीच्या काही खिडक्यांवर एका बांधकाम कंपनीने देखभाल दुरुस्तीच्या कामादरम्यान लावलेली फोम सामग्री आढळली.

हाँगकाँग पोलीस अधीक्षक एलिन चुंग यांनी सांगितले की, “या कंपनीचे जबाबदार अधिकारी अत्यंत निष्काळजीहोते, ज्यामुळे हा अपघात झाला आणि आग नियंत्रणाबाहेर पसरली, परिणामी मोठी जीवितहानी झाली, अशी आमची खात्री आहे”

त्यांनी पुढे सांगितले की, “याप्रकरणी बांधकाम कंपनीच्या तीन जणांना, ज्यात दोन संचालक आणि एका इंजिनिअरिंग सल्लागाराचा समावेश आहे, त्यांना सदोष मनुष्यवधाच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.”

या इमारतींवर वापरण्यात आलेले हिरवे बांधकामाचे जाळे आणि बांबूच्या पराती हे पारंपारिक चिनी स्थापत्यकलेचा आधारस्तंभ आहेत, परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव मार्चपासून हाँगकाँगमध्ये ते टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गुरुवारी पहाटे झालेल्या पत्रकार परिषदेत, हाँगकाँग पोलिसांनी सांगितले की, “44 मृतांमध्ये एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश आहे, तर अन्य 45 लोक गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहेत.”

“सर्वात पहिले प्राधान्य आग विझवणे आणि अडकलेल्या रहिवाशांना वाचवणे हे आहे,” असे हाँगकाँगचे प्रमुख जॉन ली यांनी यापूर्वी पत्रकारांना सांगितले. “दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे, जखमींना मदत करणे आणि तिसरे म्हणजे मृतदेह बाहेर काढणे. त्यानंतर, आम्ही लगेचच सखोल चौकशीला सुरुवात करू,” असेही त्यांनी सांगितले.

“सुमारे 279 लोकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि 900 लोकांना एकूण आठ सुरक्षित ठिकाणांवर नेण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.”

1948 मध्ये, एका गोदामात लागलेल्या आगीत 176 लोक मारले गेले, त्यानंतर हाँगकाँगमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी जीवितहानी झालेली आग दुर्घटना ठरली आहे.

नातेवाईकांचा शोध सुरू

या आगीची तुलना, 2017 मध्ये लंडनमध्ये झालेल्या ग्रेनफेल टॉवर येथील अग्नीतांडवाशी केली जात आहे, ज्यात 72 लोक मारले गेले होते. त्या दुर्घटनेसाठी, इमारतीच्या बाह्य भागाला ज्वलनशील आवरण लावणाऱ्या कंपन्यांना तसेच सरकार आणि बांधकाम उद्योगातील त्रुटींना जबाबदार धरले गेले होते.

ग्रेनफेल युनायटेड दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांन्या समूहाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “हाँगकाँगमध्ये लागलेल्या या भयानक आगीमुळे प्रभावित झालेल्या सर्व लोकांप्रती आम्ही आमच्या संवेदना व्यक्त करतो. कुटुंब, मित्रपरिवार आणि समुदायासोबत आम्ही उभे आहोत. तुम्ही एकटे नाही.”

एनजी आडनावाच्या एका 52 वर्षीय महिलेची, आपल्या मुलीचा शोध घेताना खूपच वाईट अवस्था झाली होती.

“माझी मुलगी आणि तिचे वडील अजूनही बाहेर आलेले नाहीत. आमची इमारतीला वाचवण्यासाठी त्यांच्याकडे पाणीही नव्हते,” असे म्हणत मुलीचा पदवीदान समारंभाचा फोटो हातात घेऊन त्या रडू लागल्या.

हॅरी चेउंग (66), जे संकुलातील ब्लॉक 2 मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ राहिले आहेत, त्यांनी सांगितले की, “दुपारी 2:45 वाजता (0645 GMT), त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला आणि जवळच्या ब्लॉकमध्ये आग लागल्याचे दिसले. त्यानंतर मी लगेच घाईघाईत माझ्या सर्व वस्तू पॅक केल्या.”

“मला आता नेमके काय वाटत आहे, हे मला सांगता येणार नाही. मी आज रात्री कुठे झोपणार फक्त याचा विचार करत आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आगीविरुद्ध ‘लढा’ सुरू

अनेक रहिवाशांनी सोशल मीडियावर या आगीचे कारण, निष्काळजीपणा आणि खर्च कपात असल्याचे म्हणत टीका केली आहे. एका व्हिडिओमध्ये, काही बांधकाम कामगार दुरुस्तीच्या कामादरम्यान कॉम्प्लेक्सच्या एका ब्लॉकभोवती असलेल्या बांबूच्या परातीवर धूम्रपान करताना दिसले.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आग विझवण्यासाठी तसेच जीवित आणि वित्तहानी कमी करण्यासाठी “सर्वतोपरी प्रयत्न” करण्याचे आवाहन केले आहे, असे चीनचे सरकारी माध्यम CCTV ने सांगितले.

हाँगकाँगच्या परिवहन विभागाने सांगितले की, गुरुवारी सकाळी या परिसरातील अनेक रस्ते बंद राहतील, तसेच एकूण 39 बस मार्ग वळवले गेले आहेत.

या आगीमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे, सहा शाळा गुरुवारी बंद राहतील, असे शहराच्या शिक्षण विभागाने सांगितले.

बुधवारी, अग्निशमन दलाचे जवान आगीशी लढत असताना, बांबूच्या परातींचे सांगाडे खाली कोसळताना दिसले, तर इमारतीच्या खाली शेकडो अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका उभ्या होत्या.

सामाजिक असंतोष

हाँगकाँग सरकारने, मार्च महिन्यात बांबूच्या पराती टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यास सुरुवात केली, कारण 2019 ते 2024 दरम्यान, बांबूचे मचाण वापरणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला, आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकामांपैकी 50% कामांमध्ये मेटल फ्रेम्सचा वापर अनिवार्य करण्याची घोषणा करण्यात आली.

जरी आग लागण्याचा धोका हा या धोरणामागील प्राथमिक कारण नव्हता,, तरी हाँगकाँगमधील ‘इंडस्ट्रियल अॅक्सिडेंट व्हिक्टिम्स असोसिएशननुसार’ या वर्षी बांबू स्कॅफोल्डिंगशी संबंधित किमान तीन आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

हाँगकाँगमध्ये गगनाला भिडलेले मालमत्ता दर, हे शहरात दीर्घकाळापासून सामाजिक असंतोषाचे कारण राहिले आहे आणि डिसेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या शहरव्यापी विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी ही दुर्घटना अधिकाऱ्यांविरुद्धचा असंतोष आणखी वाढवण्याची शक्यता आहे.

जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांपैकी एक असलेल्या हाँगकाँगमध्ये, वांग फुक कोर्ट हे अनेक उंच गृहनिर्माण संकुलांपैकी एक आहे. मुख्य भूभागाच्या सीमेजवळ असलेल्या ताई पो या उपनगरीय जिल्ह्यात, सुमारे 3 लाख रहिवासी आहेत.

मालमत्ता एजन्सीजच्या वेबसाइट्सनुसार, 1983 पासून लोकवस्ती असलेले हे संकुल सरकारच्या अनुदानित गृहनिर्माण योजनेअंतर्गत येते. ऑनलाइन पोस्ट्सनुसार, या संकुलात गेल्या वर्षभरात HK$330 दशलक्ष ($42.43 दशलक्ष डॉलर्स) खर्च करुन नव्याने दुरुस्ती केली जात आहे, ज्यासाठी प्रत्येक युनिटने HK$1,60,000 ते HK$1,80,000 इतका खर्च उचलला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत–व्हेनेझुएला चर्चेत, डिजिटल तंत्रज्ञान आणि महत्वपूर्ण खनिजांवर भर
Next articleव्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात, नॅशनल गार्डचे दोन सैनिक जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here