संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हायपरसॉनिक तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती केली आहे. भारतात प्रथमच, डीआरडीओच्या हैदराबाद स्थित संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने (डीआरडीएल), active-cooled scramjet combustor ची 120 सेकंदांची जमिनीवरील चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. पुढील पिढीतील हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्याच्या देशाच्या प्रयत्नांमधील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.भारताच्या स्वदेशी हायपरसॉनिक क्षमतांच्या प्रगतीसाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मॅक 5 पेक्षा (5 हजार 400 किमी/तासापेक्षा जास्त) जास्त वेगाने प्रवास करणारी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, पारंपरिक हवाई संरक्षण प्रणाली टाळण्यास आणि वेगवान, अचूक हल्ले करण्यास सक्षम असलेल्या शस्त्रास्त्रांच्या अत्याधुनिक वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. अमेरिका, रशिया, चीन आणि भारत यासारखी राष्ट्रे या परिवर्तनशील तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्याच्या अत्यंत तीव्र शर्यतीत गुंतली आहेत.
स्क्रॅमजेट तंत्रज्ञानाचे महत्त्व
हायपरसॉनिक वाहनांचे हृदय स्क्रॅमजेट इंजिनमध्ये आहे-हलणाऱ्या भागांवर अवलंबून न राहता सुपरसॉनिक वेगाने ज्वलन टिकवून ठेवण्यास सक्षम असलेली ही एक क्रांतिकारक air-breathing propulsion system आहे. डीआरडीओच्या अलीकडील स्क्रॅमजेट ग्राउंड चाचणीने हायपरसॉनिक उड्डाणाची नक्कल करणाऱ्या परिस्थितीत यशस्वी प्रज्वलन आणि स्थिर ज्वलन यासह अनेक कामगिऱ्या दाखवून दिल्या आहेत.
स्क्रॅमजेट इंजिन प्रज्वलित करणे ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्याची तुलना अनेकदा “चक्रीवादळात मेणबत्ती पेटवून ठेवणे” अशी केली जाते. डीआरडीएलच्या स्क्रॅमजेट ज्वलन यंत्रात एक नाविन्यपूर्ण ज्वाला स्थिरीकरण तंत्र आहे जे 1.5 किमी/सेकंदापेक्षा जास्त हवेचा प्रवाह असूनही ज्वलन यंत्रामध्ये सातत्याने ज्योत प्रज्वलित ठेवते. मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ही प्रगती व्यापक संशोधन आणि चाचणीचा परिणाम आहे, जी कामगिरीचा अंदाज लावण्यासाठी आणि कामगिरी फत्ते करण्यासाठी advanced computational fluid dynamics (CFD) अनुकरणांद्वारे समर्थित आहे.
स्वदेशी नवकल्पना आणि प्रमुख प्रगती
डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, स्वदेशी एंडोथर्मिक स्क्रॅमजेट इंधनाच्या विकासामुळे जमिनीवरील चाचणीच्या यशाला बळ मिळाले. डीआरडीएल आणि खाजगी उद्योग भागीदारांनी संयुक्तपणे विकसित केलेले हे इंधन कार्यक्षम शीतकरण सुलभ करते आणि इग्निशन सुलभ करते जो हायपरसॉनिक उड्डाणातील एक महत्त्वाचा घटक आहे. मोठ्या प्रमाणात इंधन उत्पादनासाठी डीआरडीएलला अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी एक विशेष उत्पादन प्रक्रिया तयार करण्यात आली आहे.
या यशाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे हायपरसॉनिक उड्डाणादरम्यान येणाऱ्या तीव्र तापमानाचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या प्रगत थर्मल बॅरियर कोटिंगचा (टीबीसी) विकास. डीआरडीएल आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) प्रयोगशाळेने संयुक्तपणे विकसित केलेले हे अत्याधुनिक आवरण, उच्च औष्णिक प्रतिरोध प्रदान करते आणि पोलादाच्या वितळण्याच्या बिंदूच्या पलीकडे काम करू शकते. अत्याधुनिक निक्षेपण तंत्राचा वापर करून स्क्रॅमजेट इंजिनच्या आत लेप लावला जातो, ज्यामुळे त्याचा टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वाढते.
हायपरसॉनिक वर्चस्वाच्या दिशेने एक पाऊल
स्क्रॅमजेट ज्वलन, प्रगत औष्णिक व्यवस्थापन आणि स्वदेशी इंधन विकासातील प्रात्यक्षिक क्षमता यामुळे जागतिक हायपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या शर्यतीत भारताचे स्थान मजबूत झाले आहे. हे यश डीआरडीओचे कौशल्य अधोरेखित करते आणि ऑपरेशनल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यासाठी, भारताची संरक्षण सज्जता आणि तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी मंच तयार करते.
स्क्रॅमजेट इंजिन ग्राउंड चाचणीच्या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. ही कामगिरी भारताच्या पुढच्या पिढीतील हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे ते म्हणाले.
डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनीही स्थिर ज्वलन, वर्धित कामगिरी आणि प्रगत औष्णिक व्यवस्थापन क्षमता साध्य करण्यासाठी डीआरडीएलच्या चमूचे आणि उद्योगातील भागीदारांच्या योगदानाचे कौतुक केले.
टीम भारतशक्ती