भारत आणि ओमान नौदल अधिकाऱ्यांदरम्यान 6व्या चर्चासत्राचे आयोजन

0
भारत
भारत - ओमान सहावी नौदल अधिकारी चर्चा

भारत आणि ओमानमधील सागरी क्षेत्रातील विद्यमान संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, भारतीय नौदल (आयएन) आणि ओमानच्या रॉयल नौदल (आरएनओ) अधिकाऱ्यांदरम्यान 6व्या चर्चासत्राचे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले होते. 4 आणि 5 जून 2024 या कालावधीत हे चर्चासत्र पार पडले.

आरएनओ शिष्टमंडळाचे नेतृत्व कार्यान्वयन आणि नियोजन महासंचालक, कोमोडोर जसीम मोहम्मद अली अल बालुशी यांनी केले. तर कमोडोर मनमीत सिंग खुराना, कमोडोर (एफसी) यांनी भारतीय नौदलाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. उभय नौदल अधिकाऱ्यांदरम्यान चर्चेची ही मालिका म्हणजे दोन ऐतिहासिक सागरी शेजारी देशांमधील मजबूत द्विपक्षीय संबंधांचे द्योतक आहे असल्याचे भारतीय नौदलाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नौदल अधिकाऱ्यांच्या या चर्चासत्रादरम्यान, सागरी परस्पर कार्यक्षमता वाढवण्याची आवश्यकता असलेल्या सामायिक सागरी सुरक्षा आव्हानांवर उभय बाजूंनी चर्चा झाली तसेच परिचालन सहयोग, माहितीची देवाणघेवाण, सागरी क्षेत्रातील जागरूकता, प्रशिक्षण, हवामानशास्त्र, जल आलेखनशास्त्र (हायड्रोग्राफी) आणि तांत्रिक सहाय्य या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

शिष्टमंडळाने माहिती एकत्रीकरण केंद्र-हिंद महासागर क्षेत्र (आयएफसी-आयओआर), गुरुग्रामला देखील भेट दिली आणि भारतीय नौदल उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती यांची भेट घेतली.

ओमान हा आखाती प्रदेशातील भारताचा सर्वात निकटचा भागीदार आहे आणि नौदल सहकार्य मजबूत करण्यात आणि दोन्ही नौदलांमधील विद्यमान भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी अशा चर्चेचे नियमित आयोजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

याआधी भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि रॉयल ओमान पोलीस तटरक्षक दल (आरओपीसीजी) यांच्यात 23 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे पाचवी वार्षिक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. हिंद महासागर प्रदेशातील सागरी सुरक्षा आणि सुरक्षा चौकट मजबूत करणे तसेच आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर कारवायांचा सामना करणे यासाठी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली.

टीम भारतशक्ती


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here