भारत आणि ऑस्ट्रेलियातील लष्करी तसेच तंत्रज्ञान संबंधांना बळकटी

0
भारत
17 मार्च रोजी, नवी दिल्ली येथे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण धोरण चर्चेचे 9 वे संस्करण आयोजित करण्यात आले.

भारत आणि ऑस्ट्रेलियाने, 17 मार्च रोजी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या, ‘भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरण चर्चांच्या’ नवव्या आवृत्तीत, दोन्ही देशातील लष्करी संरक्षण आणि तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्याच्या वचनबद्धतेची पुनरावृत्ती केली. चर्चेदरम्यान, प्रामुख्याने सागरी क्षेत्रातील जागरूकता, परस्पर माहिती शेअरिंग, संयुक्त सराव, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भागीदारी तसेच उद्योग सहकार्य या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले. एकमेकांच्या प्रदेशांमधील कार्यात्मक समन्वय वाढविण्यासाठी आवश्यक तैनातीवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले, तर ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागातील आंतरराष्ट्रीय धोरण विभागाच्या पहिल्या सहाय्यक सचिव, बर्नार्ड फिलिप यांनी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. दोन्ही बाजूंनी सामायिक स्वारस्य असलेल्या क्षेत्रीय आणि जागतिक सुरक्षा मुद्द्यांवर आपापले विचार सादर केले आणि त्यांची धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या महत्त्वावर जोर दिला.

दोन्ही राष्ट्रांनी यावेळी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या प्रगतीचे स्वागत केले. संयुक्त सराव आणि देवाणघेवाणीची वाढती वारंवारता आणि जटिलता यावर भर दिला. “या बैठकीत नोव्हेंबर 2023 मध्ये झालेला, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातील दुसरा 2+2 संवाद, ऑक्टोबर 2024 मध्ये सचिव स्तरावर झालेल्या 2+2 सल्लामसलत चर्चा आणि नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या दुसऱ्या वार्षिक नेत्यांच्या शिखर परिषदेचे संरक्षण परिणामांचे पुनरावलोकन केले गेले,” असे भारतीय संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या, आगामी 2+2 मंत्रीस्तरीय संवादासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने आपला प्राधान्यक्रमही अधोरेखित केला. याव्यतिरिक्त, त्यांनी बहुपक्षीय भागीदारांशी संबंध जोडण्यासह सागरी, जमीन आणि हवाई क्षेत्रात सखोल संरक्षण उद्योग सहकार्य आणि आंतरकार्यक्षमतेचे मार्ग शोधून काढले.

त्यांच्या भेटीचा एक भाग म्हणून, ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळ मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ला भेट देणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियन सह-अध्यक्ष बर्नार्ड फिलिप हे 18 मार्च रोजी, भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांची भेट घेतील आणि धोरणात्मक सहकार्यावर सखोल चर्चा करतील.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleभारत-न्यूझीलंड यांच्यात संरक्षण करार, सागरी सुरक्षा सहकार्यावर भर
Next article10व्या रायसीना डायलॉगचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here