भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या लंडन भेटीदरम्यान 9 जानेवारी रोजी भारत आणि ब्रिटनने दोन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यातील पहिला आहे द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय कॅडेट एक्सचेंज प्रोग्रॅमची स्थापना करणारा सामंजस्य करार (एमओयू). तर दुसऱ्या करारांतर्गत – लेटर ऑफ अरेंजमेंट (LoA)- संशोधन आणि विकासामधील संरक्षण सहकार्य यासंबंधीचा करार आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि ब्रिटनचे संरक्षणमंत्री ग्रँट शॅप्स यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या करारांबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
उभय देशांमधील संरक्षण-औद्योगिक सहकार्य वाढविण्यावर लक्ष केंद्रित करून संरक्षणव्यवस्था, सुरक्षा आणि सहकार्याच्या मुद्द्यांवर दोनही संरक्षणमंत्र्यांची चर्चा झाल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ब्रिटनआणि भारत यांच्यातील संबंध केवळ व्यवहारापुरतेच मर्यादित नसून दोन्ही देशांनी एकमेकांकडे अनेक समान गोष्टी आणि सामायिक उद्दिष्टे असलेले नैसर्गिक भागीदार म्हणून पाहावे, अशी अपेक्षा ग्रँट शॅप्स यांनी व्यक्त केली आहे.
“ब्रिटनचे संरक्षणमंत्री ग्रँट शॅप्स यांच्याशी झालेली बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. या बैठकीत आम्ही भारत-ब्रिटन संरक्षण संबंधांचा आढावा घेतला. संरक्षण सहकार्य, सुरक्षा आणि संरक्षणविषयक औद्योगिक सहकार्य वाढविणे यासंबंधित विविध मुद्द्यांचा समावेश असलेली आमची चर्चा फलदायी ठरली,” असे ट्वीट संरक्षणमंत्र्यांनी केले आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, संशोधन आणि विकासाच्या दृष्टीने लेटर ऑफ अरेंजमेंटमुळे (LoA) उभय देशांमध्ये संरक्षण संशोधनामधील सहकार्याची व्याप्ती वाढणार आहे. याच्या माध्यमातून भारतातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि ब्रिटनच्या डिफेन्स सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी (DSTL) यांच्यात परस्पर सहकार्य केले जाणार आहे
राजनाथ सिंह यांचा दोन दिवसांचा ब्रिटन दौरा नुकताच पार पडला. गेल्या दोन दशकांहून अधिक काळानंतर भारतीय संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा होता. याआधी जॉर्ज फर्नांडिस यांनी 2002 मध्ये ब्रिटन दौरा केला होता. अनेक प्रयत्न करूनही, व्यस्तता आणि इतर लॉजिस्टिक समस्यांमुळे राजनाथ सिंह ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर याआधी जाऊ शकले नव्हते.
तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी सोमवारी रात्री लंडनमध्ये आगमन झालेल्या राजनाथ सिंह यांच्यासमवेत संरक्षण मंत्रालयाचे एक शिष्टमंडळ होते. यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष, सेवा मुख्यालय, संरक्षण विभाग आणि संरक्षण उत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता. शॅप्स यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर सिंह यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरून यांचीही भेट घेतली.
याशिवाय संरक्षणमंत्र्यांनी गोलमेज कार्यक्रमादरम्यान संरक्षण उद्योगातील उच्चपदस्थांशी संवाद साधला. त्यानंतर, त्यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींचीही भेट घेतली
(अनुवाद – आराधना जोशी)