भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सरावाला प्रारंभ, सामरिक संरक्षण संबंधांना गती

0

इंडो-पॅसिफिकमधील दोन प्रमुख भागीदार असलेल्या, भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधील वाढत्या धोरणात्मक सहकार्याला गती देणासाठी, ‘ऑस्ट्राहिंद-2025’ (AustraHind-2025) या संयुक्त लष्करी सरावाला सुरूवात झाली आहे. ही या सरावाची चवथी आवृत्ती असून, याच आठवड्यात पर्थ येथील इरविन बॅरॅक्समध्ये त्याला सुरूवात झाली.

13 ते 26 ऑक्टोबरदरम्यान आयोजित या द्विपक्षीय सरावाच्या निमित्ताने, दोन्ही देशांच्या लष्करी दलांना एकत्र येण्याची संधी मिळेल, ज्यामुळे एकत्रित कार्यक्षमता आणि कार्यक्षमतेतील सज्जता वाढवण्यास मदत होईल. यामध्ये शहरी आणि निम्न-शहरी भूभागांमध्ये संयुक्त ऑपरेशन्स राबवण्यावर विशेष भर दिला जात आहे. यावर्षीची आवृत्ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे, कारण ती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर होत आहे. या दौर्‍याच्यावेळी दोन्ही देशांनी संरक्षण भागीदारीची व्याख्या नव्याने परिभाषित करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली.

“भारत आणि ऑस्ट्रेलिया हे एका निर्णायक टप्प्यावर उभे आहेत. आपले संरक्षण संबंध केवळ भागीदार म्हणून नव्हे तर एक सुरक्षित आणि समृद्ध इंडो-पॅसिफिकचे सह-निर्माते म्हणून उदयाला येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत,” असे राजनाथ सिंह यांनी आपल्या भेटीदरम्यान म्हटले होते.

धोरणात्मक लक्ष्य आणि रणनीतिक उद्दिष्टे

‘ऑस्ट्राहिंद-2025’ हा सराव, वास्तव परिस्थितीतील मोहिमांचे अनुकरण करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे, ज्यामध्ये दहशतवादविरोधी मोहिमा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांचा समावेश आहे. या सरावाचा मुख्य उद्देश- संयुक्त मोहिमेचे नियोजन करणे, लढाऊ सराव सुधारणे आणि जटिल, गतिशील परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याती क्षमता विकसित करणे हा आहे.

दोन्ही देशातील लष्करी पथके, कंपनी स्तरावरील फील्ड ट्रेनिंग, धोरणात्मक हालचाली आणि परिस्थितीनुसार तयार केलेल्या सरावाच्या विविध टप्प्यात भाग घेतील. यामुळे दोन्ही दलांना बहुराष्ट्रीय वातावरणात सुरळीतपणे काम करण्याची दिशा मिळेल. नागरी भागातील कारवायांवर भर देणे, ही आधुनिक संघर्षांचे बदलते स्वरूप दर्शवते, जिथे लष्करी कारवाई अधिकाधिक दाट लोकसंख्या आणि असममित धोका असलेल्या परिसरात केली जाते.

सखोल संरक्षण सहकार्याचे प्रतीक

2022 मध्ये सुरू झालेला ‘ऑस्ट्राहिंद’  सराव, आज द्विपक्षीय संरक्षण कॅलेंडरवरील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. हा सराव आलटून-पालटून भारतात आणि ऑस्ट्रेलियात घेतला जातो. गेल्या काही वर्षांत त्याची व्याप्ती साततत्याने वाढत गेली आहे, जी दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास आणि प्रदेशातील स्थैर्यासाठी असलेला सामायिक दृष्टीकोन प्रतिबिंबित करते.

गेल्यावर्षीचा सराव भारतातील पुणे शहरात झाला होता, जिथे दोन्ही दलांनी तीव्र लढाऊ सरावात भाग घेतला होता तसेच त्यावेळी सांस्कृतिक देवाणघेवाणही करण्यात आली, ज्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याला भेटीचाही समावेश होता. यंदाच्या वर्षी पर्थमध्ये आयोजित केलेला हा सराव, दोन्ही देशांच्या वचनबद्धतेचे आणि सहकार्याला दर्शवतो.

एक व्यापक धोरणात्मक संदर्भ

‘ऑस्ट्राहिंद-2025’ हा सराव, संरक्षणमंत्री सिंह यांच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यानंतर लगेचच होत असल्यामुळे, तो उच्चस्तरीय राजनैतिक संवादाचे ठोस परिणाम दर्शवतो आणि व्यापक इंडो-पॅसिफिक धोरणात्मक एकजुटीला अधिक बळकट करतो.

प्रदेशातील तणाव आणि अनिश्चितता वाढत असताना, अशा संयुक्त सरावांमुळे समन्वित प्रतिसाद देण्याचे आणि दीर्घकालीन लष्करी सुसंवाद प्रस्थापित करण्याचे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते. दोन्ही देश, सागरी क्षेत्रातील आपली जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन क्षमता आणि प्रादेशिक शांतता मोहिमा वाढविण्यासाठी अशा सरावांचा लाभ घेण्यास उत्सुक असतात.

दरवर्षी होणाऱ्या प्रत्येक आवृत्तीसह, ‘ऑस्ट्राहिंद’ हा सराव भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्याचा अधिक मजबूत दुवा बनत चालला आहे. हा सराव केवळ धोरणात्मक हालचालींसाठी मर्यादित नाही, तर तो दोन्ही देशातील बंधुभाव, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करतो.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndia Reveals Inside Story of Operation Sindoor to UN Military Chiefs: Lt Gen Ghai Lifts the Veil on Precision Strikes
Next articleGet Ready for War, France Warns Europe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here