“जणू माझा मृत्यूच झाला असावा, मी इथे असायला नको,” असे मिलवॉकी येथील रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनलासाठी खासगी विमानातून प्रवास करताना रविवारी न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने शनिवारी सांगितले की, बटलर, पेनसिल्व्हेनिया येथील एका सभेत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ट्रम्प यांच्या कानाला गोळी लागल्यानंतर त्यांना त्वरित स्टेजवरून बाहेर काढण्यात आले. जमावातील एका व्यक्तीचा या गोळीबारात मृत्यू झाला आणि दोनजण गंभीर जखमी झाले. सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी गोळीबार करणाऱ्याला ठार मारले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उजव्या कानाला गोळी चाटून गेल्याने मुलाखतीत, त्या कानाला पट्टी लावण्यात आली होती. ट्रम्प यांनी पोस्टशी बोलताना गोळीबाराचा अनुभव “अतिशय अवास्तव अनुभव” असल्याचे म्हटले आहे.
“रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की त्यांनी असे काहीही कधीही पाहिले नाही, त्यांनी याला चमत्कार म्हटले”, असे ट्रम्प यांनी पोस्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
बेथेल पार्क, पा येथील 20 वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रूक्स म्हणून अधिकाऱ्यांनी ओळख पटवलेल्या हल्लेखोराचा संदर्भ देत ट्रम्प यांनी सिक्रेट सर्व्हिसची प्रशंसा केली आणि सांगितले की “त्यांनी त्याला डोळ्यांच्या मधोमध एक गोळी मारून यमसदनी पाठवले.”
ते पुढे म्हणाले की, सिक्रेट सर्व्हिसने खूप चांगले काम केले आहे. “हे आपल्या सर्वांसाठी अविश्वसनीय आहे”.
गोळीबारानंतर अत्यंत वेगाने घडामोडी सुरू असताना, ट्रम्प यांच्या गालावरून रक्त वाहत असताना त्यांनी हवेत आपली मूठ उचलली असल्याचे फोटो वेगाने पसरू लागले. ट्रम्प यांनी पोस्टला सांगितले की, बरेच लोक म्हणतात की त्यांनी पाहिलेला हा सर्वात आयकॉनिक फोटो आहे. “ते बरोबर आहेत आणि मी मेलेलो नाही. एक आयकॉनिक फोटो मिळवण्यासाठी सहसा तुम्हाला मरण पत्करावे लागते.”
ते पुढे म्हणाले, “नशिबाने किंवा देवाच्या कृपेने, बऱ्याच लोकांच्या मते हे देवाच्या कृपेने घडले आहे, मी अजूनही इथे आहे.”
ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात याआधी झालेल्या डिबेटनंतर अनेकांनी जो बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले जेणेकरून नवीन डेमोक्रॅटिक उमेदवार निवडला जाऊ शकेल. जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर रविवारी देशाला संबोधित करत ऐक्याचे आवाहन केले.
“अमेरिकेत असे काही होऊ शकत नाही, आम्ही अमेरिकेत या मार्गावर जाऊ नये. या देशातील राजकीय वक्तृत्व खूप तापले आहे,” असे बायडेन देशाला संबोधित करताना म्हणाले.
“आता हे वातावरण शांत करण्याची वेळ आली आहे,” बायडेन पुढे म्हणाले, “राजकारण हे कधीही शब्दशः युद्धक्षेत्र असू नये किंवा देव न करो, हे कोणाच्या हत्येचे क्षेत्रही असू नये,” असे बायडेन यांनी आपल्या भाषणात सांगितले.
दरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्यांनी शनिवारी घटनास्थळावरून जप्त केलेली ‘एआर 15- स्टाइल’ ही अर्ध-स्वयंचलित रायफल आहे. एआर स्टाइल रायफल ही अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध अशा शस्त्रांपैकी एक आहे. ही पूर्णपणे स्वयंचलित लष्करी लढाऊ एम-16 रायफलसारखी आहे. आर्मलाइट कंपनीने ही रायफल विकसित केली आहे.
एआर-15 शैलीच्या रायफल्स अनेकदा अमेरिकन बाजारपेठेत खरेदी करणे सोपे असल्याचे म्हटले जाते. यासह, रायफलमध्ये वापरली जाणारी इतर उपकरणे हाताळायला अत्यंत सोपी आहेत. यामुळे अप्रशिक्षित नेमबाज प्राणघातक हल्लेखोर बनू शकतात.
आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्ससह)