तालिबानने अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यापासूनच त्यांना तीव्र टीकेला तोंड द्यावे लागत आहे. कमकुवत पायाभूत सुविधा, ढासळती अर्थव्यवस्था आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे आरोप-विशेषतः महिलांविरुद्ध-यामुळे या देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या देशातील पर्यटनाला चालना मिळाली आहे. 2021 मध्ये इस्लामिक कट्टरपंथी गटाने सत्ता स्थापन केल्यापासून 691 परदेशी पर्यटकांनी तिथे भेट दिली, असे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. 2022 मध्ये ही संख्या 2 हजार 300वर पोहोचली आणि गेल्या वर्षी ती 7 हजार होती.
याची अनेक कारणे आहेत. एपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार देशातील हिंसाचारात झालेली घट, दुबईचे अफगाणिस्तानशी असलेले चांगले संबंध आणि पुरुष विद्यार्थ्यांचा उत्साही गट पर्यटकांची संख्या वाढल्याचे दाखवण्यासाठी उत्सुक आहेत. पर्यटकांना इतर पर्याय उपलब्ध नसले तरी फार फरक पडत नाही, ही वस्तुस्थिती तिथे बघायला मिळते. काबूलमधील पर्यटन संचालनालयाचे प्रमुख मोहम्मद सईद यांच्या मते, त्यांची सर्वात मोठी परदेशी पर्यटकांची बाजारपेठ चीन आहे.
सईद यांच्या या वक्तव्यातील खरेपणा चीनमध्येही बघायला मिळतो. चिनी नागरिकांना अफगाणिस्तानमध्ये आकर्षित करण्यासाठी काम करणारे पर्यटन डिजिटल पोर्टल असलेल्या चिनी पर्यटन संस्थेने 2019मध्ये एक अभ्यास केला होता. त्यानुसार, चिनी पर्यटकांसाठी अफगाणिस्तान ही दुसरी सर्वात मोठी वाढणारी पर्यटन बाजारपेठ आहे. त्यांची पहिली पसंती मॉन्टेनेग्रोला आहे. काबूलहून वायव्य चीनच्या शिनजियांग प्रदेशाची राजधानी उरुमकीपर्यंत दररोज थेट विमान सेवा उपलब्ध आहे. यामुळे चिनी उद्योजकांसह चिनी पर्यटक मोठ्या संख्येने तिथे जात आहे.
याशिवाय अफगाणिस्तानला त्याच्या काही शेजारी देशांपेक्षाही अधिक फायदे मिळत आहेत. “त्यांनी मला सांगितले आहे की, त्यांना पाकिस्तानात जायचे नाही कारण ते धोकादायक आहे आणि त्यांच्यावर हल्ले होतात. जपानी लोकांनीही मला हे सांगितले आहे.ही आमच्यासाठी चांगली बाब आहे,” असे सईद म्हणाले.
अफगाणिस्तानमधील समस्या अजूनही संपलेल्या नाहीत. तालिबानला योग्य शासक म्हणून मान्यता देण्याला अनेक देशांनी नकार देत काबूलवर बहिष्कार टाकला आहे. परदेशात मोजक्याच ठिकाणी सध्या अफगाण दूतावासांचे काम सुरू आहेत. त्यामुळे व्हिसाची प्रक्रिया अवघड आणि काहीशी महागडी बनली आहे. मात्र देशातील उत्साही विद्यार्थी आणि परदेशी महिला पर्यटकांच्या बाबतीत तालिबानने आपले कठोर नियम काहीसे शिथिल केल्यामुळे मदत झाली आहे. एपीच्या वृत्तानुसार देशातील पहिले पंचतारांकित हॉटेल सेरेना यांनी आता परदेशी महिला पर्यटक लक्षात घेऊन केवळ महिलांसाठीचे स्पा सुरू केले आहे.
अश्विन अहमद
(वृत्तसंस्थेच्या इनपुट्सह)