श्रीलंकेच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) शनिवारी 2.9 अब्ज डॉलर्सच्या मदतीच्या तिसऱ्या हप्त्याला मंजुरी दिली, अर्थव्यवस्था अजूनही फारशी चांगली झाली नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
एका निवेदनातून, आयएमएफने जाहीर केले की ते संकटग्रस्त दक्षिण आशियाई राष्ट्राला म्हणजेच श्रीलंकेला सुमारे 33.3 कोटी अमेरिकन डॉलर्स एवढा निधी जारी करणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत मदतीसाठी देण्यात आलेल्या एकूण निधीची रक्कम सुमारे 1.3 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी होईल. श्रीलंकेची अर्थव्यवस्था रुळावर आलेली नसली तरी आर्थिक पुनर्प्राप्तीची चिन्हे दिसू लागली आहेत, असेही त्या निवेदनात म्हटले आहे.
सावधगिरीची सूचना देताना आयएमएफने म्हटले आहे की, “व्यावसायिक कर्जाची पुनर्रचना पूर्ण करणे, अधिकृत कर्जदार समितीशी केलेल्या कराराच्या धर्तीवर अधिकृत कर्जदारांशी करण्यात येणाऱ्या द्विपक्षीय करारांना अंतिम रूप देणे आणि इतर करारांच्या अटींची अंमलबजावणी करणे ही यानंतरची महत्त्वाची पावले आहेत. यामुळे श्रीलंकेला कर्जाची स्थिरता पूर्ववत करण्यास मदत होईल.”
आर्थिक संकट
रोख रकमेची टंचाई असलेल्या श्रीलंकेसमोर 2022 मध्ये गेल्या सात दशकांहून अधिक काळातील सर्वात वाईट आर्थिक संकट निर्माण झाले. डॉलरच्या तीव्र टंचाईमुळे चलनवाढ 70 टक्क्यांपर्यंत वाढली, त्याचे चलन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले आणि अर्थव्यवस्था सर्वात वाईट घसरणीच्या काळात 7.3 टक्क्यांनी आणि गेल्या वर्षी 2.3 टक्क्यांनी संकुचित झाली.
आयएमएफच्या म्हणण्यानुसार, “श्रीलंकेची आर्थिक घडी पुन्हा बसावी यासाठी स्थूल आर्थिक स्थिरता राखणे आणि कर्जाची स्थिरता पुनर्संचयित करणे ही गुरुकिल्ली आहे. याखेरीज जबाबदार वित्तीय धोरणात सातत्य राखणेही आवश्यक आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये मिळालेल्या आयएमएफच्या मदतीमुळे आर्थिक परिस्थिती स्थिर होण्यास मदत झाली. अलीकडच्या काही महिन्यांत रुपया 11.3 टक्क्यांनी वाढला आहे तर गेल्या महिन्यात किमती 0.8 टक्क्यांनी घसरल्याने चलनवाढ नाहीशी झाली आहे.
जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, श्रीलंकेची अर्थव्यवस्था या वर्षी 4.4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, जी गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच वाढ दर्शवणारी आहे.
कर्जाची पुनर्रचना
श्रीलंकेला अजूनही रोखेधारकांसह 12.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या कर्जाची पुनर्रचना पूर्ण करणे आवश्यक आहे, डिसेंबरमध्ये त्याला अंतिम रूप देण्याचे उद्दिष्ट अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी ठेवले आहे.
10 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची पुनर्रचना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जपान, चीन आणि भारतासह द्विपक्षीय कर्जदारांशी श्रीलंका वैयक्तिक करार करेल, असे दिसानायके यांनी सांगितले.
दिसानायके सप्टेंबरमध्ये राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणूकीत जिंकून आल्यानंतर त्यांच्या डाव्या आघाडीने गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 225 सदस्यांच्या संसदेत विक्रमी 159 जागा जिंकण्याची किमया केली आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)