डोनाल्ड ट्रम्प यांनाच मतदान करणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या माजी उमेदवार निक्की हॅले यांनी बुधवारी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याऐवजी अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांना आपली पसंती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हडसन इन्स्टिट्यूटमधील आपल्या भाषणात हॅले यांनी सांगितले की, आपण अशा अध्यक्षांना प्राधान्य देत आहोत, जे शत्रूंना जबाबदार धरणे, सीमा सुरक्षित करणे आणि “भांडवलशाही तसेच स्वातंत्र्य” ला पाठबळ देईल. तिने नमूद केले की “ट्रम्प यांची ही धोरणे परिपूर्ण नसली तरी”, “बायडेन अध्यक्षपदाच्या कार्यकाळावर देशासाठी मोठी ‘आपत्ती’ ठरले असल्याची टीका हॅले यांनी केली.
एक मतदार म्हणून माझे प्राधान्य अशा राष्ट्रपतींना आहे, जे आपल्या मित्रपक्षांच्या पाठीशी उभे असतील, आपल्या शत्रूंना जबाबदार धरतील, जे सीमा सुरक्षित ठेवतील, त्यासाठी कोणतीही कारणे देणार नाहीत. हॅले म्हणाल्या, “भांडवलशाही आणि स्वातंत्र्याला पाठिंबा देणारे अध्यक्ष, आपल्याला जास्त नव्हे तर कमी कर्जाची गरज आहे हे समजून घेणारे अध्यक्ष” यांना माझे मत देईन असे त्या म्हणाल्या.
“खरेतर ट्रम्प या धोरणांच्या बाबतीत परिपूर्ण नाहीत. हे मी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. पण बायडेन यांची कारकीर्द देशासाठी एक आपत्ती बनली आहे. त्यामुळे मी ट्रम्प यांनाच मतदान करणार आहे, असे निक्की हॅले यांनी स्पष्ट केले.
मार्च महिन्यात हॅले रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार स्पर्धेतून बाहेर पडल्या. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, “आता माझी मोहीम स्थगित करण्याची वेळ आली आहे. अमेरिकन लोकांनी त्यांचा अंतर्मनाचा आवाज ऐकावा अशी माझी इच्छा आहे, असे मी म्हटले. मी पण तेच केले आहे. मला कोणताही पश्चाताप नाही.”
त्या म्हणाल्या की, “असे म्हटल्यानंतरही माझे नाव मागे घेताना केलेल्या भाषणात जे सांगितले त्यावर मी ठाम आहे. ज्यांनी मला मतदान केले त्या लाखो मतदारांपर्यंत पोहोचणे आणि आता हे मतदार फक्त त्याच्यासोबत असतील असे गृहीत न धरणे, हे ट्रम्प यांच्यासाठी शहाणपणाचे ठरेल,” त्या पुढे म्हणाल्या,” आणि मला खरोखर आशा आहे की ते तसे करतील.”
हॅले यांनी ही टिप्पणी अशा वेळी केली आहे जेव्हा त्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या असल्या तरी रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या प्राथमिक निकालांमध्ये त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. कारण पक्षातील काहीजण विरोधी मतदान करून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी त्यांना वाटणारी निराशा व्यक्त करत आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “हॅले यांना फारच कमी मतदार मिळाले”. ते पुढे म्हणाले, “आणि आता ते सर्व मतदार माझ्याकडे येत आहेत.”
दरम्यान, बायडेन यांच्या प्रचार मोहिमेने हॅले यांच्या समर्थकांसाठीही एक पाऊल उचलले आहे. यापूर्वी, मार्चमध्ये, बायडेन यांनी सांगितले होते की ट्रम्प यांना हॅले यांच्या समर्थकांचा पाठिंबा नको आहे.
त्यामुळे मार्चमध्ये बायडेन म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले आहे की त्यांना निक्की हॅलेचे समर्थक नको आहेत”. त्यामुळे मला हे स्पष्ट करायचे आहे की माझ्या प्रचार मोहिमेत त्यांच्यासाठी कायम जागा आहे.”
आराधना जोशी
(रॉयटर्स)